नवीन लेखन...

जेष्ठ मराठी नाट्य अभिनेते आणि गायक चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर

डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅाण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेगवेकर हे त्यांचे वडील. . त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.

चंडू डेगवेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले. त्यांची ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली आणि त्याणी डेग्वेकरांचे नाव नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेत डेग्वेकरांना बोलाविले आणि ते ‘ललितकलादर्श’शी कायमचे जोडले गेले . ‘पंडितराज जगन्नाथ’ या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखाँच्या इरसाल भूमिकेत गायलेले ‘इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर’ हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.पंडितराज जगन्नाेथमध्ये कलंदरखाँची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर ‘ललितकलादर्श’च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेगवेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्ना’थ या नाटकातली भूमिका वठवली. पुढे ‘बावनखणी’ या नाटकापर्यंत चंदू डेगवेकर हे ‘ललितकलादर्श’चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या ‘रक्त नको मज प्रेम हवे’ या गद्य नाटकात ते नायक होते.

‘दुरितांचे तिमिर जावो’मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. ‘मदनाची मंजिरी’मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. ‘मंदारमाला’ या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. ‘जय जय गौरी शंकर’ नाटकात ते ‘नारायणा रमारमणा’ आणि ‘भरे मनात सुंदरा’ ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी ‘सौभद्र’पासून ‘स्वरसम्राज्ञी’ पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.

चंदू डेगवेकर हे दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत असत.
डेगवेकर यांनी त्या काळात नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी व प्रयोग केले. चित्रपटात काम करण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती. पण चित्रीकरणासाठी अनेक दिवस मुंबईबाहेर जावे लागेल आणि नोकरी करत असताना ते शक्य होणार नाही म्हणून ते चित्रपटाकडे वळलेच नाहीत.

डेगवेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटीक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेगवेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतूनतसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. डेगवेकर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या ‘जीवनगौरव’पुरस्कारासह गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार, नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. नव्या पिढीकडून बसवून घेतलेली जुनी संगीत नाटके हे डेगवेकर यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे. विशेष म्हणजे ही नाटके बसविण्यासाठी, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या त्या संगीत नाटकातील विविध पात्रे, त्यांच्या भूमिका उलगडून दाखविण्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला/मानधन आजवर कधीही घेतले नाही. त्यांच्या या निरलस व नि:स्वार्थी सेवेविषयी त्यांना विचारले असता डेगवेकर म्हणतात, संगीत रंगभूमीने मला मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, आर्थिक स्थैर्य असे सर्व काही दिले. संगीत रंगभूमीच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणतेही आणि मराठी संगीत रंगभूमीचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी मी हे काम केले. शिवरंजनी (पुणे), नादब्रह्म परिवार (चिंचवड), कलाद्वयी (पुणे), ऋतुरंग (डोंबिवली) आदी संस्थांसाठी मी जुनी संगीत नाटके नव्याने बसवून दिली.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..