‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ…’, ही म्हण लहानपणापासून आपण ऐकत आलेला. त्याचा अर्थ देखील गुरूजींनी छान पद्धतीने समजावून सांगितलेला. त्याचा अर्थही अगदी सोपा-साधा आणि सरळ असा आहे. ज्या वृक्षाच्या फांदीपासुन दांडा तयार केला, तोच दांडा कुऱ्हाडीच्या मदतीने त्याच वृक्षाच्या मुळावर उठला असा त्याचा सोपा अर्थ. या म्हणीचा सार्वत्रिक जीवनात आपल्याला नेहमीच परिचय होत असतो. आपल्याला ते कळत असूनही आपण त्याकडे साफ दुर्लक्ष करतो…
म्हणजे पुन्हा तेच कुऱ्हाडीचा दांडा…… जसे एखादी शाळा उभारली जाते. कुठला तरी अधिकारी त्यावर नियुक्त केला जातो. त्याच्यावर शाळा चालवण्याची सर्व जबाबदारी दिली जाते. तो देखील जबाबदारी पार पाडत असताना स्वत:ची पोळी भाजुन घेत असतो. स्वत:च्या तुंबड्या भरत असतो. म्हणजे ज्याला उभारणी करायला सांगितलं तोच कुरतडायला निघालाय. आपल्या अवती-भोवती अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्यांचा परिचय थेट वरच्या म्हणीशी जोडला जातो. आपल्या अगदी जवळचं उदाहरण घेऊ या आपण मतदान करायला जातो. म्हणजे कुणालातरी निवडून देण्यासाठी आपण जातो. मोठ्या विश्वासाने आपण एखाद्या उमेदवाराला निवडून देतो. आपल्याला वाटते की हा उमेदवार, काहीतरी चांगले करेल. वेगळे करेल.. पण तसे होते का…! तर नाही आपलाच अपेक्षा भंग होतो. निवडणूकीच्या काळात मतं मागण्यासाठी विनवणी करणारी मंडळी, निवडुन आल्यावर मात्र ‘तू कोण, अन मी कोण’ अशी वागू लागते. निवडुन आल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या घराचे रंग बदलू लागतात. जुनं घर जाऊन नवीन बंगला तयार होतो. दाराशी गाडी येते आणखी बरच काही काही होत असतं. सर्वसामान्यांच्या सुविधांची मात्र वानवा होते. मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी त्यांना झगडावे लागते. तिकडे निवडुन दिलेला उमेदवार ( की दांडा) त्याच्याच गोतासाठी काळ ठरू लागतो.
सार्वत्रिक जीवनात जगताना आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून आपल्याला हे जाणवत जातं की हा कुऱ्हाडीचा दांडा त्याच्याच गोतासाठी काळ ठरत आहे. पण आपली देखील गंमत अशी आहे, की आपण फारसे बंड करून उठत नाही. फारसे विरोधात बोलत नाही. सर्वसामान्यांची जी ताकद आहे, ती एकजुटीने वापरली गेली तर निश्चितपणे बदल घडेल यात शंका नाही. सर्वसामान्य एकत्र येत नाही, ही मोठी अडचण आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी कुणाचा तरी आधार लागतो. सर्वसामान्यांसाठी तसा आधार व्हायला आता कुणी फारसे पुढे येत नसल्याचेच चित्र आहे. तिथेच या मंडळींचे फावते. त्यांची वाट सुकर होत जाते.
आज कोणतेही क्षेत्र घ्या.. त्यामुळे स्वत:ची पोळी भाजुन घेणाऱ्यांची कमी नाही, सार्वत्रित हिताचा विचार करणारी मंडळी आहेत, नाही असे नाही. पण त्यांची संख्या मर्यादीत आहे, त्यांचा आवाज मोठा नाहीय, तो क्षीण झालाय. अशा मंडळींच्या पाठीशी आपणच उभे राहिले पाहिजे. थोडसं डोळसपणे जर वागायला शिकलो ना आपण तर निश्चितपणे बदल घडू शकेल. हा बदल घडवणे आपल्याच हातात आहे… दुसऱ्या कुणाच्या हातात नाही… हे देखील लक्षात घ्यायला हवे.
– दिनेश दीक्षित (४ जुलै २०१८)
Leave a Reply