एका गावात एक सावकार राहत असतो. त्याने गावातल्या एका माणसाला कर्ज दिलेले असते. बरीच वर्षे लोटतात. कर्ज घेणारा माणूस यथाशक्ती सावकराचे कर्ज फेडत असतो. तरीही बरीच रक्कम शिल्लक असते. सावकार त्याला कर्ज फेडण्याबद्दल सारखा तगादा लावत असतो. शेवटी तो अटीतटीला येतो.
तो त्या माणसाला म्हणजेच ऋणकोला म्हणतो “तुझे सर्व कर्ज फिटेल अशी एक युक्ती मला सापडली आहे. एका बटव्यात मी दोन गोटे ठेवणार आहे. त्यातला एक काळा असेल व दुसरा पांढरा. तुझ्या तरुण मुलीने त्यातला एक गोटा उचलायचा. जर तिने काळा उचलला तर तिने माझ्याशी लग्न करायचे. आणि जर पांढरा उचलला तर तिने माझ्याशी लग्न न करताही मी तुझे कर्ज माफ करेन. मात्र तुझ्या मुलीने गोटा उचलण्याचे नाकारले तर मी तुझ्यावर केस करुन तुला तुरुंगात डांबण्याची व्यवस्था करेन. काय करायचे ते तू व तुझी मुलगी मिळून ठरवा.
तो माणूस हताश झाला. सावकारासारख्या दुष्ट आणि कुरुप माणसाशी आपल्या मुलीचे लग्न होऊ नये असे त्याला वाटत होते. आता त्याच्या जवळ तीन पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे त्याच्या मुलीने एक गोटा उचलणे. तो काळा निघाल्यास सावकाराशी लग्न करुन वडिलांचे ऋण फेडणे.
दुसरा पर्याय होता की मुलीने गोटा उचलण्यास नकार देणे. हा पर्याय स्विकारल्यास त्या माणसाला तुरुंगात जावे लागले असते.
तिसऱ्या पर्यायात मुलीने आपल्या नशिबाच्या जोरावर पांढराच गोटा निघेल अशी आशा ठेवून बटव्यात हात घालणे.
ही गोष्ट अनेक कंपन्यांमधून सांगितली जाते. आपल्यापैकी प्रत्येकावर वैयक्तिक जीवनात अथवा व्यावसायिक जीवनात असा प्रसंग ओढवू शकतो. चाकोरी बाहेरचा विचार करता यावा म्हणून मुद्दाम ही गोष्ट कोड्यासारखी विचारली जाते.
प्रत्यक्षात त्या मुलीने गोटा उचलायला मान्यता दिली. वास्तविक तिलाही त्या सावकाराशी लग्न करायचे नव्हते. परंतु तिच्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. सावकाराने खुशीत येऊन बटवा हातात घेतला. त्याच्या घराच्या बागेत जाऊन तो गोटे शोधू लागला. मुलीचे त्याच्यावर बारीक लक्ष होते. तिने सावकाराला दोन काळे गोटे उचलताना व हळूच बटव्यात टाकताना पाहिले. त्यावेळी ती काहीच बोलली नाही.
गोटा उचलायची वेळ आल्यावर तिने एक गोटा बटव्यातून काढला व धांदरटपणे आपल्या हातातून निसटला आहे असे दाखविले. सावकार म्हणाला “तू काढलेला गोटा इतर गोट्यांत जाऊन मिळाला. आता कसे कळणार की तू नेमका ‘कुठला गोटा उचलला होतास?”
मुलगी म्हणाली “बटव्यात कुठला गोटा शिल्लक आहे ते पहा. आपोआपच आपल्याला कळेल की कुठला गोटा मी उचलला होता. ”
सावकाराला हे कबूल करायचे नव्हते की त्याने बेईमानी केली होती. त्यामुळे नाईलाजाने त्याला मान्य करावे लागले की मुलीने टाकलेला गोटा पांढरा असणार. गोष्टीचा शेवट अर्थातच चांगला झाला. मुलीला सावकाराशी लग्न न करता आपल्या वडिलांचे कर्ज माफ करुन मिळाले.
आपल्या आयुष्यात जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आपण फक्त दिलेल्या किंवा मिळालेल्या पर्यायांचा विचार करतो. या गोष्टीचे सार असे आहे की अनेकदा चाकोरी बाहेर विचार केल्याने आपल्याला अनेक प्रश्नांची उकल करता येते. कठीण परिस्थितीवर मातही करता येते. जशी गोष्टीतल्या त्या हुशार मुलीने केली.
काही वेळा दुसऱ्या कोणाच्या बोलण्यातून आपल्याला एखादी टीप मिळते. जगातले सगळे शोध असेच लागलेले आहेत हे विशेष.
Leave a Reply