नवीन लेखन...

चमेली! (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३६)

गांवठी व डॅशहाउंड ह्यांच मिश्रण असलेली, कोल्हाच वाटणारी कुत्री फुटपाथवर अस्वस्थपणे फिरत होती.
मधेच भूंकून आणि पंजे चाटून आठवत होती की ती घरी जायचा रस्ता कसा विसरली ?
आजचा दिवस कसा गेला तें आठवत होते पण शेवटी ती ह्या अनोळखी फूटपाथवर कशी आली ?
सकाळी कोंड्या सुताराने, लाकडाची वस्तु कागदात गुंडाळून कांखेत मारली आणि तो तिला म्हणाला, “चल, चमेली.”
ताबडतोब ती खुर्चीखालून बाहेर येऊन आळस झटकून मालकामागे धांवली होती.
कोंड्याचा ग्राहक दूर रहात होता.
वाटेत कोंड्याने संवयीप्रमाणे दोन गुत्त्यांमधे ताकदीसाठी दोन प्याले रिचवले.
चमेलीला आठवले रस्त्यात ती अगदी चक्रमपणे वागली.
बाहेर फिरायला आणल्याच्या आनंदात उड्या मारल्या, गाड्यांच्या मागे भुंकत धांवली आणि तिने रस्त्यावरच्या कुत्र्यांना पळवून लावले.
ती कोंड्याच्या नजरेआड झाली की तो ओरडे, “कुठे गेली बदमाष ! चल सरळ !”
कोंड्याचं काम झाल्यावर तो बहिणीच्या घरी गेला.
तिथेही प्याला, कांही खाल्ले आणि एका पुस्तकं बांधणाऱ्याकडे गेला.
तिथून खानावळीत व नंतर एका मित्राकडे गेला.
संध्याकाळपर्यंत कोंड्याने बरीच दारू ढोंसली होती व तो धड चालू शकत नव्हता.
तो तत्त्वज्ञान बरळत होता, “माणसाची सगळी मस्ती जीता असेपर्यंतच, मेला की फक्त राख.”
मधेच चमेलीला म्हणे, “चमेली, तू एक क्षुद्र प्राणी आहेस. माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
एवढ्यांत बँडचा आवाज येऊ लागला.
सैनिकांची संचलनाला निघालेली तुकडी त्यांच्याकडेच येत होती.
तो आवाज चमेलीला असह्य वाटला.
चमेलीचं धैर्य गळालं, ती गोल गोल फिरत भुंकू लागली.
तिला कळेना की तिचा मालक सैनिकांकडे आनंदाने कां पहात होता आणि त्याने सलाम कां ठोकला ?
ती जोरांत भुंकत पलिकडल्या फूटपाथवर पळाली.
ती भानावर आली, तेव्हां बँड गेला होता पण मालकही गायब होता.
ती डावीकडे, उजवीकडे, समोरच्या फूटपाथवर सगळीकडे मालकाला शोधून आली पण त्याला जणू जमिनीने गिळले असावे.
ती जमिनीचा वास घेऊ लागली पण तिथून बरेच लोक जाड बूट घालून गेल्यामुळे मालकाच्या पायांचा वास नाहीसा झाला होता.
तिथे रबराचाच वास येत होता.
तोपर्यंत रात्र झाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे लागले.
घोडागाड्या, हातगाड्या, भराभर जात येत होत्या.
फूटपाथवर माणसांची वर्दळ वाढली होती.
अनोळखी माणसे उगाचच ये जा करून तिला अडथळा करत होती.
तिने माणसांची वर्गवारी मालक आणि ग्राहक अशी केली होती.
कोंड्याला तिला बोलायचा, मारायचाही अधिकार होता. ग्राहकांना नाही.
जाणारे, येणारे तिला पायांनीच ढकलू पहात होते आणि ती त्यांच्या पायाला चावू पहात होती.
माणसांची गर्दी कमी झाली.
चमेली फिरून आणि भुंकून थकली.
थंडी वाढली होती.
ती जवळच्याच घराच्या दाराशी गेली आणि मुटकुळे करून झोपली.
दिवसभरांत एकाकडे एक बिस्कीट तर खानावळीजवळ एक मांसाचा छोटा तुकडा एवढचं खाल्ल्यामुळे ती भुकेली होती.
ती माणूस असती तर म्हणाली असती, “एवढ्यावर कशी जगू, त्यापेक्षा जीव देते.”
