नवीन लेखन...

चलबिचल निवारक (संक्षिप्त रूपांतरीत कथा १२)

त्या क्रूर राजाच्या रिंगण-मैदानांत ‘सुंदरी की वाघ’ या नांवाने ओळखली जाणारी घटना घडली त्याला एक वर्ष होऊन गेलं होतं.
अशा वेळी एका दूरच्या देशांतून पाच जणांचं एक शिष्टमंडळ राजाच्या महाली आलं.
ह्या विद्वान आणि आदरणीय मंडळींचे राजाच्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने स्वागत केलं व त्यांनी त्याला आपल्या तिथे येण्याचा उद्देश सांगितला.

मंडळाचा नेता म्हणाला, “महाशय, असं झालंय की ज्या दिवशी राजकन्येवर प्रेम करण्याची ईच्छा करणाऱ्या युवकाला रिंगण-मैदानांत जमलेल्या प्रेक्षकांसमोर दोनापैकी एक दरवाजा, ज्यांतून सुंदरी किंवा वाघ, कोण बाहेर येणार हे त्याला माहिती नसतांना, उघडण्यास सांगण्यात आले, तेव्हां इथून दूर असलेल्या आमच्या राज्यातील एक नागरिक हजर होता.
आमचा माणूस फारच संवेदनशील होता आणि तो त्या निर्णायक क्षणी कदाचित भयानक दृश्य बघावे लागेल म्हणून इतका घाबरला की झटकन आपल्या उंटावर बसून तिथून जितक्या वेगाने पळून जाता येईल त्या वेगाने तो पळाला.
राज्यांत परत आल्यावर त्याने ही गोष्ट आम्हाला सांगितली व ती आम्हाला खूप आवडली आणि आम्हांला वाईटही वाटले की पुढे काय झालं, हे पहायला तो थांबला नाही.

नंतर आम्ही बरेच दिवस वाट पाहिली की तुमच्या राज्यांतून एखादा प्रवासी येईल व आम्हाला पुढील बातमी कळेल. परंतु वर्ष झाले तरी कांही कळले नाही.
शेवटी आम्ही ठरवले की दरवाजांतून सुंदरी बाहेर आली की वाघ हे जाणून घेण्यासाठी एक शिष्टमंडळ तुमच्या राज्यांत पाठवावे.”

हे ऐकून राजाच्या त्या मानकऱ्याने त्यांना आत नेले व एका खोलींत बसवून त्यांना नाश्ता, फलाहार, सरबत, इ. देऊन त्यांचे स्वागत केले व म्हणाला, “आदरणीय पाहुण्यांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्या घटनेनंतर थोड्याच अवधीनंतर घडलेली दुसरी घटना मी तुम्हांला सांगतो.

इथे सर्वत्र ही गोष्ट प्रसिध्द आहे की आमच्या राजाच्या दरबारी सुंदर सुंदर युवती राज्याच्या सर्वदूर भागांतून आणल्या जातात.

महालामधे व दरबारामधे अशा खूप युवती असतात. दूसऱ्या कोणत्याही दरबाराच्या तुलनेंत सौंदर्यवान असणाऱ्या ह्या युवतींच्या सौंदर्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

जर आमच्या राजाच्या झटपट न्यायपध्दतीचीही प्रसिध्दी तितकीच सर्वदूर पसरलेली नसती तर अनेक विदेशी लोक ह्या युवतींना पहायला इथे आले असते.

पण त्यानंतर लौकरच एका दूर देशाचा देखणा व रूबाबदार राजपुत्र आमच्या राजाकडे आला. त्याला अर्थातच राजाची भेट घेतां आली.

आमच्या राजाने त्याला त्याच्या येण्याचा उद्देश विचारला.

तेव्हा तो राजकुमार म्हणाला, “तुमच्या दरबारांतील युवतींच्या सौंदर्याची ख्याती ऐकून मी त्यापैकी एखादीशी विवाह करण्यासाठी तुमची परवानगी मागू इच्छितो.”

