चंदेरी दुनियेत नेहमीच धमाल किस्से घडत असतात.. कधी ते हिरो हिरोईनचे तर कधी तंत्रज्ञांचे असतात. माझे परममित्र, ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेले काही किस्से मी इथे सादर करीत आहे..
हा किस्सा आहे एका सुंदर हिराॅईनचा! त्यावेळी ती सुपरस्टार होती. तिला शुटींगच्या दरम्यान, सॅण्डविच खाण्याची सवय होती. बरं ते सॅण्डविच तिला स्टुडिओच्या कॅंन्टीनमधले नको असायचे.. तर एका सुप्रसिद्ध हाॅटेलमधून मागवले तरच आवडायचे. ते सॅण्डविच आणण्यासाठी प्राॅडक्शन मॅनेजरला, एखाद्या स्पाॅटबाॅयला टॅक्सीने त्या हाॅटेलवर पाठवावे लागायचे. सहाजिकच ते सॅण्डविच ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ व्हायचे. त्या शुटींगचा प्राॅडक्शन मॅनेजर हुशार होता, त्यानं शक्कल लढवली. तो त्या सुप्रसिद्ध हाॅटेलमध्ये गेला. तिथल्या मॅनेजरशी गोड बोलून, त्याच्यावर आपली छाप पाडली. त्याला सांगितले की, आम्हाला तुमच्या हाॅटेलमध्ये शुटींग करायचं आहे, तुम्हाला चालेल का? मॅनेजर खुष झाला. त्याने होकार दिला. पुढे प्राॅडक्शन मॅनेजरने त्याच्याकडे सॅण्डविचचे काही रिकामे बाॅक्स मागितले, ज्या बाॅक्सवर हाॅटेलचे नाव छापलेले होते. त्याने वेटरला सांगून रिकाम्या बाॅक्सचं एक मोठं पार्सल लगेच आणून दिलं. प्राॅडक्शन मॅनेजरने त्याला शुटींगसाठी लवकरच येण्याचं प्राॅमिस करुन स्टुडिओ गाठला.. आता त्या हिराॅईनला स्टुडिओच्या कॅंन्टीनमधलाच सॅण्डविच त्या सुप्रसिद्ध हाॅटेलच्या बाॅक्समधून दिला जाऊ लागला.. हिराॅईन खुष, तर शुटींग पुश!!! ती हिराॅईन होती, लीना चंदावरकर!
‘कुवाॅंरा बाप’ चित्रपटातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग होतं.. गाण्याचे बोल होते, ‘मैं हूॅं घोडा, ये है गाडी…’ गायक अर्थातच किशोर कुमार! रेकॉर्डिंगला सुरुवात झाली.. किशोरजींना राहून राहून वाटत होतं की, आपल्याला हवं तसं गाणं होत नाहीये.. त्यांनी रेकॉर्डिंग थांबवलं व स्टुडिओमध्ये एका सायकलची मागणी केली. काही वेळातच सायकल हजर केली गेली. सायकलची दोन्ही चाकं एकाच जागी फिरत राहतील व सायकलवर बसणाऱ्याला पायंडलही मारता येईल अशी व्यवस्था केली गेली. किशोरजी उत्साहाने सायकलवर बसले व पायंडल मारत मारत त्यांनी गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण केले!! आजही तुम्ही ते गाणे युट्यूबवर पहाल किंवा ऐकाल तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवेल की, किशोरजींनी पायंडल मारता मारता ते गाणं गायल्यामुळे त्या आवाजातही ती सायकलची लय आलेली आहे! असा बुद्धिमान व अतरंगी गायक पुन्हा न होणे…