थकव्यामुळे तिला डुलकी लागली तोंच दरवाजा उघडला.
दरवाजा तिला जरासा लागला आणि एक माणूस बाहेर आला.
ती कूं कूं करत त्याच्या पायांत घोटाळली आणि त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
त्याने खाली वांकून तिला विचारले, “अरे, भू भू, तूं कुठून आलीस ? लागलं कां तुला ? माफ कर. अशी रागावू नकोस, ये.”
चमेलीने त्याच्याकडे पाहिलं.
तो गुबगुबीत इसम बाहेर चालला होता.
त्याने टोपी घातली होती.
चमेलीला त्याची भाषा कळली नाही पण आवाज आश्वस्त करणारा वाटला.
ती त्याचा हात चाटू लागली व करूणपणे कूं, कूं करू लागली.
तो म्हणाला, “मजेशीर आहेस तू ! कोल्हा वाटतेस अगदी ! कधी तरी उपयोगी येशील.”
त्याने तिला खूण केली. “चल माझ्या बरोबर !”
तें चमेलीने ओळखलं.
चमेली त्याच्यामागून गेली.
पंधरा वीस मिनिटांनी ती एका मोठ्या खोलीत होती.
तो डायनिंग टेबलाशी बसला होता आणि ती मान एका बाजूला कलती करून त्याच्याकडे कुतूहलाने पहात होती.
तो जेवताना अधून मधून तिच्याकडे चपाती, चीज,मांसाचे तुकडे, कोंबडीची हाडकं असं कांही टाकत होता.
जे पडेल ते ती पटापट खात होती.
जशी खायची तशी तिची भूक वाढायची.
तिचं तें भराभरा खाणं पाहून तो म्हणाला, “तुझा मालक बहुदा तुला खायला पुरेसं देत नसावा !
किती हडकुळी झालीयस तू ?”
चमेली खाण्यात मग्न होती.
खाऊन ती समाधानाने बसली व शेपूट हलवू लागली.
मालक आरामखुर्चीत बसला असतांना चमेली विचार करत होती की सुताराकडे ती बरी होती की इथे बरी आहे ?
ह्याच्या खोलीत फारच थोडे सामान होते.
कोंड्या सुताराकडची खोली वस्तूंनी भरलेली होती.
शिवाय व्हार्निशचा सुंदर वास यायचा.
तिथे बसायला किती जागा होत्या.
पण ह्या माणसाकडे खायला खूप असावं.
तो बाजूलाच सिगार ओढत बसला असताना एकदाही तिच्यावर डाफरला नाही.
कोंड्या सुताराने एवढ्या वेळात दहादा शिव्या देऊएकदा तिचा उध्दार केला असता आणि एखादी लाथही पेकाटात घातली असती.
मग तो परका इसम बाहेर जाऊन एक दरी घेऊन परतला.
ती त्याने कपाटाच्या बाजूच्या कोंपऱ्यांत अंथरली आणि म्हणाला, “ये, इकडे. ह्याच्यावर झोंप.”
चमेली जाऊन मऊ दरीवर झोंपली.
तो दिवा घालवून खोलीतून गेला.
चमेलीला झोपेत मधेच कुत्र्यांचे भुंकणे ऐकू आले.
ती प्रतिसाद देणार होती पण एकदम आपल्यावर आलेला प्रसंग आठवून दुःखी झाली.
तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटू लागले.
कोंड्याचा नाठाळ मुलगा बबन्या तिला आठवला.
ती अशी बसली की बबन्या तिच्याशी खेळायला येई.
त्याचे खेळ तिचे डोळे पांढरे करत.
मालक बाजूला आराम करत असे.
बबन्या तिचे मागचे पाय धरून तिला बांकाखालून ओढून बाहेर काढी.
मग तिला धरून फक्त मागच्या दोन पायावर चालायला लावी.
तिला उचलून घंटा हलवावी तशी हलवे.
तिला सिगारच्या तंबाखूचा वास घ्यायला लावी.
चमेली ह्या विचारांतून लौकर बाहेर आली आणि पेंगू लागली.
स्वप्नात तिने कितीतरी कुत्रीं पाहिली. माणसे पाहिली.
ती आणि बबन त्या माणसांच्या मागे धावत होती.
मग अचानक बबनही कुत्रा झाला व त्या माणसांवर भुंकू लागला.
