पुण्याचे सार्वजनीक काका अशी ओळख असलेले चारुदत्त सरपोतदार उर्फ चारुकाका हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. गेली सुमारे सत्तरहून अधीक वर्षे ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे शेवटपर्यत पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. गेल्या तीन पिढ्यांमधील नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातील घरचा हक्काचा माणूस’ असलेले चारूकाका अनेकांसाठी आयुष्याचा आधारस्तंभ बनले होते. विविध स्तरांतील हजारो माणसं ‘पूना गेस्ट हाउस’शी जोडली गेली. संस्थेसाठी जोडली गेलेली माणसं हेच सर्वांत मोठं भांडवल असतं.
सरपोतदार कुटुंब मूळचं रत्नागिरीजवळच्या नांदिवली – अंजणारी गावचं! या गावांमध्ये फक्त आणि फक्त सरपोतदारच राहतात. यातले चारुकाकांचे वडिल नानासाहेब सरपोतदार कलेवरील प्रेमापोटी १९३५ मध्ये पुण्यात आले. त्यांनी जुन्या पेशवे पार्कशेजारी मूकपटनिर्मितीसाठी ‘आर्यन फिल्म स्टुडिओ’ सुरू केला. या चित्रपटांचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक अशा सर्व जबाबदाऱ्या ते स्वत: सांभाळत. यामध्ये त्यांनी पन्नासहून अधिक मूकपटांची निर्मिती केली. त्यामधील ‘महाराचे पोर’ हा मूकपट तब्बल २५ आठवडे चालला. बहुजन समाजाविषयी बनविला गेलेला हा पहिला चित्रपट! पण या सगळ्या उद्योगाचा उपजीविकेचं साधन म्हणून फारसा उपयोग होईल, असं त्यांना वाटेना. त्यामुळे कोल्हापुरात खानावळ चालविणाऱ्या सरस्वतीबाई या बहिणीच्या मदतीनं त्यांनी पुण्यात हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. त्यातून ‘पूना गेस्ट हाउस’ची पायाभरणी झाली. त्या वेळी आधुनिकतेची कास धरल्याचं प्रतीक म्हणून ‘पूना रिफ्रेशमेंट हाउस’ हे उपाहारगृह आणि निवासाची व्यवस्था असलेलं ‘पूना गेस्ट हाउस’ ही दोन्ही नावं इंग्रजीमध्ये दिली गेली. पुढे त्यांचे मोठे चिरंजीव बंडोपंत सरपोतदारांनी हा व्यवसाय खऱ्या अर्थानं वाढवला. नानासाहेबांनी पुण्यात जेवणासाठी पहिल्यांदा स्टीलच्या थाळीचा वापर केला. आणि सरस्वतीबाईंनी मुलींचं पहिलं वसतिगृह सुरू केलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बंडोपंतांनी माथेरानमध्ये ‘पूना गेस्ट हाउस’ सुरू केलं. या काळात उद्योगपती गरवारे, किर्लोस्कर या मित्रमंडळींची त्यांना मदत झाली. पुण्यात त्या वेळी मास्टर विठ्ठल, विनायक, पृथ्वीराज कपूर, बालगंधर्व, भालजी पेंढारकर आदी मंडळी सरपोतदारांकडे मुक्कामाला असत.
पुढे यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ आणि ग. दि. माडगूळकर यांनी आग्रहानं बंडोपंतांना दिल्लीला नेलं आणि ‘पूना गेस्ट हाउस’ची ध्वजा दिल्लीमध्येही फडकली. ते दिल्लीतल्या मराठी माणसांसाठी सांस्कृतिक केंद्र बनलं. त्यांनी तिथं ‘दिल्ली दरबार’ हे मुखपत्र सुरू केलं. ‘पूना गेस्ट हाउस’ सुमारे साठ वर्षं, तर दिल्ली विधानसभेचं कँटीन बंडोपंतांनी २५ वर्षं चालवलं.
