आज ज्यांचं वय साठ वर्षांहून अधिक आहे, त्यांनी ‘चांदोबा’ हे लहान मुलांचं मासिक नक्कीच एकदातरी वाचलेलं आहे. १९५२ च्या एप्रिल महिन्यात ‘चांदोबा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. संपादक प्रशांत यांनी एकूण बारा भाषांमधून ‘चांदोबा’ प्रकाशित केले आणि भारतातील करोडों आबालवृद्धांचे आजतागायत मनोरंजन केले.
आमच्या पिढीला तिसऱ्या इयत्तेत असल्यापासून या मासिकाचे आकर्षण वाटू लागले. त्यावेळी पन्नास पैशात हे मासिक मिळायचे. साधारण वहीच्याच आकाराच्या या मासिकानं जी वाचनाची आवड निर्माण केली त्याला तोड नाही.
‘चांदोबा’नं रामायणातील व महाभारतातील, पुराणातील अनेक गोष्टी तपशीलवार वाचायला दिल्या. परोपकाराच्या, नीतिच्या, चातुर्याच्या गोष्टींनी बालमनावर उत्तम संस्कार केले. या अंकाचे सर्वात मोठं आकर्षण असायचं ते ‘विक्रम वेताळ’ च्या गोष्टीचं! ती गोष्ट वाचल्यानंतर वेताळानं राजाच्या प्रश्नांला दिलेली उत्तरं पुरेपूर पटायची. अंकांच्या शेवटी जगातल्या आश्र्चर्यकारक वास्तूची सचित्र माहिती दिलेली असायची. त्यानंतर जोडफोटोचं एक पान असायचं. एकाच विषयावरचे दोन फोटो आणि त्याखाली शीर्षक किंवा एखादी काव्यपंक्ती असायची. काही गोष्टी क्रमशः चालू असायच्या. त्या कथांमधील पात्रांची नावं महाराष्ट्रीयनच वाटायची. हातात आल्यानंतर एका बैठकीत अंक वाचून काढला जात असे.
‘चांदोबा’ या सर्वाधिक खपाच्या मासिकाला आपल्या सुंदर चित्रांनी सजविणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांनी जवळपास पन्नास वर्षांहून अधिक काळ ‘चांदोबा’साठी चित्रं काढली. त्यातील वेताळाला पाठीवर टाकून हातात तलवार घेऊन निघालेला विक्रम कोणीही विसरु शकणार नाही. त्यांची चित्रे शालीन होती. साडी किंवा परकर पोलक्यामधील मुली, स्त्रिया, वृद्धा नेहमीच संस्कारी दिसायच्या. पुरुषमंडळी झब्बा, धोतर किंवा सुरवारमध्ये असायचे. केसांचा भांग हा राजकुमारासारखा असायचा. चित्रांमधील पात्र सौष्ठवपूर्ण असायची. अंकातील चित्रांची मांडणी टिपिकल असायची. उजव्या व डाव्या बाजूची चित्रं फ्लॅशकट असायची. अंकांच्या मधले चित्र फुलपेज असायचे. तेच बहुधा मुखपृष्ठावर वापरले जायचे.
दहावी झाल्यानंतर अभ्यासाच्या कारणाने ‘चांदोबा’ निंबोणीच्या झाडामागे लपला. त्याचं दरम्यान वेताळकथांची काॅमिक्स आली. अमर चित्र कथांची काॅमिक्स आली.
आमची पिढी मोठी झाली. टीव्ही झाला आणि मुलांचं वाचन कमी झालं. नंतर चॅनेल्स वाढली. मुलांसाठी चोवीस तास कार्टून, काॅमिक्स, गोष्टींची भारतीय व परदेशी वाहिन्या सुरू झाल्या. काही वर्षांनंतर हेच मोबाईलवर पहायला मिळू लागले. साहजिकच मुलांना वाचायला मासिक हातात घेणे नकोसे वाटू लागले.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता ‘चांदोबा’चे सर्व अंक पीडीएफ स्वरुपात इंटरनेटवर पहायला मिळू शकतात. तरीदेखील त्याकाळी मित्राकडून वाचायला आणलेला ‘चांदोबा’चा जुना अंक मनोरंजनाचा खजिना वाटायचा….गेले ते दिवस…..गेले ते थोर चित्रकार के. सी. शिवशंकर….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३०-९-२०.
Leave a Reply