दोघानी एकमेकांच्या नाकाचा वास घेतला मग दोघं मजेत धांवत सुटले.
सकाळी चमेली जागी झाली तेव्हां खोलीत एकटीच होती.
तिने खोलीच्या सर्व कोपऱ्यांचा वास घेतला.
लक्ष घालण्यासारखं काहीच तिला मिळालं नाही.
तेव्हा खोलीच्या दुसऱ्या दरवाज्यावर तिने खुडबुड केली आणि जरा छातीने ढकलला तर तो उघडला.
आंत तोच इसम झोपेत घोरत होता.
एक दोनदा भुंकून तिने त्याला जागं करायचा प्रयत्न केला मग तो नाद सोडून दिला.
खुडबुड करून तिने त्याही खोलीचा दुसरा दरवाजा उघडला.
आत जाताच तिला वेगळाच वास जाणवला आणि सावध होऊन ती थबकली.
खोलीच्या भिंतीना ठिपके ठिपकेवाला कागद डकवला होता.
चमेली आत शिरताच एक राखी रंगाचा हंस पंख पसरून आवाज करत तिच्या अंगावर आला.
त्याच्या जवळच एक केसाळ मांजर होते.
चमेलीला पहातांच त्याने अंगावरचे केस फुलवले, डोळे वटारले आणि पाठ फुगवून तें ही “फीस्स्” आवाज करू लागले.
चमेली जरा घाबरलीच पण ते बाहेर न दाखवतां भुंकत ती मांजराच्या दिशेने पुढे जाऊ लागली.
मांजराने आपली पाठ आणखीच धनुष्यासारखी वांकवली व फिस्कारत आपला पंजा चमेलीच्या डोक्यावर हलकेच मारला.
चमेलीने मागे उडी घेतली व मध्येच बसून ती कर्कश भुंकू लागली.
तोपर्यंत मागून येऊन हंसाने आपल्या चोचीचा प्रसाद चमेलीला पाठीवर दिला.
चमेलीने हंसावर उडी मारायचा प्रयत्न केला.
तो इसम आत येऊन ओरडला,“काय चाललंय ? ह्या गडबडीचा अर्थ काय ? चला, आपापल्या जागेवर जा.”
मांजराकडे जाऊन थोपटत तो म्हणाला, “काय मन्या ! तुला लढाई करायचीय ? चल गप्प बस बघू.”
मग हंसाकडे वळत म्हणाला, “हंसराज, तुझ्या घरात जागेवर जा बघू.”
मांजर आपल्या दरीवर आडवे झाले व त्याने डोळे मिटून घेतले.
त्याच्या चेहऱ्यावरून त्याला उगीच चिडल्याचा पश्चात्ताप होत होता.
चमेली गुरगुरत होती तर हंसराज भराभर आवाज करून मालकाला बरंच कांही आपल्या भाषेत सांगत होता.
मालक म्हणाला, “ठीक आहे, ठीक आहे पण तुम्ही मित्र बनून शांततेने राहिलं पाहिजे.”
मग चमेलीला जवळ घेत तो म्हणाला, “आणि तू घाबरू नको. ते चांगले दोस्त आहेत. ते तुला त्रास नाही देणार.
अरे, तुला कांही तरी नाव द्यायला हवं. हं ! तुला आपण आंटी म्हणूया. ठीक आहे, आंटी !”
मग पुन्हा पुन्हा आंटी म्हणत तो बाहेर गेला.
चमेली बसली आणि पाहू लागली.
मन्या दरीवर डोळे मिटून झोपल्याच सोंग करत होता.
हंसराज पाय आपटत मान उंच करून भराभर कांहीतरी बोलतच होता.
तो हुशार असावा.
एक लांबलचक भाषण करून एक पाऊल मागे जाऊन आपल्याच भाषणावर खूष झाल्याचं दाखवायचा.
त्याच्या बोलण्याला गुर्रर्र ची साथ देत चमेली बसली होती.
मग ती उठली आणि तिने सर्व कोपरे हुंगले.
एका कोपऱ्यात एका वाडग्यांत पावाचे तुकडे आणि वाटाणे पडलेले होते.
चमेलीने दोन तुकडे खाल्ले.
आपलं खाणं चमेली खाते आहे म्हणून हंसराजला बिलकुल राग नाही आला.
तो अधिक उत्साहाने बोलू लागला व त्यानेही येऊन कांही वाटाणे खाल्ले.
कांही वेळानंतर तो इसम परत आला.
