नवीन लेखन...

प्रकाशन व्यवसायातील स्थित्यंतरे

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला कृ. ज. दिवेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. या लेखात मांडलेले अनेक मुद्दे आजही जसेच्या तसे लागू आहेत. त्यासाठीच हा लेख आपल्याला विचारमंथनासाठी सादर….


जर्मनीमधील मेन्झ येथे १३९८ मध्ये जन्मलेल्या गटेन्बर्ग या जर्मन संशोधकाने छपाई यंत्राचा शोध लावून १४५५ मध्ये एका पानावर ४२ ओळींचे दोन स्तंभ अशी मांडणी करून ४२ ओळींचे बायबल प्रसिद्ध केले, त्याला साडेपाचशे वर्षे होऊन गेली. या यंत्रामुळे एकाच संहितेच्या अनेक प्रती काढता येऊ लागल्या. भारतात हे तंत्रज्ञान रूढ होण्याआधी ‘लिहिये’ असत. ही मंडळी पोथ्यांच्या स्वरूपात मजकूर ‘कागदबद्ध’ करीत. त्यावेळी कागद, शाई वगैरे लेखनसाहित्याची निर्मिती आपल्याकडे होत होती. एका संहितेच्या अनेक प्रती काढण्याचे काम ‘लिखिये’ परिश्रमपूर्वक पार पाडित व हे लेखन अचूक व छापील अक्षरांप्रमाणे सुबक व दाणेदार असे. अशा लेखनिकांमुळेच रामायण, महाभारतासारखे पौराणिक ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, दासबोध आदी संतवाङ्मय टिकून राहिले. गटेन्बर्गप्रणीत छपाई कला आपल्याकडे येऊन रुजायला अठरावे शतक उजाडले. छापील पुस्तकांचा प्रसार होऊन एकोणिसाव्या शतकात भारतातील सर्व भाषांतून पुस्तके प्रकाशित होऊ लागली. विसावे शतक सुरू झाले आणि नियतकालिके व पुस्तके यांचा झपाट्याने प्रसार होऊन प्रकाशन संस्था उदयास येऊ लागल्या.

सुरुवातीला लेखकांकडून हस्तलिखित मिळविणे, छापणे व पुस्तकरूपात त्याची निर्मिती करून ते विकणे असा साधा-सरळ व्यवहार होता. लेखकाला, ‘तू किती देतोस?’ अशी विचारणा कधी होत नसे. हस्तलिखित पसंत पडून ते स्वीकारले तर स्वखर्चाने ते छापून, प्रकाशक लेखकाला जमेल तेवढे मानधन आणि २५ प्रती देत असे. पुढे १५, नंतर ११ व आता ५ पर्यंत अशी त्या संख्येला उतरती कळा लागली आहे.

त्यावेळच्या प्रकाशन संस्थांना बॅनर्स नसत. ज्या थोड्यांना होती ती गाजली नाहीत व टिकलीही नाहीत. विसाव्या शतकाच्या मध्यावर म्हणजे साधारण १९५०नंतर विशिष्ट उद्दिष्टे समोर ठेवून व ती अमलात आणून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या संस्था नावारूपाला आल्या. मराठीपुरते म्हणायचे तर ‘मौज प्रकाशन गृहा’ तर्फे प्रकाशित झालेली पुस्तके खास उल्लेखनीय असत, अजूनही आहेत. त्यावेळी काम्प्युटर टाइपिंग नव्हते. टाइपांचे खिळे जुळवून पुस्तकाचे एक एक पान लोखंडी चौकटीत बंदिस्त करून मग मशीनवर छपाई व्हायची. ‘मौज’ ची स्वतःची फाउंड्री होती, प्रेस होता. खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयात श्री.पु.भागवत, राम पटवर्धन यांच्यासारखी मेहनती व साक्षेपी संपादकमंडळी होती. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे ‘सत्यकथा’हे मासिकही होते. त्यांतील कथांची निवड अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या. कथासंग्रह असो की कादंबरी, तिचे पुस्तकात रूपांतर करतांना प्रत्येक टप्प्यावर विलक्षण दक्षता घेतली जायची. ‘मौज’ ची नाममुद्रा पुस्तकावर उमटली, की त्याच्या दर्जाबद्दल कसलाही संदेह उरत नसे.