त्या सुमाराला चारूकाकांचं भोसला मिलिटरी स्कूलमधील शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांनी पुण्यात येऊन आजीबरोबर व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांची बहीण उषा अनेक मराठी नाटकांमधून भूमिका करत होती. पुढे त्या राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्थेच्या ‘एनएसडी’च्या संचालिका (विवाहानंतरच्या उषा बॅनर्जी) झाल्या. ‘बंडोपंतांसह विश्वास, गजानन आणि चारूकाका या सगळ्या भावंडांची पहिली आवड चित्रपट हीच होती. बंडोपंतांचं ‘ताई तेलीण’ या चित्रपटात मोठं नुकसान झालं. ‘घर गंगेच्या काठी’, ‘जावई माझा भला’ हे बाबांनी काढलेले चित्रपट विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले; पण निर्माते आणि वितरक म्हणून सर्वांत यशस्वी ठरले ते विश्वास सरपोतदार. त्यांच्या ‘हीच खरी दौलत’, ‘रंगल्या रात्री अशा’ आदी चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यांची या क्षेत्रात घोडदौड सुरू राहिली आणि चारुकाकांनी ‘पूना गेस्ट हाउस’वर लक्ष केंद्रित केलं.
त्या वेळी कोणत्याही कारणास्तव पुण्यात येणाऱ्या नाट्य-चित्रपट कलावंतांसाठी ‘पूना गेस्ट हाउस’ हे वास्तव्याचं एकमेव ठिकाण होतं. या कलावंतांना तिथं घरचं प्रेम मिळालं. येणाऱ्या प्रत्येक कलावंताची आवडनिवड चारूकाका आणि आजींच्या लक्षात असायची. ज्याला जे हवं, जे आवडतं, ते न मागता अनपेक्षितरीत्या समोर आलं, की मंडळी खूश होऊन जायची. डॉ. काशिनाथ घाणेकरांना प्रयोग संपवून रात्री आलं, की झोपण्यापूर्वी दूधभात लागायचा. ते ‘गेस्ट हाउस’वर यायच्या वेळी आजीचा गरम गरम मऊ भात तयार असायचा. अशा येणाऱ्या कलावंतांच्या आवडीनिवडी या मायलेकांना ठाऊक असायच्या आणि त्या न चुकता पुरविल्या जायच्या; पण हे सगळं फक्त कलावंतांसाठीच होतं असं नाही. सर्वसामान्य माणसाबद्दलही चारूकाकांना हीच आत्मीयता आणि अगत्य आहे. ‘पानशेतचा प्रलय झाला त्या वेळी पुण्यात सगळीच दुर्दशा झाली होती. त्या वेळी चारूकाकांनी महिनाभर पुणेकरांसाठी मोफत अन्नछत्र चालवलं. चिनी युद्धानंतर तांदळाचा तुटवडा होता. फार थोडे तांदूळ रेशनवर मिळायचे. त्या वेळी मर्यादित थाळीची ‘राइस प्लेट’ची पद्धत प्रथम ‘पूना गेस्ट हाउस’मध्ये सुरू झाली. मासिक पासधारक मंडळी होतीच. ‘सरस्वती मूव्हीटोन’, ‘प्रभात’च्या चित्रपटांच्या शूटिंगनिमित्तानं येणारी कलावंत मंडळीही होती; पण चारूकाकांचा एक दंडक होता. कुणीही कलाकार मंडळी कितीही दिवस राहिली, जेवली, तरी त्यांना पैशाबद्दल काहीही विचारायचं नाही. ही मंडळी त्यांच्या उत्पन्नानुसार जे देतील, ते गोड मानून घ्यायचं. चारूकाकांच्या या स्वभावामुळे अनेक मंडळी ‘पूना गेस्ट हाउस’शी जोडली गेली. आमच्या घरातली होऊन गेली. आजी या सगळ्यांचीच आई होऊन गेली.’