त्याने बरोबर कांहीतरी विचित्र वस्तु आणली होती.
ती दोनच्या आकड्यासारखी होती.
मधोमध दोरी बांधलेली घंटा होती.
तिथे एक पिस्तुलही होते.
त्याने ती वस्तु खोलीच्या मधोमध ठेवली.
मग त्याने हंसराजला बोलावले.
हंसराज पुढील आज्ञेची वाट पाहू लागला.
तो इसम म्हणाला, “हंसराज, प्रथम सर्वांना वांकून नमस्कार कर. व्यवस्थित.”
हंसराजने मान प्रथम उंच करून चारी बाजूना फिरवली मग पाय दुमडत मान झुकवली.”
तो इसम म्हणाला, “खूप छान ! आता मरून जा.”
लागलीच हंस पाठीवर उताणा झोपला व पाय वर करून पडला.
अशाच आणखी कांही गोष्टी करून दाखवल्यावर तो इसम ओरडला, “आग, आग, बचाव.”
हंसराज त्या वस्तूकडे गेला व दोरी धरून जोरजोरात घंटा हलवू लागला.
तो इसम खूष झाला.
त्याने हंसराजच्या मानेवरून मायेने हात फिरवला.
“शाब्बास, हंसराज. आता तू हिरे, सोन्याचे दागिने विकणारा व्यापारी आहेस.
तुझ्या दुकानात चोर घुसतात.
मग तू काय करशील ?”
हंसराजने जाऊन पिस्तुलाशी जोडलेला दोर ओढला.
मोठ्ठा आवाज झाला.
चमेलीला ह्या दोन्ही गोष्टी पाहून एवढा आनंद झाला की त्या चौकटीभोवती भुंकत ती गोल गोल फिरली.
तो इसम म्हणाला, “आंटी, बस. गडबड नको करूस.”
हंसराजचं काम अजून बाकी होतं.
आणखी एक तास त्या इसमाने त्याला गोल फिरायला लावलं.
वाटेत असलेल्या रींगमधून उड्या मारायच्या, मधेच बसायचे, वगैरे त्याला करायला लावत होता.
चमेलीला ते फार आवडलं.
एक-दोनदा तीही त्याच्या मागे फेरी मारून आली.
त्याने मोलकरणीला हाक मारून म्हटले ‘मारीयाला आण’.
थोड्याच वेळात एक वेगळाच आवाज खोलीत आला.
चमेली घाबरली नव्हती पण सुरक्षेसाठी त्या इसमाजवळ जाऊन बसली.
मोलकरणीने एक काळी डुक्करीण खोलीत आणली.
चमेलीच्या ओरडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आत येताच डुक्करीणीने बसून आपले दोन्ही पुढचे पाय उचलले व आनंद दाखवत हवेत हलवले.
ती मालकाला, हंसराजला व मन्याला पाहून खूष झाली होती.
ती हंसाच्या व मांजराच्या जवळ जाऊन आनंद दाखवून आली.
तिच्या हालचाली आणि आनंद पाहून चमेलीला वाटले हिच्यावर भुंकणं व्यर्थ आहे.
मालकाने ती चौकट बाजूला ठेवली व मन्याला हांक मारली, “मन्या, चला, आता पिरॅमिड करूया.
मन्या आळस झटकत अगदी नाईलाजाने पुढे आला आणि डुक्करीणीजवळ गेला.
मग मालकाने बराच वेळ तिघांना कांही समजावले व तो म्हणाला, “एक, दोन.. तीन.”
त्या बरोबर हंसराज उडी मारून डुक्कराच्या पाठीवर उभा राहिला.
मग अगदी कांही विशेष न केल्यासारखं दाखवत मन्या आधी उडी मारून डुक्करीणीच्या पाठीवर आणि मग हंसराजच्या पाठीवर जाऊन मागच्या दोन पायांवर उभा राहिला.
चमेली खूषीने भुंकू लागली.
मग अशाच कांही गोष्टी तो मालक त्या तिघांना शिकवत राहिला.
त्या दिवशीचा अभ्यास संपला.
चमेलीला वेळ कसा गेला तेंच कळलं नाही.
मोलकरीण येऊन डुक्करीणीला घेऊन गेली.
मन्या कांही झालंच नाही असं भासवत आपल्या दरीवर जाऊन झोपला.
रात्रीसाठी चमेलीची दरी पण त्याच खोलीत आणली गेली.
