नवीन लेखन...

चष्मे हे जुलमी गडे

अनघा  प्रकाशनच्या  ‘‘मीच एव्हढा शहाणा कसा’’ ह्या पुस्तकातील श्रीकांत बोजेवार ह्यांनी लिहिलेला हा लेख


चष्मा म्हणजे चाळिशी किंवा चाळिशी म्हणजे चष्मा अशा भ्रमात किंवा संभ्रमात राहण्याचे दिवस आता डस्टबिनमध्ये जमा झालेले आहेत. एकेकाळी चष्मा डोळ्यांवर चढला किंवा केसांत रुपेणी छटा झळकली की आयुष्याचा मध्यांतर जवळ आला, या कल्पनेने हुरहूर दाटून घेत असले. आता आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून रडणारी मुले सुद्धा चष्म्यात दिसतात. ती चष्मा काढून रडतात आणि रडून झाले की डोळे पुसून पुन्हा चष्मा घालतात. चष्म्याचे वय एवढे झपाट्याने खाली येत आहे की, लवकरच बारशाच्यावेळी पाळण्यात झोपून, आपले नाव काय ठेवतात याची उत्सुकतेने वाट पाहणारी बाळेसुद्धा चष्म्यात दिसतील की काय असे वाटते.

आतापर्यंत लोकांना आपली दृष्टी कमी होते आहे, हे कळायलाच मुळी वेळ लागायचा किंवा ते कळता कळताच चाळिशी यायची. आताची पिढी हुशार असल्याने तिला अपला दृष्टिदोष लवकर कळतो. त्यामुळेच ऑप्टिकल्सची दुकाने गल्लोगल्ली झाली आहेत. अशा दुकानांमध्ये काऊंटरच्या मागे चिंचोळी, मंद प्रकाश असलेली खोली असते आणि तिथे दिवसभर दृष्टिदोषवाल्यांचे साक्षरता वर्ग सुरू असतात. त्या खुर्चीवर खुद्द ज्ञानपीठ विजेता जर बसला तर त्यालाही तो ऑप्टिकल्सवाला जी काही बाराखडी वाचायला देईल ती मोठ्याने वाचून दाखवावी लागते. आपल्या डोळ्यांवर तो बिनाकाचेची जाडजूड फ्रेम ठेवतो आणि त्या फ्रेमच्या खाचांमध्ये काचेचा एक-एक तुकडा घालत जातो. एकेकाळी हाती धरायचे तराजू होते. तेव्हा त्यांचे बॅलन्स करता करता यातले त्यात त्यातले यात केले जायचे, तसे हे वाटते.

कधी हा डोळा जड वाटतो तर कधी तो. ती रिकामी फ्रेम एवढी वजनदार असते की आपले लक्ष काय दिसते यापेक्षा वजन कमी-जास्त होण्याकडेच लागलेले असते. अखेर आपल्याला पॉईंट फाईव्ह किंवा पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह अशा कुठल्या तरी नंबरचा चष्मा लागतो. ऑप्टिकल्सच्या दुकानात जाऊन विना चष्म्याचा परत आलेला इसम आजवर कुणीही पाहिलेला नसेल. अगदीच काही नाही तरी किमान झिरो नंबरचा चष्मा त्याच्या कानांवर अडकवूनच त्याला दुकानाबाहेर काढतात. नंबर जर झिरो असेल तर साधी खिडकीला लावतात तसली काच लावतात की काय किंवा तसली काच लावायची तर मग त्यापेक्षा रिकामी फ्रेश का लावत नाहीत, असाही प्रश्न पडतो. अखेर त्या दुकानदाराकडील एक फ्रेम खपण्याशी मतलब. दुकानदार चष्मा देताना त्याच्याकडचा एक डबा देतो आणि तलम कापडाचा एक तुकडाही देतो. त्या तुकड्याने चष्म्याच्या काचा साफ करणारा एकही चष्मे बहाद्दर कुणाच्या पाहण्यात आजवर आला नसेल. या कापडाचे पुढे काय होते ते कुणालाच माहिती नाही.