‘रामायण’ मालिकेची निर्मिती करणारे, रामानंद सागर हे त्याआधी अनेक यशस्वी चित्रपटांचेही निर्माते होते. त्यांच्या आॅफिसवर मोठमोठे दिग्गज तंत्रज्ञ व कलाकारांची मैफल जमत असे. त्यांच्या ड्रायव्हरला सागरजींच्या खाजगी गोष्टीही माहीत होत्या. हा किस्सा ज्या दिवशी घडला, त्या दिवशी नेमका नेहमीचा ड्रायव्हर रजेवर होता. त्याने दुसऱ्या एका ड्रायव्हरला आपल्या ऐवजी सागरजींचे काम करायला सांगितले होते. रामानंद यांची मैफल सुरु झाली. बऱ्याच वेळानंतर सागरजींना आपली मैत्रीण, कुमकुमची आठवण झाली.. त्यांनी ड्रायव्हरला फर्मान सोडले, ‘जाओ, और मॅडम को लेके आओ..’ ड्रायव्हरला मॅडम म्हणजे, रामानंदजी यांची पत्नीच वाटली.. तो तडक त्यांच्या घरी गेला व पत्नीला कारमधून घेऊन आला. वाटेत येताना पत्नीला राहून राहून आश्चर्य वाटत होतं की, आजपर्यंत मला यांनी असं कधीच बोलावलं नाही, आजच यांना असं काय झालंय? रंगात आलेल्या मैफिलीत ड्रायव्हरने आपल्या पत्नीला आणलेलं पाहून रामानंद चपापले.. त्यांनी अक्कलहुशारीनं, तिचं स्वागत केलं व मित्रमंडळींना रजा देऊन तिच्यासोबत शाॅपिंगला बाहेर पडले.. पत्नी तर खुष झालीच व रामानंद यांनी स्वतःच्या प्रसंगावधानाबद्दल स्वतःची पाठही थोपटून घेतली!!!
‘मशाल’ चित्रपटाचं, स्टुडिओत शुटिंग सुरु होतं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना शुटींगच्या ब्रेकमध्ये, पॅकअप नंतर पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली.. त्यांनी सुबोधजींना विचारले, चांगली पाणीपुरी कुठे मिळते? सुबोधजींना आठवले, वरळी सी फेसला एका भैय्याकडे अप्रतिम पाणीपुरी मिळते. पॅकअप झाले.. एका कारमध्ये ड्रायव्हर शेजारी सुबोधजी, मागे दिलीपजी व त्यांचे सेक्रेटरी बसले. कार निघाली, वाटेत सेक्रेटरीला आपण कुठे चाललो आहोत हे माहीत नसल्याने त्याने विचारले, ‘हम कहाॅं जा रहे है?’ दिलीपजी म्हणाले, ‘ये आगे बैठा हुवा जो मेरा दोस्त है ना, वो जहाॅं लेके जाएगा.. हम चुपचाप जाऐंगे’.. सुबोधजींनी पाणीपुरीवाल्याला पाहून, कार अलीकडेच थांबवली आणि त्याच्याकडे गेले. त्याला सांगितले, ‘मी माझ्या मित्रांना घेऊन आलो आहे. तू पाणीपुरी देताना, त्या मोजत बसू नकोस.. फक्त देत रहा..’ सुबोधजींनी दिलीपजींना व त्या सेक्रेटरीला बोलावले. भैय्या, दिलीपजींना पाहून चक्रावून गेला, ज्यांना आपण लहानपणापासून पडद्यावर पहात होतो ती व्यक्ती प्रत्यक्षात समोर!! त्याने पाणीपुरी देण्यास सुरुवात केली. ड्रायव्हरसह चौघांनी यथेच्छ पाणीपुरी खाऊन घेतली. सुबोधजींनी भैय्याला बिल विचारले.. त्याने सत्तर रुपये सांगितले. दिलीपजींनी शंभराच्या दोन नोटा भैय्याला दिल्या. सर्वजण कारमध्ये बसले व निघाले… सेलेब्रिटींना सर्वसामान्य माणसांप्रमाणे जीवनाचा आनंद घेणं फार अवघड असतं.. सुबोधजींमुळे, दिलीपजींना पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेता आला….
– सुरेश नावडकर
मो. ९७३००३४२८४
Leave a Reply