भरपूर खाऊन चमेली तिथेंच हंस आणि मन्या यांच्याबरोबर झोंपली.
असा एक महिना गेला.
चमेलीला भरपूर खायची संवय झाली होती.
तिने नवे आंटी हे नावही स्वीकारले होते.
तिला त्या मालकाची आणि नव्या सोबत्यांचीही संवय झाली होती.
दिवस आरामात चालले होते.
रोज सर्वात आधी हंसराज उठे व त्याचं अखंड बोलणं सुरू होई.
मग चमेली जागी होई.
चमेली त्याची वटवट ऐके.
लौकरच तिच्या लक्षांत आलं की तो उगीचच बडबडतो.
तशी ती त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करू लागली.
मन्या सर्वांत शेवटी जागा होई व तरीही डोळे मिटून पडून राही.
त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन “हे जग तुच्छ आहे” असा होता.
चमेली उठल्यावर सर्वत्र फिरून वास घेई.
तिला आणि मन्याला घरभर फिरायची परवानगी होती.
हंसराजला मात्र त्याच खोलीत रहावं लागे.
डुक्करीणीच घरं कुठे तरी बाहेर बागेत होतं.
मोलकरीण तिला फक्त सरावाच्या वेळी घेऊन येई. मालक उशीरा उठे.
उठल्यावर चहा घेऊन तो त्यांना नव्या गोष्टी शिकवत असे व सराव करून घेत असे.
रोज तीच तालीम.
तीन चार तासांनी मन्या थकून दारूड्यासारखा चाले तर हंसराज चोंच उघडून श्वास घेऊ लागे.
मालक सारखा कपाळावरचा घाम पुसे.
ती तालीम आणि जेवण चमेलीला आवडत होतं पण तिची संध्याकाळ खराब जाई.
रोज मालक संध्याकाळी हंसराज आणि मन्या दोघांना घेऊन बाहेर जाई.
चमेली तेव्हा कंटाळून नुसती पडून राही.
तिला व्हार्निशचा वास आठवे.
कांही माणसं आठवत.
तिची शेपटी हलू लागे.
मग परत ती निपचीत पडून राही.
तिची वाढ आता पूर्ण झाली होती आणि प्रकृतीही चांगली झाली होती.
एक दिवस मालक म्हणाला, “आंटी, आता तू पण कांही तरी काम करायला पाहिजे. तुला कलाकार व्हायचंय ना !”
त्याने तिला वेगवेगळ्या कसरती शिकवल्या.
मागच्या दोन पायांवर उभं रहाण्याचा पहिला धडा ती पटकन शिकली.
दुसऱ्या धड्यात मागच्या दोन पायांवर उभं राहून उंच उडी मारून मालकाच्या हातातले बिस्कीट खाऊ लागली.
मग ती नाच करायला शिकली, दोरीबरोबर गोल फिरू लागली, घंटा वाजवू लागली, पिस्तूलाचा बार काढू लागली आणि पिरॅमीडमधे मन्याची जागा घेऊ लागली.
ती भराभर शिकायची.
प्रत्येक गोष्ट केल्यानंतर भुंकून आनंद व्यक्त करायची.
तिचा मालक खूश होता.
तो म्हणे हिच्यात उपजत कला आहे.
खरी कलाकार आहे.
तिला ‘कला’ शब्द इतका आवडे की कला म्हटल्याबरोबर ती उडी मारत असे, जणू कांही ते तिचं नांव होतं.
एकदा चमेली अथवा आंटीला कुत्र्यांना पडावं असं स्वप्न पडलं.
ती धांवत होती व एक हमाल झाडू घेऊन तिचा पाठलाग करत होता.
ती दचकून उठली.
आजूबाजूला अंधार होता.
खोली कोंदट होती.
तिला काळोखाची भीती वाटत नसे पण आता ती भ्यायली व तिला भुंकावेसे वाटू लागले.
तिच्या मालकाने दुस-या खोलींत उसासा सोडलेला तिने ऐकला.
आदल्या दिवशी मन्याच्या वाटणीचा कबाब तिने मधेच पळवला होता व कपाटाआड दडवला होता.
त्याची तिला आठवण झाली पण रात्री अंधारात फिरायची मनाई होती.
मग झोपण्यासाठी तिने पुन्हा डोळे मिटले आणि अचानक हंसराजने किंचाळल्यासारखा विचित्र आवाज केला.
