नवीन लेखन...

छंदपती

योग्य लक्ष न दिल्यास सर्व दुय्यम समजली जाणारी कामे कशी महत्वाची बनतात त्याचा हिशेब या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे .

एखादी चांगली गोष्ट आपल्याला येत नाही याचा आपल्याला गर्व कसा असू शकतो हे मला एक न उलगडणारे कोडे आहे. आमच्या नात्यात एका म्हाताऱ्या आईला “आमच्या बाळ्याला चहासुद्धा करता येत नाही हो ” याचा गर्व आहे. आणि पर्यायाने त्या बाळ्यालाही तसाच गर्व आहे . आईचे मी एकवेळ समजू शकतो ,कारण ती जुन्या पिढीतली, पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेली . पण या बाळ्याचे काय ? अर्थात, कोणाला कशाचा आणि का गर्व असेल सांगता येत नाही . एका महाभागाला तर ‘ आम्ही किती साधे, आम्हाला कशाचाच गर्व नाही ‘ याचाच गर्व आहे. असो. चहासुद्धा करता येत नाही मग स्वयंपाक, शिवणकाम वगैरे तर फारच दूर राहिले. पण या गोष्टी आपल्याला येत नसण्याचे तोटे आहेत. आणि याची गरज आपली आपल्यालाच जाणवली पाहिजे. आपला सुसंस्कृतपणा किंबहुना स्वसंस्कारिता जर शाबूत असेल तर नक्कीच. स्वयंपाक असो वा शिवणकाम, एखादी गोष्ट आपल्याला येत नाही ही गर्वाची नव्हे तर खेदाची गोष्ट आहे. त्यात मी पुरुष आहे वगैरे गोष्टी आता विसरायच्या. ते दिवस नाही राहिले आता. प्रत्येकाला ही सारी कामे (म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा – त्यात इंग्लिश आलेच – उत्तम अवगत असणे, पाककौशल्य , शिवणकला, सायकलिंग , ड्रायविंग, पोहणे वगैरे दुय्यम समजली जाणारी) आलीच पाहिजेत. याचे फायदे अनेक आहेत. खरे तर आता परिस्थिती अशी आहे की मुलींनाही या साऱ्या गोष्टी आल्या पाहिजेत हे सांगावे लागते. आज काल शाळा संपल्यानंतर  कॉलेजसाठी बऱ्याच  मुलांना आई बापाचें घर सोडून परक्या ठिकाणी जावे लागते. तेव्हा हे सारे अवांतर शिक्षणच मुलांच्या कामी येते. चहासुद्धा करता न येणाऱ्यांची  हालत तर विचारूच नये. हे सारे भारतात एकवेळ चालूनही जाते पण परदेशात जाणाऱ्या मुलांना या गोष्टी शिकल्याशिवाय काही पर्यायच नाही. अर्थात अति श्रीमंतांबद्दल मी काही म्हणत नाही . पैशाने बरेच साध्य होईल पण सारे नाही.

या दुय्यम कामांच्या शैक्षणिक गरजेची जाणीव असणे खूप आवश्यक आहे. कारणे अनेक आहेत जसे –

१. घरात पती-पत्नी दोघेही नोकरदार (आजकाल बहुतेक वेळा ) असले म्हणजे पुरुषांची आणि बायकांची अशी वेगळी (एक बाळंतपण सोडून) कामे असत नाहीत . त्यामुळे ही दुय्यम समजली जाणारी कामे (अगदी बेबी सीटिंग सुद्धा ) बरेचदा पुरुषांनाही करावी लागतात आणि यात काहीच गैर नाही.

२.  कोणती क्षुल्लक कामे, कधी केवळ येत नाहीत म्हणून गंभीर स्वरूप धारण करतील आणि आपल्याला मोठ्या संकटात टाकतील सांगता येत नाही. म्हणजेच कोणतीच कामे दुय्यम नसतात. असे समजणे हे आपल्या बालबुद्धीचेच (बुद्धिदौर्बल्याचे ) द्योतक आहे. थोडक्यात, ही कामे न येण्याचा मोठा फटका बसू नये म्हणून. नोकरी व शिक्षणासाठी घर सोडल्यावर हीच दुय्यम कामे महत्वाची बनतात.

३.  स्त्रीवर्गात आपली स्वीकारार्हता वाढविण्यासाठी

४. अनेक कामांमधील जाणकारी सर्वच ठिकाणी एक मेरिट/USP समजले जाते.

५. ही सारी कामे (कामचलाऊ तरी ) येणे अजिबात कठीण नाहीत, अगदी नक्की.

एकदा हे सारे मनापासून पटले म्हणजे त्या दिशेने आपली हालचाल आपोआपच सुरु होते.

शिवणकलेचे पद्धतशीर शिक्षण घेण्यासाठी अगदी टेलरिंग क्लासलाच गेले पाहिजे असे नाही. तसे या कुठल्याच कामांसाठी कुठल्या क्लासला जाण्याची गरज नसते. घरातील सिनियर सिटीझन किंवा जाणकार स्त्रिया हे काम हिरीरीने करतील, नक्की.

