प्रकरण २
“माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे “., रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय “, ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता.
एखादा माणूस त्याला म्हणायचा –
“ए चंदर , काय करायची रं तुला शाळा न फाळा !, जा की चुपचाप ढोरं वळायला ..!
हे असलं बोलणे ऐकून चन्दरचा चेहेरा रडवेला होऊन जायचा .
बापूच्या बरोबर शेताकडे जाणे त्याने सोडून दिले, दुसऱ्या गावाला शाळेसाठी जाणाऱ्या पोरांना तो बस थांबायची त्या फाट्या पर्यंत सोडायला जाऊ लागला .
चालता चालता एखाद्या पोराच्या दप्तर घेऊन ,त्यातले पुस्तक तो काढून घेत त्या मुलाला विचारायचा – हे चित्र कशाचे हाय ? , त्याच्या खाली काय काय लिवलाय ते सांग की मला .
चंदरची अशी भुणभुण ऐकून पोरं कंटाळून म्हणायची ..
ए चंदर – तुला काय करायची रे शाळा ? ,शेतात जा , तिथे लई काम पडलय तुझ्यासाठी , शेणाचे गोळे करीत बसं..!
पोरांचे हे शब्द ऐकून चंदरला खूप वाईट वाटायचे .
आपण शाळेसाठी एवढा जीव तोडतोय ; पण ते कुणाला खरे का वाटत नाही ? हा प्रश्न त्याला भंडावून सोडायचा .
“गावातील पोरांनी जनावरांना घेऊन माळावर जायचे ” , हीच गोष्ट जणू साऱ्यांना कळत होती. त्याच्याशिवाय पोरांना दुसर काही पाहिजे “, हे मानायला कुणी तयारच नव्हते.
फाट्यावर जाऊन बस येई पर्यंत चंदर थांबायचा , पोरांना शाळेसाठी घेऊन जाणाऱ्या त्या गाडी कडे डोळे भरून पाहत राहायचा. या गोष्टीचा जणू नादच लागला .
आपण मात्र अजून गावातच आहोत, आपल्याला कुणी शाळेत जाऊ देत नाही , “अजून तू लहान आहेस “, असे बोलून गप्प बसवतात . ही आठवलं की चंदरला अधिकच वाईट वाटायचे.
घरात आलेल्या चंदर कडे पाहून आई त्याला म्हणाली –
अरे चंदर , तुझ्या डोळ्यात पाणी कशापायी आलं रे ?, कुणी काही बोललं का तुला ?
आईने विचारले, पण चंदर मात्र चुपचाप बसून राहिला, तेंव्हा मात्र आईला त्याच्या नाराज होण्याचं कारण कळून आलं .
इतका वेळ बाहेर गेलेला बापू घरी आला . चंदर जवळ बसत तो म्हणाला –
“चंदर काय झालं रे तुला ? , असं गप का बसलास एक्या जागी हां ?
” बापू , मी शाळेत जायाचं म्हटल्यावर, समदेजण मला हस्त्याती पुना वर म्हणत्यात – चंदर – तू फक्त ढोरं घेऊन जा माळावर.
हे ऐकून बापूने चंदरच्या आईला म्हटले –
गिरजे –
या येड्या पोराला कसं उमजत न्हाई; ह्याच्यासाठी शाळा नाही गावात. आणि याच्या डोक्यात तर शाळेचं खूळ पक्कं बसलय .
गिरीजा मात्र आपल्या पोराला म्हणाली –
“चंदर, कुणी कायी बी म्हणू दे,!, तू ध्यान नग देऊ देऊस कुणाकडे, गावात शाळा सुरु झाल्यावर अदुगर तुला पाठवू आम्ही शाळेत !, मग तर झालं ?
या खुलाशावर चंदरने समाधानाने मान डोलावली. मग गप्पा करीत त्याचे जेवण झाले. अंगणात टाकलेल्या बाजेवर पडल्या बरोबर चंदर पेंगू लागला .
चंदरला झोप लागलेली पाहून गिरीजा बापूला म्हणाली –
“धनी , या पोराच्या मनाचा मला तर काही ठाव लागत नाही, जवा पाहावं तवा शाळा शाळा “करीत असतो.