काय झालं तें न कळल्यामुळे तिने नुसतीच गुरगुर केली.
तिने परत जरा डुलकी घेतली.
स्वप्नांत दोन मोठे कुत्रे कांही तरी खात होते व तिच्यावर गुरगुरत होते.
एका शेतकऱ्याने त्यांना हांकलले मग ती तें खाऊ लागली.
एवढ्यात हंसराज पुन्हा जोरात किंचाळला.
आंटीला हंसराज ओरडतोय, हे लक्षांत आले नाही.
खोलींत कुणीतरी आलंय अशी तिची खात्री झाली.
ती भुंकू लागली.
बाहेर डुक्करीणही आवाज करत होती.
तिचा मालक हातात दिवटी घेऊन आला.
आंटीला खोलीत कुणी परका दिसला नाही.
हंसराज झोपला नव्हता.
त्याचे पंख पसरले होते व चोंच
उघडी होती.
तो खूप थकलेला दिसत होता.
मन्याही जागाच होता.
मालकाने विचारले, “हंसराज काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटत म्हणून ओरडतोयस?”
हंसराज गप्पच होता.
मालकाने थोडा वेळ त्याच्या मानेवरून हात फिरवला मग तो परत गेला.
पुन्हा काळोख झाला.
आंटी पुन्हा घाबरली.
कुणीतरी बाहेरचे खोलीत आहे असे तिला सारखे वाटत होते.
बाहेर डुक्करीणीची खुडबुड चालूच होती.
मन्याही अस्वस्थ होता.
सर्व गोष्टी चिंताजनक होत्या. पण कां?
मग कधी नव्हे तो मन्या जवळ येऊन तिचे पाय चाटू लागला.
तिनेही त्याला चाटले.
हंसराज पुन्हा किंचाळला.
मालक आत येत म्हणाला, “हंसराज,” हंसराज पंख पसरून गप्प पडून होता.
मालक त्याच्या बाजूला बसून हात फिरवत म्हणाला, “हंसराज, तूं मरत आहेस कां ? अरे देवा ! मी विसरलोच.
आज घोड्याने तुझ्यावर पाय दिला होता !”
आंटीला त्याचं बोलणं कळलं नाही पण मालकालाही कांही भयानक घडणार आहे, असे वाटतेंय, हे तिला समजले.
ती मालकाकडे पाहून भूंकू लागली.
मालक म्हणाला, “आंटी, हंसराज मृत्यूला सामोरा जातोय.
मृत्यू ह्या खोलींत आलाय ! आपण काय करणार ?”
मालक उदास होऊन बाहेर गेला.
घाबरलेली आंटी त्याच्याबरोबर बाहेर आली.
थोड्याच वेळांत मन्याही तिथे आला.
मालक सारखा, “काय करणार ?” म्हणत होता.
मग त्याने एका थाळ्यात पाणी भरलं आणि हंसराजपुढे ठेवलं, “पी, हंसराज !”
पण हंसराज पाणीही पिऊ शकत नव्हता.
मालकाने त्याची मान वाकवून चोच थाळ्याला टेकवली.
ती चोच तशीच तिथे राहिली.
हंसाने पंख जास्तच पसरले.
मालक म्हणाला, “कांहीच उपयोग नाही. हंसराज आपल्याला सोडून गेला.
माझ्या प्रिय मित्रा, किती बेत केले होते मी !
ह्या वसंत ऋतुंत तुला गांवी नेणार होतो गवतावर चालतांना तुझा रूबाब मला पहायचा होता. कां गेलास लवकर ?
आता तुझ्याशिवाय मी काय करू ?”
सकाळी येऊन माळी हंसराजला उचलून घेऊन गेला.
आंटी खोलीतून बाहेर आली.
कपाटाआड दडवलेला कबाबचा तुकडा तिथेच होता पण आंटीला तो खावासा वाटला नाही.
ती सोफ्याखाली जाऊन बसली.
एका संध्याकाळी मालक कांही ठरवून आत आला.
तो म्हणाला, “आंटी आज तू आमच्या बरोबर चल. आता पिरॅमिडमधे हंसराजची जागा तुला घ्यायचीय.”
मग तो स्वत:शीच बडबडू लागला.
“आज आपलं हसं होणार. आपण कांही तयारी केली नाही.
आपण तालमी पण नाही घेतल्या. छे !”
तो बाहेर जाण्याचा वेश करून आला होता.