चारूकाकांच्या आत्मीयतेविषयीचा एक प्रसंग आवर्जून सांगण्यजोगा आहे. पानशेतचा प्रलय झाला त्या वेळी अभिनेत्री सुलोचनाबाई पुण्यात होत्या. त्यांना मुंबईला जायचं होतं; पण सगळे रस्ते बंद होते. आता काय करावं, ते न सुचून त्या ‘पूना गेस्ट हाउस’वर आल्या. त्यांचा मुंबईला परतायचा विचार ऐकून अस्वस्थ झालेले चारूकाका अक्षरश: त्यांच्या अंगावर ओरडले नि म्हणाले, ‘कुणीही कुठंही जायचं नाही इथून. निमूटपणे राहा इथं सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत!’ सुलोचनाबाईंना चारूकाकांच्या मनातली काळजी, प्रेम, जिव्हाळा सारं काही त्या स्वरातून समजलं नि तेव्हापासून चारूकाका त्यांचे भाऊ होऊन गेले!
सार्वजनिक जीवनातही चारूकाकांनी फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. अनेक नवनव्या गोष्टी केल्या; पण प्रसिद्धी, लौकिकाची कसलीही अपेक्षा न ठेवता पुणे महापालिका होण्याआधी पुण्यातल्या खानावळी, ‘अमृततुल्य’चे मालक, चहाची छोटी गाडी चालवणारे विक्रेते या सर्वांचा मिळून ‘खाद्य-पेय विक्रेते संघ’ त्यांनी स्थापन केला. ४८ वर्षं ते त्याचे अध्यक्ष होते. अनाथ मुलांसाठी ससून परिसरात सुरू असलेली ‘श्रीवत्स’ ही पहिली संस्था स्थापन झाली ती चारूकाकांच्या पुढाकारानं! चित्रपट क्षेत्रातील मंडळींचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असावं म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना करण्यामध्ये सुधीर फडके, विनायकराव सरस्वते यांच्याबरोबर मोठा सहभाग होता तो चारूकाकांचाच! मराठी कलावंतांचा पहिला सामूहिक परदेश दौरा त्यांनीच घडवून आणला. या कलावंतांची सामूहिक वसाहत असावी, त्यासाठी त्यांना सुलभ हप्त्यानं कर्ज उपलब्ध व्हावं, ही कल्पनाही त्यांचीच! त्यातूनच पुण्यात सातारा रस्त्यावर ‘कलानगर’ वसवलं गेलं. त्याचं भूमिपूजन सी. रामचंद्र यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
पुणे विद्यापीठाचं आणि रिझर्व्ह बँक ट्रेनिंग कॉलेजचं कँटीन कितीतरी वर्षं चारूकाका चालवीत होते. कराडे ब्राह्मण महासंघ, हिंदू महासभा यांचंही कामकाज ते पाहात होते; पण ही सगळी कामं करताना येणाऱ्या पैशाला कधी पाय फुटायचे ते कळायचंही नाही. त्याची झळ संसाराला बसू नये म्हणून त्यांच्या पत्नी चारूशीलाताई प्रभात रोडवर राहत्या घरी मेस चालवत. दीडशे लोक रोज जेवायला असायचे. घरी पेइंग गेस्ट ठेवले होते. ते उत्पन्न चरितार्थासाठी उपयोगी पडायचं. चारूकाकांचे दोन्ही चिरंजीव किशोर व सरपोतदार यांनी आजही त्यांची परंपरा आणि नीतिमूल्यं कायम ठेवून, त्यांनी घालून दिलेले काही पायंडे जपत त्यांची वाटचाल सुरू आहे.’
चारूकाकांची समाजाभिमुखता, कलाप्रेम, बांधिलकी, अगत्य या साऱ्याचाच वारसा नवनव्या गोष्टी करण्याचा, आव्हानं स्वीकारण्याचा चारूकाकांचा वारसाही त्यांनी दोघांनी आत्मसात केलाय.
चारुकाका यांचे १९ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात दुख:द निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३
Leave a Reply