‘मौज’ प्रमाणेच ‘रा.ज.देशमुख प्रकाशन’ही स्वयंभू संस्था. राजे देशमुख हे मालक. त्यांची प्रकाशन पद्धत आगळीवेगळी. वि.स. खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारख्या चतुरस्र व ख्यातनाम लेखकांची आपल्या पुण्यातल्या गढावर राहण्याची व्यवस्था करून, खांडेकरांकडून ‘ययाती आणि रणजित देसाईकडून, ‘स्वामी’ व ‘श्रीमान योगी’ यांसारख्या दर्जेदार कादंबऱ्या त्यांनी लिहून घेतल्या. त्यासाठी त्यांची उत्कृष्ट सरबराई केली, बडदास्त राखली. त्या कादंबऱ्यांची जोरदार जाहिरात केली. त्यांच्या मोठमोठ्या आवृत्त्या काढून व वितरणासाठी अॅडव्हान्स बुकिंग करून, त्या अल्प किंमतीत वाचकांना उपलब्ध करुन दिल्या. रणजित देसाईंच्या ‘स्वामी’ या, माधवराव पेशव्यांवरील अप्रतिम कादंबरीचे मूल्य अवघे तीन रुपये होते! राजे देशमुखांचे हे अभूतपूर्व उपक्रम काही काळच सुरू राहिले. त्यांचे प्रकाशनचिन्ह कासव. पण त्यांच्यानंतर आता ते कासव कूर्मगतीने प्रकाशनक्षेत्रात वाटचाल करताना दिसते. आधीचा वेग व आवेग आता उरलेला नाही.

‘परचुरे प्रकाशन मंदिर ही देखील या क्षेत्रातील जुनी-जाणती संस्था. तिचे संस्थापक ग.पां. परचुरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर व आचार्य अत्रे यांचे परम भक्त. त्या दोघांची बहुतेक सर्वच पुस्तके श्रद्धापूर्वक प्रसिद्ध करून परचुरे नी विक्रीचे उच्चांक गाठले. ग.पां.चे सुपुत्र अप्पा परचुरे यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत, प्रतिभावान व मनस्वी लेखक जी.ए.कुलकर्णी यांची अप्रकाशित एकूण एक पुस्तके जी.ए. प्रेमींसाठी उपलब्ध करून दिली.

‘पॉप्युलर’ वे व्यासंगी संपादक रामदास भटकळ हे ‘मौज प्रमाणे पूर्ण कस लावून पुस्तके प्रसिद्ध करीत असल्यामुळे चिकित्सक वाचकांमध्ये त्यांची प्रकाशने पॉप्युलर झाली आहेत.

‘मॅजेस्टिक’ ही केशवराव कोठावळे यांची निर्मिती. औदुंबराच्या वृक्षाखाली गिरगावच्या फूटपाथवर जुन्या पुस्तकांची विक्री करता करता सावरकरलिखित ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाच्या प्रती मोठ्या प्रमाणावर एकगठ्ठा त्यांच्या हाती आल्या. त्यांना नवे आकर्षक वेष्टण घालून त्यांनी त्यांची झपाट्याने विक्री केली. त्यानंतर जयवंत दळवी, गो.नी.दांडेकरांसारख्या प्रतिभावान लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करून केशवरावांनी आपल्या प्रकाशन संस्थेच्या नावाला साजेल असे लखलखीत यश मिळविले. त्यांचा वारसा अशोक कोठावळे यांच्याकडे आला व त्यांनी मोठ्या कल्पकतेने प्रकाशन व्यवसायात उदंड प्रगती केली.

‘श्रीविद्या प्रकाशन’ या नावाने मधुकाका कुलकर्णीनी व्यवसाय सुरू केला व आपल्या नेमस्त व चोख वागणुकीने तो नावारूपास आणला, त्याच सचोटीने उपेंद्र कुलकर्णी, नाव नसलेल्या पण उत्कृष्ट दर्जा असणाऱ्या लेखकांची पुस्तके मनःपूर्वक प्रसिद्ध करतात आणि प्रकाशन तिथीलाच न चुकता मानधनाचे पाकिट लेखकांच्या हाती ठेवतात. काहीशा उशिराने सुरुवात करून शरद व सुप्रिया मराठे यांनी प्रकाशनक्षेत्रात ‘नवचैतन्य’ची गुढी उभारली व आपल्या उबदार व उदार स्वभावाने नव्याने लिहिणाऱ्यांमधील चैतन्य फुलवून व मोठ्या संख्येने पुस्तके प्रकाशित करून या व्यवसायात मान्यता मिळविली.

कॉपोरेट पद्धतीच्या मेहता प्रकाशनाचा भर इंग्रजीतील गाजलेल्या पुस्तकांचे प्रकाशन हक्क मिळवून त्यांचे मराठी अनुवाद प्रसिद्ध करण्यावर असतो, तर अनिल रघुनाथ फडके यांच्या ‘मनोरमा प्रकाशन चा बाज वेगळा. उत्तम उठाव होणारी पुस्तके ते आकर्षकपणे प्रसिद्ध करतात. जाहिरात व प्रकाशन समारंभ यांना संपूर्ण फाटा देतात. लेखकांना पृष्ठसंख्येच्या हिशोबाने तात्काळ मानधन देतात आणि स्वतःच्या टेंपोतून गावोगाव मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचे वितरण करतात.