त्याने मन्याला उचलून घेतले व तो म्हणाला, “आंटी चल.”
आंटी उठली आणि त्यांच्यामागून जाऊ लागली.
ते गाडीतून एका नव्याच जागी येऊन पोहोचले.
गाडीतून उतरल्यावर समोर मोठी खोलगट बशी उलटी करून ठेवली तर दिसेल अशा आकाराचं कापडाचं घर दिसत होतं.
त्यावर सर्व ठिकाणी दिवे होते.
प्रवेशद्वारावर खूपच रंगीत दिवे होते आणि माणसांची गर्दीही होती.
बरेच घोडेही दिसत होते.
पण आंटीला कुत्रे दिसत नव्हते.
आंटीला आणि मन्याला उचलून घेऊन मालक एका काळोख्या रस्त्याने आंत एका खोलीत गेला.
आंटीला जातांना एक खूपच मोठी खोली दिसली.
त्यांत माणसांची भीतीदायक गर्दी दिसत होती.
आंटी थोडी घाबरली.
मन्या जणू कांही बेफिकीर असल्यासारखा चेहरा करून होता.
त्या खोलीच्या पडद्यातूनही माणसांची गर्दी थोडी थोडी जाणवत होती.
खोलीत आल्यावर मालकाने दोघांना खाली उतरायला सांगितले.
त्याच्या हातांतून त्यांनी खाली उडी मारली.
त्या खोलीत एक टेबल होतं आणि एक स्टूल होतं.
मन्या जाऊन स्टूलाखाली बसला.
मालकाने आपला वेश बदलायला सुरूवात केली.
प्रथम डोक्यावर एक रंगीबेरंगी उंच टोपी घातली.
तोंडाला पांढरं कांही तरी फासलं.
मग जाड मिशा लावल्या.
भुवयांवर जाड भुंवया लावल्या.
मग फुलं फुलं असलेल्या कापडाची विचित्र पँट घातली.
ती बूटांवरून खाली येत होती.
आंटीने अशी पँट कधीच पाहिली नव्हती.
मग विचित्र रंगाचे साॅक्स घातले.
वर जाकीट घातलं.
त्यावर पाठी एक तारा होता.
तर पुढचा भाग रंगीत होता.
आंटीला विचित्र वाटत होते पण स्थितप्रज्ञ मन्याकडे पाहून तिला धीर वाटत होता.
आंत येऊन एक मुलगी मालकाला म्हणाली, “आतांचा एक खेळ झाला की तुमची वेळ. तयार रहा.”
त्यांचा मालक अस्वस्थ होता.
आज गोंधळ होणार अशी त्याला भीती वाटत होती.
ती मुलगी परत येऊन म्हणाली, “चला, तुमची वेळ झाली.”
मालक उठला, “आंटी, चल.”
असं म्हणतं त्याने मन्याला एका पेटीत घातले व ती पेटी हातांत घेतली.
आंटीला काय चाललंय ते कळत नव्हतं.
मालकाने तिलाही उचलली आणि पेटीत टाकली.
मन्या तिच्या पायांखालून सुटायसाठी प्रयत्न करू लागला.
ती पेटीच्या बाजूवर नखांनी कुरतडू लागली.
अंधारात तिला आवाज येऊ लागले.
मग मालकाचा मोठा आवाज आला, “नमस्कार, आम्ही आज परत आलो आहोत.”
लोकांचा आरडाओरड ऐकू आला.
मालक गर्दीच्यावर मोठा आवाज काढत म्हणाला, “ऐका.”
लोक शांत झाले.
“माझी काकी स्वर्गात गेली. जातांना ही पेटी मला देऊन गेली. पाहूया आपण पेटीत काय आहे ? बहुतेक खूप नोटा असतील. मलाही माहित नाही. उघडू ?”
त्याने पेटीच कुलुप काढून झाकण काढताच आंटीने व मन्याने खाली उडी मारली.
लोकांनी मोठा ओरडा केला.
आंटी घाबरली. ती भूंकत मालकाभोवती फिरू लागली.
मालक म्हणाला, “अरे हा तर मन्याकाका आणि ही आंटी. माझे नातलग.”
असं म्हणत मालक जमीनीवर उपडा पडला व मन्याला आणि तिला त्याने जवळ घेतले.
थोड्याच वेळांत आंटी त्याच्या हातून निसटून उभी राहिली.
