१९६५ सालातील घटना आहे.. राज कपूर तेहरान मध्ये एका चित्रपट वितरकाने आयोजित केलेल्या भव्य पार्टीला गेले होते. तिथे तामीळनाडूमधील एका गायिकेने काही गाणी सादर केली. तो वेगळ्या प्रकारचा आवाज, राज कपूर यांना मनापासून भावला. त्यांनी त्या समारंभानंतर तिला भेटून मुंबईत येऊन भेटायला सांगितले.
ती नवोदित गायिका मुंबईला आली. राज कपूर यांना भेटली. त्यांनी तिची शंकर जयकिशन यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी राज कपूर ‘संगम’ चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त होते..
तिला पहिली संधी मिळाली ती ‘सूरज’ चित्रपटातील ‘तितली उडी..’ व ‘देखो मेरा दिल मचल गया..’ या गाण्यांची! मात्र ‘सूरज’ प्रदर्शित होण्याआधीच तिचा ‘गुमनाम’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता…
‘तितली उडी..’ हे गाणं वैजयंतीमालावर चित्रीत केलेलं होतं. त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदाच महंमद रफी यांच्या ‘बहारों फुल बरसाओं..’ व ‘तितली उडी..’ या शारदा अय्यंगारच्या गाण्याला असा दोघांनाही मिळाला!!
शारदाचा जन्म तामीळनाडूमधील एका सनातन ब्राम्हण कुटुंबात झाला. ती सहा बहिणींमध्ये सर्वांत मोठी व तिला एक धाकटा भाऊ होता. लहानपणापासूनच तिला गायनाची आवड होती. तेरा वर्षांची असताना तिला आपल्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने तेहरानला जावे लागले. तिथे तिने आपल्या गाण्याच्या छंदावर अधिक मेहनत घेतली.
मुंबईत आल्यावर शंकर जयकिशन यांच्याशिवाय तिला कुणीही संधी दिली नाही. त्याकाळी लता व आशाचं सिनेजगतात वर्चस्व होतं. हिंदीमधील अन्य निर्मात्यांनीही शारदाला आपल्या चित्रपटांमध्ये गाण्याची संधी दिली नाही..
राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ साठी तिच्याकडून तीन गाणी रेकॉर्ड करुन घेतली, मात्र प्रत्यक्ष चित्रपटात त्या गाण्यांना वगळलं गेलं. शारदाला फार वाईट वाटलं. असं तिच्या बाबतीत अनेकदा घडलं..
शंकर हे एखादी धून वाजवायचे त्यावरुन शारदा गीतं लिहू लागली. त्या दोघांचं ट्युनिंग छान जमलं होतं. मात्र सिनेनियतकालिकांतून त्यांच्यावर टिका होऊ लागली. शारदाला या गोष्टीचा खूप मानसिक त्रास झाला.
‘शतरंज’ चित्रपटातील मेहमूद व हेलनचं ‘बदकम्मा बदकम्मा..इकड बतो रा..’ हे गाणं महंमद रफी व शारदानं गायलेलं आहे. हे गाणं त्याकाळी फार गाजलं होतं.
‘पहचान’ चित्रपटातील ‘वो परी कहा से लाऊ..’ हे गाणं शारदा व सुमन कल्याणपूर या दोघींनी गायलेलं आहे.. १९७१ मधील ‘सीमा’ चित्रपटातील ‘जब भी ये दिल उदास होता है…’ हे गाणं महंमद रफी व शारदाच्या तोंडी आहे. पडद्यावर कबीर बेदी व सिमी गरेवाल आहे.. अभिनेत्री रेखाचा दुसराच चित्रपट होता, ‘एलान’! त्यातील ‘आप की राए मेरे बारे में, क्या है.. क्या है..’ हे गाणं शारदाने गायलेलं होतं…
तिचा आवाज खरा जुळला तो, राजश्रीला! ‘अराउंड द वर्ल्ड’ या चित्रपटातील ‘दुनिया की सैर कर लो..’, ‘चले जाना, जरा ठहरो..’ ही गाणी ‘बिनाका’वर फार गाजली होती. शंकर जयकिशन यांच्याशिवाय फक्त संगीतकार उषा खन्ना व रवी यांनीच तिला घेतलं होते.
शंकर १९८७ साली गेल्यानंतर तिनं काही चित्रपटांना संगीत दिलं. मात्र ते चित्रपट बी ग्रेडचे होते. तिला संपूर्ण चित्रपटसृष्टीने जाणीवपूर्वक लांब ठेवलं होतं. ज्याच्या भरवशावर ती मुंबईत आली, त्या ‘परिस’ असलेल्या राज कपूरने देखील तिला
‘अहिल्या’च्या अवस्थेत तसंच ठेवलं..
तिने जगभरात भरपूर स्टेज शो केले. ती आपल्या कलेशी एकनिष्ठच राहिली. तिने वयाची ८३ वर्षे पूर्ण केली आहेत.. अजून शंभरी गाठायची आहे..
म्हणूनच म्हणावसं वाटतं..
‘चले जाना, जरा ठहरों…’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-१०-२१.
Leave a Reply