‘देवगडचा पाऊस’ हा माझा लेख वाचून माझ्या अनेक परिचितांनी देवगडला भिजण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली.. मलाही तुम्हाला घेऊन जायला खुप खुप आवडेल..इथे पावसाळ्यात जायलाच हवं..पण त्यासाठी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे..
सर्वात महत्याचं म्हणजे उरात प्रचंड हौस हवी. ह्या अटीला ऑप्शन नाही.. देवगडचा पाऊस मनमुराद एन्जॉय करायचा असेल तर सुट्ट्यांचा बळी द्यायची तयारी हवी..किमान दोन रात्र व तीन पूर्ण दिवस द्यावे लागतील..अर्थात हा काळ आयुष्यातून कमी होणारा नसून तेवढ्या काळाने आपलं आयुष्य वाढवणारा असणार आहे हा विश्वास निश्चित बाळगा..
इथं आपण कुठला कुठला पाऊस अनुभवू शकतो?
आमचे मित्र श्री. चारुदत्त सोमण यांचं ‘हॉटेल गॅलेक्सी’. होय, या समुद्रतटावरच्या, काहीश्या उंच जागी असलेल्या घरगुती छोटेखानी हॉटेलात निवांत बसून पाऊस अनुभवणं एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती आहे..खुप दिवसांनी भेटलेल्या मित्राप्रमाणे धाडकन दरवाजा उघडून, थेट खोलीत घुसून घुसमुसळ्या आवेगाने आपल्याला कवेत घेणारा पाऊस उभ्या देवगडात केवळ इथेच अनुभवता येतो..शेजारीच प्रचंड पवनचक्क्या भिरभिर्यासारख्या फिरत असतात..एखादं हॉटेल पर्यटन स्थळ असू शकतं हे केवळ इथेच अनुभवायला येऊ शकतं..!!
पुढे अनुभवायचा तो ‘मिठमुंबरी’ गांवच्या निर्मनुष्य समुद्रकिनार्यावर भणाणता वारा आणि उसळत्या फेसाळ लाटा या आपल्या झिंगाट साथीदारांसह आपल्यासोबत बेभान नाचणारा पाऊस, ‘तांबळडेग’ गांवातल्या किनार्यावरच्या श्री गजबा देवीच्या मंदिरात बसून अनुभवायचा तो तांडव करत लाटांवर नृत्य करणारा पाऊस, किल्ले विजयदुर्गावर ‘अदबी’ने वावरणारा अदबशीर पाऊस..
झालंच तर ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वरा’चं ऐतिहासिक व कलापूर्ण मंदीर आपण पाहू. वाटेतल्या ‘वाडा’ गांवातला नैसर्गिक ‘स्विमिंग पूल’ ही आणखी एक अजब गोष्ट..! पोहायला येणार्यांनी इथे बिनधास्त धडाधड उड्या मारा. इथे स्त्रियाही पावसात भिजण्याचा, पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. इथे परक्यांच्या बुभुक्षित नजरा तुमचा पाठलाग करत नाहीत. अस्पर्श, निरागस, हिरवाकंच निसर्ग, वरून कोसळणारा पाऊस आणि तुमच्याशिवाय इतर दुसरं कोणीही नसतं..
दिवेलागणीच्या सुमारास आपण देवगड किल्लावरचा ‘दिपस्तंभ’ व त्यातील दिवा सतत फिरता ठेवण्यासाठी वापरलेली अफवातून आयडीया बघायला जाऊ..असं आणखी बरंच काही..आणि हे सर्व घड्याळाच्या काट्याप्रमणे नाही बरं का..आपलं पोट भरेपर्यंत आपण हे एन्जॉय करू शकता..
या सोबत अनेक विविध विषयांवर भरपूर गप्पा टप्पा, एखाद्या गांवच्या आठवडा बाजारास भेट, भारताची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखलं जाणारं श्रीकुणकेश्वराचं मंदिर इ. इ. वाफाळलेला चहा, रुचकर व्हेज-नॉन व्हेज जेवण आणि वेळ मिळालाच तर ‘मणचे’ गांवच्या धबधब्याला भेट सुद्धा..वाटेत मन मानेल तेंव्हा थांबून छोटे अवखळ वहाळ, ओढ्यात भिजण्याची पूर्ण मुभा..!!
चला तर मग, देवगडातल्या पावसाची आपापल्या कल्पनेनुसार असंख्य रुपे अनुभवायची तर आता अधिक वेळ न दवडता निघायलाच हवं..
एक महत्वाची गोष्ट, कोकणावर तशी वरूण राजाची भरपूर कृपा असली तरी पावसाचं पडणं – न पडणं आपल्या हाती नाही….आणि जरी तो आपण गेल्यावेळी नाहीच पडला, तरी हिरमुसायचं कारण नाही..आम्ही सुचवलेली स्थानं वर्षातल्या कोणत्याही ऋतूत तेवढीच सुंदर असतात..आणि नाहीतर नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत कोसळणारे विविध धबधबे आहेतच. त्यामुळे काळजीचं कारण नाही.
संपर्क –
मुंबई- श्री. राजेश जाधव -9820365379
देवगड- श्री. चारुदत्त सोमण -09422584022
-गणेश साळुंखे
Leave a Reply