हे ऐकून आमच्या राजाचा चेहरा लालबुंद झाला व तो आपल्या सिंहासनामधे अस्वस्थ हालचाली करू लागला. आम्हाला वाटले की तो आतां त्याच्या थरथरत्याऱ्या ओठांतून कांही भयानक वाणी उच्चारणार पण महत्प्रयासाने त्याने स्वत:ला कसेबसे आवरले.

मग क्षणभर शांत राहून तो म्हणाला, “तुझी इच्छा आम्ही मान्य केली आहे. उद्या दुपारी बारा वाजता तुझा आमच्या दरबारांतील एका सौंदर्यवतीशी विवाह लावून दिला जाईल.”

मग राजा अधिकाऱ्यांकडे वळून म्हणाला, “उद्या दुपारी करायच्या विवाहाची जय्यत तयारी करायला सुरूवात करा.
राजकुमाराचे महालांत सर्वांत चांगल्या कक्षात राहण्याची सोय करा.
शिंपी, सोनार, इतर कारागीर ह्यांना त्याला सजवायला सांगा.
विवाहाच्या तयारीला जे जे त्याला हवे असेल ते ते पुरवा.”

हे ऐकून तो राजपुत्र म्हणाला, “पण महाराज, आपण ही सर्व तयारी करण्या आधी मला युवतीची………”
राजा त्याला थांबवत मोठ्याने म्हणाला, “पुढे बोलू नकोस, मी राजाज्ञा दिल्या आहेत.
आता आणखी कांही सांगायची गरज नाही.
तू माझ्याकडे वर मागितलास, मी तो तुला दिला.
या विषयावर मी आता अधिक ऐकून घेणार नाही. आता आपण उद्या दुपारी भेटूया.”
असे म्हणून राजा तिथून उठून गेला आणि राजकुमाराला राखीव कक्षात नेण्यात आले.

तिथे त्याच्यासाठी कपडे शिवणारे, दागिने घडवणारे, जोडे बनवणारे, असे सर्व कारागीर येऊन त्याला नवरदेव म्हणून सजवण्याची तयारी करू लागले.
परंतु राजकुमार गोंधळला होता व त्याच्या मनाची चलबिचल होत होती.
राजकुमार त्याच्या मदतीसाठी दिलेल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “मला ह्या घाईचा अर्थ कळत नाही.
मला प्रथम त्या सर्व सौंदर्यवतीना पहायचे आहे, त्यांच्याशी बोलून त्यांची हुशारी जाणून घ्यायची आहे, मग त्यांतील एक निवडायची आहे.”
मदतनीस म्हणाले, “आम्ही तुला कांहीही सांगू शकत नाही.
आमच्या राजाला एकदां जे योग्य वाटतं तेंच तो करतो. यापेक्षा अधिक आम्हाला कांही माहित नाही.”
“तुमच्या राजाच्या कल्पना थोड्या विचित्रच वाटतात आणि त्या माझ्या कल्पनांशी अजिबात जुळत नाहीत.”
त्याने असं म्हणताच आता पर्यंत राजकुमाराचं लक्ष ज्याच्यावर गेलं नव्हतं असा एक अधिकारी पुढे आला आणि राजकुमारासमोर उभा राहिला.
त्याचे खांदे रूंद होते आणि तो प्रसन्न वृत्तीचा दिसत होता.
त्याच्या उजव्या हातात एक मोठ्ठं धारदार खड्ग होतं.
हातांतले असे मोठे शस्त्र त्याने एखाद्या झोपलेल्या लहान बाळाला हातात घ्यावे तसे नाजूकपणे धरले होते.
राजकुमाराने ते भीतीदायक शस्त्र पाहून थोडे मागे सरत त्याला विचारले, “तू कोण आहेस?”
तो अधिकारी नम्रपणे हंसत म्हणाला, “ मी ‘चलबिचल निवारक’ अधिकारी आहे.
आमचा राजा एखादी इच्छा एखाद्या प्रजाजनाला किंवा पाहुण्याला सांगतो पण ती त्याला रुचत नाही किंवा कांही बाबतीत त्याचा राजाशी मतभेद होतो, अशावेळी मी त्या व्यक्तीबरोबर असतो.
जर राजाची आज्ञा मानण्याच्या बाबतीत त्याची चलबिचल झाली तर त्याने माझ्याकडे पहायचे आणि चलबिचल थांबवून राजाचे म्हणणे अंमलात आणायचे.”