‘माणूस’ साप्ताहिक वाचकप्रिय करणारे दिलीप माजगावकर यांच्या ‘राजहंस प्रकाशनाने या क्षेत्रात फार मोठी झेप घेतली आहे. प्रकाशनासाठी पुस्तके स्वीकारताना ते कमालीची दक्षता घेतातच; शिवाय निळ्या रंगाचे एक पान पुस्तकातच समाविष्ट करून वाचकांची प्रतिक्रिया अजमावतात. ‘ग्रंथाली’ची प्रकाशन शैली, ‘राजहंस’प्रमाणेच चोखंदळ असून त्यांची साहित्यिक जाग अनन्यसाधारण आहे. कुमार केतकर, अरुण साधू व साक्षेपी संपादक दिनकर हरी गांगल यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने दुर्लक्षित अशा तळागाळातील व्यक्ती हुडकून त्यांना लिहिते केले व दलित साहित्य हा नवा प्रकार साहित्यात आणला. अतिशय माफक मूल्यात पुस्तके देऊन ‘ग्रंथाली’ने नवे नवे वाचक निर्माण केले. त्यांच्या या कार्याला तोड नाही.

वरील सर्व प्रकाशन संस्था मुंबई-पुण्यातील आहेत. नाशिक ही वसंत कानेटकर व कुसुमाग्रज या दिग्गजांची कर्मभूमी असूनही प्रकाशन व्यवसायात हे शहर काहीसे मागेच राहिले. त्या तुलनेत मराठवाड्यातील औरंगाबादला प्रकाशन संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. सुरुवातील ‘धारा’ व आता ‘साकेत’ या नावाची तेथील प्रकाशन संस्था गेली अनेक वर्षे दमदारपणे कार्यरत आहे. ‘लेखक व प्रकाशक हे कॉन्बिनेशन फक्त बाबा भांड यांच्यामध्ये आढळते. ‘साकेत’चे ते मालक असून त्यांच्या नावावर २५ साहित्य पुरस्कारांसहित ७५ स्वलिखित पुस्तके आहेत. आजतागायत हजारांहून अधिक सरस व सुरस पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. औरंगाबादचेच सूर्यकांत दाणेकर त्यांच्या ‘कीर्ती प्रकाशनाद्वारे, तेथील प्रख्यात लेखिका अनुराधा वैद्य, रेखा बैजल याच्याप्रमाणेच नवोदित लेखकांची पुस्तके निखळ साहित्य प्रेमामुळे प्रसिद्ध करतात आणि व्यक्तिशः हिंडून फिरून पुस्तकांचे वितरण करतात. नमुन्यादाखल उल्लेखित वरील प्रकाशन संस्थाशेवाय महाराष्ट्राची दुसरी राजधानी नागपूर तसेच इतर शहरांतील प्रकाशन व्यावसायिकांचेही, ग्रंथनिर्मिती व ग्रंथप्रसारण यांतील योगदान लक्षणीय व मौलिक आहे.

पूर्वीच्या पोथी-पुस्तकांच्या निर्मितीला जी संख्यात्मक व गुणात्मक बंधने पडत ती अलीकडील छपाईतील विकसित तंत्रज्ञानामुळे नाहीशी होऊन, आता पुस्तकनिर्मिती निर्दोष, आकर्षक व वेगाने होते. त्या अनुषंगाने इतरही बदल होत गेले. कागद, छपाई व इतर खर्चात निश्चितच वाढ झाली पण त्याहून कित्येक पर्टीनी पुस्तकमूल्य वाढले. आत्ताची पुस्तके अधिक देखणी असतात पण त्यांची बांधणी सैल व कमजोर असते, त्यामुळे टिकाऊपणा कमी. मुळगावकर, दलाल असे चित्रसम्राट तेव्हा मुखपृष्ठे करत. आता कॉम्प्युटर ही कामे झपाट्याने करतो. मुखपृष्ठ ४ वर लेखकाचा परिचय, त्याचे छायाचित्र किंवा ग्रंथसार (ब्लर्ब) देण्यात येते. हा एक चांगला पायंडा पडला आहे. तथापि पूर्वीची सचोटी, पारदर्शीपणा व होतकरु लेखकाप्रती जो स्नेहभाव असायचा तो आता लोप पावला आहे. लेखकाचे हस्तलिखित नुसते वाचण्यासाठी त्याला फी आकारणे, पुस्तक निर्मितीचा संपूर्ण भार लेखकाने सोसण्याचा आग्रह धरणे, त्याच्या खर्चाने छापलेल्या पुस्तकाच्या काही प्रती प्रकाशकाने आपल्याकडे ठेवून त्या परस्पर विकणे व त्यातून मिळालेली रक्कम लेखकाला न देता स्वतः गिळंकृत करणे, वितरणाची जबाबदारी प्रकाशकाने घेतल्यास पुस्तकाच्या छापील किंमतीवर ७०, ८० व (खोटं वाटेल पण) ९०टक्के कमिशनचा हट्ट धरणे, स्वीकृत हस्तलिखीत प्रकाशकाकडून हरवले गेल्यास, त्याचे सोयरसुतक न मानता त्याबद्दलची कसलीही भरपाई न देणे, पुस्तक प्रकाशनाचे समारंभ लेखकांला त्यांच्याच खर्चाने करायला लावून, त्याद्वारे आपल्याच प्रकाशन संस्थेची विनाखर्च जाहिरात करणे; अशा कटू अनुभवांना नवलेखकांना सध्या सामोरे जावे लागते.