आपल्यासारख्या आडाण्याच्या पोटी कशाला जल्म्ला ह्यो ?, दुसऱ्याच्या पोटी जल्माला असता तर शाळा शिकलं असतं हे पोरगं . !.
झोपी गेलेल्या चंदरच्या पाठीवरून हात फिरवीत बापू गिरिजेला सांगू लागला –
” अस काय बी बोलू नगस ! , आपलं नशीब चांगलं असलं पाहिजे तवाच ह्यो चंदर या घरात जल्मला बग !,
ह्या चंदरचं सगळचं लई न्यारं हाय , बाकी पोरा सारखे काही अवगुण ह्याच्यात दिसत न्हाईत !,
हे बघ गिरिजे , आपल्या गावात जर शाळा सुरु झाली ना , तर , चंदरच्या शाळेच्या आड आपण दोघांनी बी यायचं न्हाई . !
गाढ झोपेत असलेल्या चंदरच्या गालाचा मुका घेत गिरीजा म्हणाली –
“व्हाय धनी , तुमी जस्स म्हणाल तस्सच मी करीन. माज्या चंदरला खूप खूप शिकवू या आपण .
मग , चंदरच्याच शाळेचा विचार करीत करीत बापू आणि गिरीजा केंव्हा तरी झोपी गेले .
सकाळी चंदर उठला , गिरीजा रोजच त्याच्या अगोदर उठायची , तिची कामं सुरु व्हायची .सडा- सारवण करून झाल्यामुळे घर कसे लक्ख दिसत होते. समोरच्या अंगणातली झाडझूड केली होती .
कोपऱ्या -कोपऱ्यात छान फुल झाडी लावलेली होती. त्यातले एक टप्पोर -लाल गुलाबाचे झाड स्वतहा चंदर ने लावलेले होते, ह्या झाडाला तो आठवणीनी पाणी द्यायचा .
दात घासीत घाशीत चंदर गुलाबाच्या झाडाजवळ आला , लाल गुलाबाचे फुल दाखवीत तो म्हणाला –
आये , गुलाब म्हणजे साऱ्या फुलांचा राजा असतो ” !
गिरीजा त्याचे हे सांगणे कौतुकाने ऐकत होती.
शेताकडे जाण्यासाठी बापू निघालाच होता, एव्हढ्यात वाड्यावरचा गडी , घरात येत म्हणाला –
बापू, मालकांचा निरोप हाय तुज्यासाठी , अर्जंट निघायचं बघ आणि हो , तुज्यासंग चंदरला बी घेऊन ये “, असे मालकांनी सांगितलाय .’!
हे वाक्य चंदर च्या कानात शिरले तसा तो पटकन बाहेर आला अन म्हणाला ,
बापू, थांब जरा , अंघुळ करून मी बी तुज्यासंग आलोच .
बापू आणि चंदर वाड्यावर आले. बैठकी समोर उभे राहिले.रावसाहेब आधीच येऊन बसलेले होते , त्यांच्या शेजारी बसलेला माणूस मात्र ओळखीचा नव्हता .
“नवे गुरुजी तर आले नसतील हे ? “,
कल्पनेने चंदरच्या छातीत धड धड होणे सुरु झाले होते .
बापूला बसण्याची खुण करीत रावसाहेब म्हणाले -,
बापू , हे आहेत आपले नवे गुरुजी , आता त्यांची व्यवस्था पहाण्याच काम तुझे असणार आहे . सगळं ठाकठीक आहे की नाही हे तू रोजच पहायचं आहे !.
नव्या गुरुजीकडे पाहतांना चंदर मनात म्हणत होता –
“हे गुरुजी तर लई लहान दिसतंय की , ह्यांच्या हातून शाळा कशी सुरु होईल बापा ?
त्याचवेळी चंदर कडे बोट दाखवीत रावसाहेबमालक गुरुजींना सांगू लागले –
“गुरुजी – या गावातला तयार असलेला तुमचा एकमेव विद्यार्थी म्हणजे आमचा हा चंदर.