राजकुमाराने त्याच्याकडे पाहिले आणि तो माप देण्यासाठी शिंप्याकडे वळला.
ते सर्व कारागीर रात्रभर राबले.

जशी सगळी तयारी होत आली आणि दुपार जवळ येऊ लागली तसा तो मदतनीसांना विचारू लागला की त्याची व दरबारी युवतींची ओळख कधी करून दिली जाईल?
ते म्हणाले, “ते कांही आम्हाला ठाऊक नाही. ते महाराजच ठरवतील.”

राजकुमाराला मुजरा करत पुढे येऊन ‘चलबिचल निवारक’ अधिकारी म्हणाला, “ह्या खड्गाची धार किती तीक्ष्ण आहे ते पहा.” असे म्हणून स्वत:च्या डोक्याचा एक केस त्याने त्या शस्त्राच्या पात्यावर टाकला तर तत्काळ त्या केसाचे दोन तुकडे झाले.

राजकुमाराने ते पाहिले व तोंड वांकडे केले आणि तो गप्प बसला.
मग त्याला जिथे विवाह समारंभ साजरा होणार होता त्या महालांतील मोठ्ठ्या दालनांत न्यायला अधिकारी आले. राजकुमाराला तिथे राजा उच्चासनावर बसलेला दिसला. त्याच्याबरोबर त्याच्या सरदार-मानकऱ्यांची प्रभावळ होती.

राजकुमाराला राजासमोर नेण्यात आले.
राजकुमार राजाला म्हणाला, “पुढे जाण्यापूर्वी मला…”.
राजकुमाराचे वाक्य पूर्ण होण्याआधीच हातांत उपरण्यासारखे वाटणारे मलमली वस्त्र घेऊन एक कारागीर राजकुमाराजवळ आला व त्याने अत्यंत शिताफीने ते वस्त्र झटदिशी राजकुमाराच्या संपूर्ण चेहऱ्याभोवती असे गुंडाळले की राजकुमाराला काहीही दिसेना व बोलतां येईना.
मग त्या कारागीराने त्या कापडाला असे व्यवस्थित छेद दिले की राजकुमाराला श्वास घेता येईल व ऐकता येईल. मग त्या वस्त्राची टोके घट्ट बांधून तो निघून गेला.
राजकुमाराला प्रथम वाटले की ते वस्त्र ओरबाडून फेंकून द्यावे.
तो त्या वस्त्राला हात लावणार तोच ‘चलबिचल निवारक’ त्याच्या कानात कुजबुजला, “महाराज, मी इथे आहे ना!” धसक्याने राजकुमाराचे दोन्ही हात खाली आले.
राजकुमाराला त्या अर्धजंगली राज्यातल्या गुरूजींचे विवाहाचे मंत्रपठण ऐकू येऊ लागले.
त्याच वेळी त्याच्या बाजूला नाजूक मलमलींची मंद सळसळ ऐकू आली. त्याने हात पुढे करताच, त्याला असेच मलमली वस्त्र मागेही जाणवले.
गुरूजींनी त्याला आज्ञा केली की त्याने त्याच्या जवळच्या युवतीचा हात हातांत घ्यावा त्याने हात पुढे केला आणि त्याच्या हातांत एक खरोखरच नरम, नाजूक हात आला.
त्या हाताचा स्पर्श इतका छान आणि आल्हाददायक होता की राजकुमाराच्या अंगावर एक गोड शिरशिरी उमटली. मग त्या देशाच्या रिवाजाप्रमाणे गुरूजींनी वधूला प्रथम विचारले, “ह्याचा तू पती म्हणून स्वीकार करणार कां?” राजकुमाराने पूर्वी कधीही ऐकला नव्हता इतक्या मधुर आवाजांत उत्तर आलं, “हो, मी स्वीकार करते”.