ज्याला लेखनाची खरी तळमळ व ऊर्मी आहे, त्याला आपले पुस्तक प्रसिद्ध व्हावे असे वाटणारंच. पण विद्यमान प्रकाशन संस्था नवोदितांना क्वचितच थारा देतात. दिला, तरी त्यांच्याकडे हस्तलिखित वर्षानुवर्षे पडून राहते व अनेकदा गहाळही होते. तेव्हा असा काही प्रयत्न करायचा असेल, तर लेखकाने आपल्या हस्तलिखिताच्या दोन झेरॉक्स प्रती स्वतःजवळ ठेवाव्यात. स्वखर्चाने पुस्तक काढायचे असेल तर ५०० पेक्षा अधिक प्रती काढू नयेत. दहा ठिकाणी चौकशी करून व तावूनसुलाखून प्रिंटरची निवड करावी. वितरणासाठी परिश्रमपूर्वक स्वतः प्रयत्न करावेत. कोलकताची ‘राजा राममोहन रॉय ‘ ही संस्था एकगठ्ठा १५०- २०० प्रती घेते. त्यांच्याकडे छापलेल्या पुस्तकाच्या तीन प्रती पाठवून विचारणा करावी. मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘साहित्य’ नावाचे त्रैमासिक निघते. त्यात पुष्कळ उपयुक्त माहिती मिळते. अलीकडे संघ त्यांच्या बॅनरखाली पुस्तके प्रकाशित करतो. तशी त्यांनी आत्तापर्यंत चार पुस्तके प्रकाशित केली आहेत. वितरणासाठी त्यांच्याकडेही सहकार्य मागता येईल.

एक अभिनव पर्याय; जो अजूनपर्यंत अजमावला गेला नाही तो असा: ग्रंथ खरेदी करणारे प्रामुख्याने ग्रंथप्रेमी वाचक असतात. ग्रंथसंग्रहालयात पुस्तकांची देवघेव करणाऱ्या सभासदांमध्ये काही प्रमाणात खरेदीदार भेटू शकतात. पुस्तके बदलून घेण्याचा जो काउंटर असतो, त्याच्यालगतच मागील बाजूस माहिती फलक लावून त्या जागेत नवोदित लेखकांची, त्यांनी त्यांच्या खर्चाने प्रसिद्ध केलेली पुस्तके, भरपूर सवलतीच्या दरात विकण्याचा उपक्रम करून पाहण्यासारखा आहे. संग्रहालयानेही त्यांच्या सहयोगाबद्दल विकल्या जाणाऱ्या पुस्तकांवर योग्य तितके कमिशन घ्यावे. यात ग्रंथकार, ग्रंथ खरेदीदार व ग्रंथसंग्रहालय या तिघांचाही फायदा आहे. महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर मोठ्या संख्येने ग्रंथसंग्रहालये व वाचनालये आहेत. त्या त्या भागातील ‘लेखक-प्रकाशकांना’ या योजनेचा मोठा लाभ होईल. ११७ वर्षे पूर्ण केलेल्या ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालय या बुजुर्ग संस्थेला अशा प्रकारचा प्रयत्न करून पाहण्यासारखा आहे. नाहीतरी ग्रंथसंग्रहालये, निव्वळ पुस्तके ठेवणाऱ्या व वाचायला देणाऱ्या संस्था नव्हेत. त्यांना सरकारी अनुदानही भरपूर मिळते. त्यामुळे ग्रंथप्रचार व ग्रंथप्रसार हे त्यांचे ध्येय असले पाहिजे.

एकूण ग्रंथप्रकाशन व्यवसायातील असे हे बदलते चेहरे-मुखवटे आहेत. त्यात आणखी नवनवे प्रवाह येतील व त्यातून मराठी वाचनसंस्कृती प्रगल्भ व वर्धिष्णु होत जाईल.

-कृ. ज. दिवेकर

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला कृ. ज. दिवेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..