त्याने जवळ घेतले म्हणून झालेला आनंद गिरक्या घेऊन दाखवू लागली.
तिला सभोंवताली चेहरे, चेहरे आणि चेहरेच दिसत होते.
बाक असे वर वर गेले होते आणि वरपर्यंत माणसे भरली होती.
“आंटी, आपण बसाल कां ?” आंटीला कळलं काय करायचं ते.
ती टूणकन उडी मारून एका खुर्चीवर बसली.
लोकांनी टाळ्या वाजवल्या, गिल्ला केला.
मालकाच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच माया होती पण तो हंसत होता, हातवारे करत होता.
आंटीला कळले की मालक खूष आहे.
तीही प्रेमाने मोठ्याने भुंकली.
मग मालक म्हणाला, “आंटी मी आणि मन्याकाका नाच करतो, तोपर्यंत तू बसून रहा.”
मग त्या दोघांचा बँडच्या तालावर नाच सुरू झाला.
मन्या त्यात मजा वाटत नसल्यासारखा पण शिकवल्याबरहुकुम नाचत होता.
त्यांच्या नाचाला लोकांनी खूप दाद दिली.
मग मालक आंटीला म्हणाला, “आंटी, आतां तू !”
त्याने एक बाजा खिशातून काढला व तोंडाला लावून तो वाजवू लागला.
आंटीला वाद्यवादन आवडत नसे.
ती चुळबुळ करू लागली. भुंकू लागली.
चारी बाजूनी त्याला लोकांनी दाद दिली.
त्याने एक वरचा सूर लावला आणि अचानक प्रेक्षकांमधून एक मुलगा मोठ्याने ओरडला, “आंटी ? ही आंटी नाही. ही तर चमेली ! चमेली !”
लगोलग बेवड्या कोंड्या सुताराचा आवाज आला, “ही आपली चमेलीच आहे. बबन्या ! ही चमेलीच ! चमेली !”
एकाने शिट्टी वाजवली. व दोघांनी परत हांक मारली, “चमेली, इकडे.. इकडे ये !”
आंटीने आवाजांच्या दिशेने पाहिलं.
उभे राहिलेल्या दोघांचे चेहरे तिला उजेडात दिसले.
एक कुरळ्या केसांच्या झिपऱ्यावाला बेवडा चेहरा तर दुसरा गुबगुबीत गालांचा गोल चेहरा.
तिला ओळख पटली.
ती धडपडत उठली, खूर्चीवरून खाली पडली, वाळूत कसंबसं तिने सांवरलं आणि पडत धडपडत त्या दोघांच्या दिशेने धांवू लागली.
लोकांनी मोठा आवाज केला.
पुन्हा बबन्याची हांक आली, “चमेली, चमेली.”
चमेलीने सर्कशीतल्या गोल कठडा ओलांडला लोकांच्या गर्दीत उडी घेतली.
सर्वांचे हात तिला पुढे पुढे जायला मदत करत होते.
ती ते हात चाटत होती.
चेहरे चाटत होती आणि वरच्या बाकांच्या, त्या आवाजांच्या, दिशेने जात होती.
शेवटी गॅलरीत बबन्याच्या हातांत ती विसावली.
अर्ध्या तासानंतर चमेली व्हार्निश आणि शिरस ह्यांचा वास येणाऱ्या माणसाच्या मागून चालत होती.
गटारापासून लांब कसं रहायचं, हे तिला ठाऊक होतं.
कोंड्या म्हणत होता. “किती पापी मी ! आणि चमेली तुलाही जरा अक्कल कमीच आहे.
माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
बाजूने बापाची टोपी घालून बबन्या चालत होता.
चमेलीला मागून चालतांना घामट कपड्यांतल्या त्यांच्या पाठी दिसत होत्या.
ती त्यांच्यामागून अशी अनंत काळ चालत आली होती व तिला वाटत होतं तिच्या आयुष्यांत त्यांत एका मिनिटाचाही कधी खंड पडला नव्हता.
तिला ती कळकट खोली, तो हंसराज, मन्या, ते चविष्ट जेवण, ती तालीम, ती सर्कस, हे सर्व आठवलं.
पण तिला अनेकदा पडणाऱ्या स्वप्नातलं तें एक घाणेरडं भयानक स्वप्न ह्या सदरांत तिने टाकून दिलं.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – काष्टंका

मूळ लेखक – अँटन चेकॉव्ह

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..