राजकुमाराच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
त्या तरूणीचा स्पर्श, आवाज, ह्यांनी त्याच्यावर मोहिनी घातली होती.
राजाच्या दरबारांतील सर्वच युवती सुंदर होत्या.
शिवाय ‘चलबिचल निवारक’ त्याच्या मागे होता.
गुरूजींनी जेव्हां त्याला विचारले, तेव्हा तोही तात्काळ म्हणाला, “हो, मी स्वीकार करतो.”
गुरूजींनी दोघांचा विवाह संपन्न झाल्याचे जाहिर केले.
राजकुमाराला त्याच्याभोवती हालचाल ऐकू आली.
त्याच्या डोक्याभोवती गुंडाळलेले उपरणे काढले गेले.
तो आपल्या वधूला पहायला आतुर होता.
पण तो आश्चर्यचकीत झाला कारण तिथे तो एकटाच उभा होता.क्षणभर तो प्रश्नही विचारू शकला नाही.

एवढ्यांत राजा सिंहासनावरून उठून त्याच्याकडे आला आणि त्याने राजकुमाराचा हात हातांत घेतला.
“माझी पत्नी कुठे आहे?” कसेबसे राजकुमाराने विचारले.
“ती इथेच आहे.” असे म्हणत राजाने त्याला दालनाच्या एका पडदा असलेल्या भागाकडे नेले.
पडदे दूर केले गेले आणि राजकुमाराला समोर एक दुसरे लांब दालन दिसले.
त्या दालनाच्या समोरच्या भिंतीलगत चाळीस सुंदर युवतींची एक रांग होती.
सगळ्या जणी मलमलीची सुंदर वस्त्रे ल्यालेल्या आणि एकापेक्षा एक सुंदर होत्या.
रांगेकडे बोट दाखवत राजा म्हणाला, “तिथे तुझी पत्नी आहे. पुढे जा आणि तिला घेऊन जा.
पण जर कां तू तुझ्या पत्नीऐवजी दुसऱ्याच एखाद्या लग्न न झालेल्या युवतीला नेऊ लागलास तर तुझा शिरच्छेद केला जाईल. आता वेळ लावू नकोस. पुढे हो आणि आपली पत्नी घेऊन जा.”

राजकुमार स्वप्नात असल्याप्रमाणे त्या युवतींच्या रांगेजवळ गेला व त्याने एका टोकांपासून दुसऱ्या टोकांपर्यंत एक उलट सुलट फेरी मारली.

परंतु त्या चाळीस युवतीमध्ये एखादीचा नुकताच आपल्याशी विवाह झाला आहे ह्याची कोणतीच खूण त्याला आढळली नाही. त्यांचे वेश सारखे होते. त्या सर्व त्याने पहाताच लाजत होत्या. त्या सर्व त्याच्याकडे पहात मग नजर खाली वळवत. त्या सर्वांचे हात नाजूक दिसत होते. त्याच्यापैकी कोणीही कांही बोलले नाही की कोणी बोटही वर केले नाही. त्यांना तशी सक्त ताकीद देण्यात आली असावी.

राजा गरजला, “वेळ कां लावतोयस? जिचा तुझ्याशी विवाह झाला आहे अशा मुलीशी माझा विवाह झाला असता तर मी क्षणांत तिला घेऊन गेलो असतो.”

