तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे?
मीही नाही रे पाहिलं
आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे
त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे
कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे
अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण
क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते
हरवतो तो न जाणो किती दिवस.
अगदी अगदी दडून बसतो
अवचित मग कधी कुठेतरी पुन्हा गवसतो कुठे बरं
गाभाऱ्यात मंद मंद समईसोबत दरवळत असतो
जीवाची शिवाशी भेट ठरवत असतो
कधीतरी कणकण होऊन ओंजळीतही उतरतो
पण निर्माता मात्र अजून देखिलाच नाही
चंदन एक अलौकिक परिमळ
नित्य नव्या जाणीवांसह पुन्हा पुन्हा भेटत राहतो
स्पर्शाविना तुझा सुगंध आसमंत भरून उरतो
चंदना एकदा तरी चांदण्यात तू मला कडकडून भेट
रंध्रातून श्वासात उतरून मीच होऊदे चंदनाचे बेट!!
— वर्षा कदम.
Leave a Reply