शिवणकला शिक्षण सुरु होते सुईत दोरा ओवण्यापासून. हा प्रकार चष्मेवाल्यांसाठी एक मोठे दिव्यच असते. सुईच्या भोकापेक्षा कितीही बारीक दोरा असला तरी ओवताना मला  नेहमीच मोठा वाटत आला आहे. दुर्दैवाने, सुईत दोरा ओवण्याची गरज हात शिलाई वा  मशीन शिलाई या दोन्हीत असतेच. शिवण्यासाठी शिवण यंत्र असल्यास सोन्याहून पिवळे. कपड्यांच्या उलटसुलट बाजू समजून शिवणे महत्वाचे. या साऱ्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत. पूर्वी शिवण हा विषय शाळेत शिकवला जात असे.  पण आता नाही.  असो. कपडे आल्टर करणे, बटणे लावणे, उसवलेले शिवणे, हातशिवण वगैरे व्यवस्थित जमले पाहिजे.

पाकशिक्षण हा एक छंदपती प्रकल्पाचाच एक भाग म्हणायचा. यासाठी साऱ्या परिचित स्त्रिया तुमच्यावर मदतीचा वर्षाव करतील याची खात्री बाळगा. तुमच्यासारख्याच्या पाककलेतल्या गुरु पदाची इच्छा बहुतेक स्त्रियांची असणारच. असो. पाक शिक्षणाचा प्रवास सोपे ते कठीण पदार्थ असा करावा. म्हणजे चहा , कॉफी, दही, भात, कोशिंबीर, चटणी, आमटी, भाजी (हे सर्व बेसिक पदार्थ झाले) हे पदार्थ करता आले पाहिजेतच. एक गोष्ट मान्य करावीच लागेल की साधे, सोपे वाटणारे पदार्थ जसे चहा ,कॉफी, भात, दही वगैरे सातत्याने चांगले बनवता येणे वाटते तेवढे सोपे नसते हे पाककुशल गृहिणीसुद्धा मान्य करतील. हे साधे ,सोपे पदार्थ चांगले करणे खूप खूप कठीण असते. भल्या भल्या पाक-कुशल, अनुभवी गृहिणींनाही हे सोपे जात नाही. अर्थात याचा अनुभव पुरुषांना (दुसऱ्याने बनवलेले खाणाऱ्या ) अधूनमधून येतच असतो. उदाहरणार्थ, चहा चांगला करायचा असल्यास दूध कोणते आणि किती गरम असावे, एका कपासाठी नेमके किती पाणी घालावे, चहा पावडर कोणती आणि किती घालावी, साखर किती  घालावी, चहा गाळण्या आधी किती वेळ थांबावे इत्यादी शेकडो तपशील नीटपणे तपासावे आणि तदनंतरच वापरावे लागतात. उत्तम भात, दही वगैरे पदार्थांचेही तसेच आहे. प्रत्येक भारतीय तिखट पदार्थामध्ये फोडणी (तडका) हा एक अत्यंत वैशिट्यपूर्ण आणि आवश्यक हिस्सा आहे. त्याची योग्य ती कदर करावी.

सर्वात आधी धान्ये ओळखता यावीत म्हणून धान्यांची ओळख परेड केली पाहिजे. काही काही डाळी ओळखणे वाटते तेवढे सोपे नसते हे तुम्हाला जाणवेलच. चणा डाळ आणि तूर डाळीत फरक समजायला लागला म्हणजे बाजी मारली असे समजावे. अर्थात हा सवयीचा प्रश्न आहे. या सर्व पदार्थांच्या रेसिपी आपापल्या चॉइसनुसार वेगवेगळ्या असतात . त्या आपापल्या मतीनुसार आत्मसात कराव्या. बनवलेल्या पदार्थाची चव घेऊन बघणे केव्हाही इष्टच . एकच अडचण असते –  स्वयंपाक करताना फार उकडते हा स्वानुभव आहे  . आजकाल यू ट्यूब मुळे पाककृती शिकणे सोपे झाले आहे. नव्या पिढीचा यू ट्यूब आद्य गुरु बनला आहे  साऱ्या प्रश्नांचा एकमेव वाली – इंटरनेट.

शेवटचे आणि सर्वात महत्वपूर्ण आहे ते इंग्रजी भाषेत तरबेज असणे.