गोंधळलेल्या राजपुत्राने त्या सुंदरींच्या रांगेसमोरून आणखी एक फेरी मारली. ह्यावेळी त्याला दोन युवतींच्या मुद्रेवर थोडासा बदल दिसला.

एकीच्या चेहऱ्यावर तो समोर असताना मंद स्मित दिसले तर दुसऱ्या तितक्याच सुंदर युवतीच्या तो समोर अाला, तेव्हां तिच्या चेहऱ्यावर राग उमटलेला दिसला.

राजकुमार स्वत:शी विचार करत होता, “नक्कीच ह्या दोघींतल्या एकीशी माझा विवाह झाला आहे. पण ती कोणती?
जीने मंदस्मित केलं ती?

अशावेळी आपला पती आपल्यासमोर आहे हे पाहून नुकताच विवाह झालेली युवती मंद स्मित करणारच ना?
पण अशीही शक्यता आहे की आताच आपल्याशी विवाह झालेला पती आपला स्वीकार करत नाही म्हणून ती रागावणेही स्वाभाविक आहे.

ती मनांत म्हणत असेल, “ये, एवढे लक्षांत येत नाही? एवढी साधी गोष्ट कळत नाही?”
पण कदाचित एखादी आपले लग्न झालेले नसतांना हा आपल्याला पहातोय म्हणूनही रागावू शकते.
“जा पुढे जा, तुझी पत्नी अजून दोन क्रमांक पुढे आहे.” असंही तिच्या मनांत असेल.
कदाचित असंही असेल की माझ्याशी जिचा विवाह झाला तिने पूर्वी माझा चेहरा पाहिला नव्हता.
आता जर तिला मी आवडलो असेन तर तिने ते मंद स्मित करून दाखवले असेल.
किंवा जर मी आवडलो नसेन जर तिच्या चेहऱ्यावर राग उमटला असेल.
साधारणपणे हास्य हे खऱ्या प्रेमाचा संकेत देते तर राग हा ही आपल्या माणसाच्या चुकीबद्दल असतो.
पुन्हां हंसणे हे—”

राजा गरजला, “ऐक, आता जर दहा सेकंदात तू मी दिलेल्या युवतीचा स्वीकार केला नाहीस तर मी तुझ्या नवपरिणीत पत्नीला तुझी विधवा करीन.”राजाचे शेवटचे शब्द कानावर येतात तोच ‘चलबिचल निवारक” अधिकारी पुढे होऊन राजकुमाराच्या कानांत कुजबुजला, “मी इथे आहे.”

राजकुमाराने मग क्षणाचाही अवधी घेतला नाही. तो पुढे झाला आणि त्याने दोघींपैकी एकीचा हात हातांत घेतला.
ताबडतोब आनंदाचा घंटानाद होऊ लागला, वाद्ये वाजू लागली आणि राजाने राजकुमाराचे अभिनंदन केले.
त्याने जिच्याशी त्याचा विवाह झाला होता तिचाच हात धरला होता.

ही गोष्ट सांगून राजाचा अधिकारी त्या शिष्टमंडळाला म्हणाला, “तुम्ही आपापसांत चर्चा करून ठरवा आणि मला सांगा की राजकुमाराने दोघींपैकी कोणाची निवड केली, जिने मंदस्मित केलं, तिची, की जिच्या चेहऱ्यावर राग दिसला , तिची? ह्याचं उत्तर तुम्ही दिलंत की मी तुम्हाला सांगेन की त्या दरवाजांतून सुंदरी बाहेर आली की वाघ बाहेर आला?” आतापर्यतच्या महितीप्रमाणे त्या शिष्टमंडळाच्या पाच सभासदांची चर्चा अजून चालूच होती.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – डीसकरेजर ऑफ हेजिटन्सी

मूळ लेखक -फ्रॅंक स्टॉकटन ( १८३४-१९०२)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..