तुमची शाळा कधीही सुरु करा , त्या अगोदर हा चंदर विद्यार्थी म्हणून तुमची कवाची
वाट पाहतो आहे.
रावसाहेब अशी ओळख करून देत असतांना – चंदरने नव्या गुरुजींना वाकून नमस्कार केला .
ते पाहून रावसाहेबांना त्याचे मोठे कौतुक वाटले, ते म्हणाले –
वा रे ,शाबास चंदर – शाळेत न जाता , कुठं शिकला रे तू एवढ ?
काही न बोलता चंदर चुपचाप कोपऱ्यात उभा होता .
रावसाहेब बापूला सांगू लागले –
“बापू , आपल्या पंचायतीच्या बाजूच्या दोन खोल्या रिकाम्या करून घ्यायच्या आणि गुरुजींना द्यायच्या , त्यांना काही समान -सुमान लागले तर ते वाड्यावर येऊन घेऊन जायचं .
समजल का सगळं ?
रावसाहेबांनी सांगितलेलं सर्व समजलं -म्हणत बापूने मान डोलावली आणि गुरुजींना म्हणाला –
चला गुरुजी , तुमच्या घराकडे जाऊ या, आता तुमच्यासाठी सामान लावायला पाहिजे.”,
गुरुजी आणि बापू ,त्यांच्या मागेमागे चंदर चालत होता . त्याच्या चेहेऱ्यावर आज एक वेगळाच आनंद दिसत होता . देवाने त्याची प्रार्थना ऐकूनच गुरुजींना पाठवल असाव .
आता शाळा सुरु होणार हे नक्की , पण, कवा होतीय कुणास ठाऊक ?
चंदरची उत्सुकता जास्तच वाढत चालली होती .
सकाळच्या वेळी गावात चाल-पहल दिसत होती. शेतावर जाणाऱ्या गडी- माणसांची लगबग सुरु झाली होती . याच बरोबरीला – घरासमोरच्या ओट्यावर बसून सकाळच्या उन्हात चहाच्या बरोबर वायफळ गप्पा करीत बसलेली मंडळी मोठ्या फुरसती मध्ये होती
.
एखाद्या घरातून आलेला न्याहरीच्या भाकरी भाजण्याचा खरपूस वास नाकात शिरून गुदगुल्या करीत होता त्या सोबत हिरव्या मिरच्याचा ठेचा “,त्याचा खमंग वास तोंडाला पाणी सोडीत होता .
दारासमोर उभ्या असलेल्या रिकाम्या बैल-गाडीत बसून बारकी-बारकी पोरं चिपाड -काड्या जमवून गाडी-गाडीचा खेळ खेळत होती. आणि गाडीच्या जोताला बांधून ठेवलेली बैल जोडी समोर पडलेल्या चिपाडाचा रवंथ करून करून कंटाळून गेली होती .आता त्यांची शेताकडे जाण्याची वेळ झालेली होती .
अशा सकाळच्या वेळी रस्त्याने जाणऱ्या बापू आणि गुरुजीकडे पहाणारे कुजबुजू लागले –
” नवा मास्तर आलेला दिसतोय की..
काय उजेड पाडणार ते दिसेल की ..
पर मी म्हणतो- शाळा पाहिजेच कशा पायी ?
पोरं शाळात गेल्यावर कामं कुणी करायची ?
असे एक ना दोन आवाज -तिथून जाणाऱ्या गुरुजींच्या ,बापूच्या आणि चंदरच्या कानावर पडत होते .
हे ऐकून – या गावात शाळा सुरु करणे ” , हे आपण समजलो तेव्हढी सोपी गोष्ट नाहीये ” याचा अंदाज पहिल्याच दिवशी येऊ लागला .
गुरुजी मनाशी विचार करू लागले – काहीही होवो , शाळा तर सुरु करायचीच .
त्यांनी मागे वळून पाहिले ..त्यांचा एकमेव विद्यार्थी .चंदर –
एखाद्या कोकरा सारखा उड्या मारीत त्यांच्या मागे मागे येत होता …!
(क्रमश:)
— अरुण वि.देशपांडे