इंग्लिश सोडून इतर माध्यमातून ज्यांचे शालेय शिक्षण झाले आहे त्यांना कॉलेजात गेल्यावर या भाषा-मर्यादेचे सर्वदूर पडसाद जाणवू लागतात. काही पालकांची पाल्याचे गणित , शास्त्र हे विषय उत्तम असले म्हणजे झाले अशी भावना असते.  म्हणजे गणित , शास्त्र हे ‘अधिपती’ विषय आणि भाषा म्हणजे ‘छंदपती’ (दुय्यम महत्व असलेला , एक छंद म्हणून करण्याचा) विषय ही भावना. भाषेचे महत्व ते स्वतःच जाणत नसतील तर मुलांना कुठून कळावे. ही त्यांची मोठीच घोडचूक ठरते. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा ही भाषिक मर्यादा पाय खेचून घेते, कधीकधी लोकांच्या टिंगलीचा विषयही होते.

भाषा (इंग्लिश) का चांगली असावी ?

  1. जगाच्या बऱ्याच भागात इंग्रजीचे आजमितीलाही प्रस्थ आहे
  2. आपल्याला हवा असलेला मजकूर योग्य आणि अचूक भाषेत मांडता येणे नेहमीच गरजेचे असते .
  3. हुद्दा वाढेल तसे भाषा उत्तम असणे हे अध्यरूत आणि अत्यावश्यक समजले जाते.
  4. पत्रव्यवहार, ऑडिट रिपोर्ट्स , ई-मेल , प्रेझेन्टेशन हे सारेच भाषावलंबी आहे.
  5. भाषा चांगली असण्यामुळे एक चांगला प्रभाव पडतो .

हे सारे विवेचन अशासाठी की भाषा उत्तम येणे हे गणित, शास्त्र यांच्या इतकेच महत्वाचे आहे. कारण गणित, शास्त्र हे विषय ज्या वाहनातून प्रवास करतात ते वाहन भाषेचेच असते. भाषा सुदृढ आणि वेगवान असेल तरच या ‘अधिपती’ विषयांची प्रगती होईल, हे पटतेय ना ?

ही भाषा सुधार मोहीम जितक्या लवकर हाती घेऊ तेवढे चांगले.  एक कृती मसूदा (इंग्रजी वर्तमान पत्र घेऊन ते वाचणे-जाहिराती वाचल्या तरी चालतील , डिक्शनरी जवळ बाळगणे , शब्दार्थ पाहणे , ते पाठ करणे, इंग्रजी कादंबऱ्या वाचणे , इंग्रजी चित्रपट पाहणे, जो आपल्या भाषा प्रयोगाला हसणार नाही आणि मदतच करेल अशा व्यक्तीच्या संपर्कात राहणे वगैरे ) तयार करून  त्यानुसार पावले टाकत जावी. हे सर्व सहा महिने नेटाने केले तर त्याचा योग्य तो परिणाम दिसू लागेल. कंपनीत किंवा आपल्या संपर्कातील व्यक्तींमध्ये तुमचा एक भाषा कुशल म्हणून बोलबाला होईल. त्या संबंधातील कामे येऊ लागतील, लेखनाची योग्य ती आणि योग्य त्या व्यक्तींकडून प्रशंसाही होईल. एक माझा अनुभव  सांगावासा वाटतो – कंपनीतल्या काहींनी माझ्या इमेल्स साठी (माझी भाषा चांगली असते म्हणून) एक वेगळा फोल्डर बनवला आहे.  या साऱ्या गोष्टी खूप खूप आनंददायी असतात आणि हा माझा अनुभव आहे. थोडक्यात तुमचा छंदपती ते अधिपती हा प्रवास निर्विघ्नपणे सुरु होईल.

सारांशाने एकच सांगावेसे वाटते, या साऱ्या कौशल्यांना (म्हणजे भाषाकौशल्य, पाककौशल्य , शिवणकला, सायकलिंग , ड्रायविंग, पोहणे वगैरे) आपण बरेच जण नेहमीच दुय्यमत्व देत आलो आहोत. या  घोडचुकीचे परिमार्जन करण्यासाठी मी आता त्याचे योग्य ते आणि योग्य त्या मार्गांनी प्रमोशन करायचे निश्चित केले आहे. पैकी लेखनाद्वारे  विचार मांडण्याच्या पहिल्या मार्गावर तर मी आधीच मार्गस्थ झालो आहे . पाहू पुढे कसे आणि किती यश मिळते ते.

— राजेश कुलकर्णी
मोबाइल : 9969379568

(लेखक एक निवृत्त व्यवस्थापक असून अनेक कंपन्यांशी क्वालिटी आणि हेल्थ, सेफ्टी सल्लागार म्हणून कार्यरत आहे. )

राजेश कुलकर्णी
About राजेश कुलकर्णी 5 Articles
मी एक निवृत्त मेकॅनिकल इंजिनीयर आणि सेफ्टी इंजिनीयर असून काही कंपन्यांचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. लिखाण, संगीत, लोगो डीजाईन, पेंटिंग वगैरे मध्ये मला रूची आहे. क्वालिटी, आरोग्य, औद्योगिक सुरक्षितता व पर्यावरण या क्षेत्रातील एक जाणकार अभ्यासक, विश्लेषक आणि कंपनी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. (संपर्क भ्रमण ध्वनि – ९९६९३७९५६८)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..