चंद्राचा ‘जन्म’ ही एक सर्वांच्याच औत्सुक्याची बाब ठरली आहे. चंद्राच्या जन्माबद्दलच्या जास्तीत जास्त स्वीकृत सिद्धांतानुसार सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी, म्हणजे पृथ्वीचा जन्म झाल्यानंतर अल्पावधीतच पृथ्वीवर एखादा, मंगळाच्या आकाराचा ग्रह आदळला असावा. या धडकेमुळे पृथ्वीचा काही भाग व या ग्रहाचा काही भाग अंतराळात फेकला गेला असावा. गुरुत्वाकर्षणामुळे यातील काही पदार्थ एकत्र आले असावे व त्यापासून आपला आजचा चंद्र निर्माण झाला असावा. चंद्रावरील एकूण पदार्थांपैकी किमान साठ टक्के पदार्थ हे या ग्रहापासून आल्याचं विविध प्रारूपांतून दिसून येतं. चंद्राच्या जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रहाला खगोलशास्त्रज्ञांनी ‘थिआ’ हे ग्रीक पुराणातलं नाव दिलं आहे. चंद्राच्या जन्माची ही कहाणी जरी बऱ्याच अंशी स्वीकारली गेली असली तरी, या थिआचे अवशेष काही पृथ्वीवर सापडलेले नाहीत. त्यामुळे चंद्राच्या जन्मामागील सिद्धांतातील अनिश्चितता कायम राहिली आहे. मात्र चंद्र हा थिआपासूनला जन्माला आल्याच्या शक्यतेला पाठबळ देणारं एक नवं प्रारूप संशोधकांनी अलीकडेच विकसित केलं आहे.
पृथ्वीचं कवच हे सुमारे चाळीस किलोमीटर जाडीचं आहे. या कवचाखाली सुमारे २९०० किलोमीटर जाडीचा खडक व अर्धवट घन स्वरूपातील शिलारसापासून बनलेला ‘प्रावरण’ हा थर आहे. भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या भूगर्भीय लहरींचा प्रवास, पृथ्वीच्या या प्रावरणाच्या काही भागातून काहीसा धिम्या गतीनं होत असल्याचं काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना आढळलं. यावरून, या प्रावरणातच परंतु प्रावरणाच्या खालच्या बाजूला, सर्वसाधारण प्रावरणापेक्षा वेगळ्या रचना असणारे खडकाळ भाग अस्तित्वात असल्याचा निष्कर्ष भूशास्त्रज्ञांनी काढला. आफ्रिका खंडाच्या खाली आणि पॅसिफिक महासागराच्या मधल्या भागाच्या खाली असणारे हे भाग काही हजार किलोमीटरपर्यंत पसरले असून, त्यांची उंची एक हजार किलोमीटर इतकी मोठी आहे. या रचनांचं मूळ काय असावं, याबद्दल निश्चित माहिती नव्हती. मात्र हे कोडं सुटेलसं आता वाटतं आहे. ॲरिझोना राज्य विद्यापीठातील क्यू. युआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या, चंद्राच्या जन्माबद्दलच्या संगणकीय प्रारूपानुसार या रचना म्हणजे थिआचे अवशेष असण्याची शक्यता दिसून आली आहे. युआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या या प्रारूपानुसार थिआचा आकार हा मंगळाच्या चौपट, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच मोठा असावा. त्यांचं प्रावरण हेसुद्धा पृथ्वीच्या प्रावरणापेक्षा किचिंतसं अधिक घन असावं. त्यामुळेच थिआचे अवशेष, हे पृथ्वीच्या प्रावरणातील खडकांत मिसळून न जाता प्रावरणाच्या खालच्या बाजूस, खोलवर जमा झाले असावेत.
अलीकडेच भूशास्त्रज्ञांनी आइसलँड आणि पॅसिफिक महासागरातील सामोआ या बेटांवरील ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या खडकांचं रासायनिक विश्लेषण केलं तेव्हा, हे खडक प्रावरणाच्या अगदी खालच्या भागातून वर आल्याचं त्यांना आढळलं. हे खडक अगदी प्राचीन असून ते सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचंही या संशोधकांना दिसून आलं. याच काळात थिआनं पृथ्वीला धडक दिली असल्यानं, हे खडक थिआचेच अवशेष असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर अर्थातच अजून बरंच संशोधन होण्याची गरज आहे. मात्र युआन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या प्रारूपाला दुजोरा देणारा पुरेसा पुरावा मिळाला तर, चंद्राचं कूळ शोधण्यात संशोधकांनी महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असं समजायला हरकत नाही.
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: NASA/JPL-Caltech, members.elsi.jp
Leave a Reply