काही काही दुकानदार महागडी फ्रेम स्वस्तात वाटावी, म्हणून गोल चेंडूगत बूच असलेली, काचा साफ करण्याचे सोल्यूशन भरलेली एक बोटभर बाटलीही फ्री देतात. त्यातले सोल्यूशन उडून गेले तरी तिचा वापर होत नाही. काहीतरी फुकट घेतल्याचे समाधान मिळवून देणे एवढाच त्या बाटलीचा हेतू असावा. काही लोकांच्या चष्म्यांना सोडा बॉटलच्या काचा लावतात असे कोणीतरी सांगितले तेव्हा खूप दिवस जाड काचांचा चष्मा दिसला की या चष्म्यासाठी किती बॉटल फोडाव्या लागल्या असतील याचाच हिशेब करावासा वाटत असे.

एवढेच काय सोडा पितांनाही अशा माणसांचे जाड भिंगातून दिसणारे बटाटे डोळेच नजरेपुढे येत. त्यातही टुच्चूक असा आवाज करणारी बाटली असेल तर त्या बाटलीच्या गळ्यातली गोटी अकारण बुबुळासारखी भासत असे. काही वर्षांपूर्वी एखाद्याला जर तरुण वयात चष्मा लागलेला दिसला की नंबराचा आहे का, असे विचारत असत. म्हणजे वर्गात नंबर काढता काढता, खूप अभ्यास करावा लागला आणि त्यामुळे चष्मा लागला असे वाटत असे. वर्गातल्या नंबराचा चष्म्याच्या नंबराशी काही संबंध नाही हे कळण्यासाठी त्या चिंचोळ्या खोलीची सफर करावी लागली. एरवी चष्म्यात दिसणारी व्यक्ती विना चष्म्याची दिसली की ती अनोळखी वाटत असे, कारण तेव्हा चोवीस तास चष्मा घालणारे कमी असायचे.

शंभर-दीडशेच्या लेन्ससह मिळणारा चष्मा आता नुसत्या चौकटीसाठीच पाचशेपासून पंधरा हजारापर्यंत पैसे मागू लागला आहे. एकेकाळी वधू-वरांच्या जाहिरातीत चष्मेवाली मुलगी नको, असे म्हटले जायचे. मुलीही चष्मेवाल्यांना नाके मुरडत. खरंतर बायकोला जवळचे दिसत नाही, ही वैवाहिक आयुष्य सुखाचे जाण्यासाठीची केवढी मोठी सोय आहे, पण ते लग्न झाल्याशिवाय कसे कळणार? अखेर यावर उपाय म्हणून रात्रभर पाण्यात बुडवून ठेवायच्या लेन्स आल्या आणि आतातर काय महागडे चष्मे म्हणजे फॅशन स्टेटमेंट ठरू लागल्या आहेत. जवळचे आणि दूरचे दाखवणारा, मधल्या भागात विभागलेला चष्माही आता इतिहासजमा होतो आहे. याला प्रोग्रेसिव्ह लेन्स म्हणतात. तसा आता चष्म्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही प्रोग्रेसिव्ह झाला आहे.

गांधीजींसारखा गोल फ्रेमचा चष्मा म्हाताऱ्यांचा म्हणून ओळखला जायचा, त्याला ग्लॅमर आले आहे आणि एकेकाळी पैशांअभावी, गोल फ्रेमच्या तुटलेल्या दांड्यांना पर्याय म्हणून कानांभोवती गुंडाळण्यासाठी बांधला जाणारा दोराही आता स्टाईल म्हणून खपवला जातो आहे. एकेकाळी हेअर सलूनच्या दुकानात नट मंडळींच्या केसांची स्टायलिंची चित्रे असत आणि त्याबरहुकूम केस कापण्याच्या शिफारशी होत असत. आता अमिताभ बच्चनपासून तर अक्षयकुमारपर्यंत सगळे नट लोकांना चष्म्याच्या फ्रेमबाबत मार्गदर्शन करीत असतात. त्या फ्रेम्स फक्त त्यांनाच आणि फोटोतच चांगल्या दिसतात, हे ग्राहकाला कळते तेव्हा त्याचे पैसे गेलेले असतात.

वय आणि चष्मा यांच्या संबंधांचा जसा काडीमोड झालेला आहे, तसाच इतर अनेक गोष्टींचाही झालेला आहे. प्रोफेसर म्हटले की त्याला चष्मा असणार आणि तो विसरभोळाही असणार, असे गृहित धरले जायचे. प्रोफेसर मंडळींचे वाचन दांडगे असते अशा गैरसमजातून हे गृहितक जन्माला आले होते. वर्गात सर्वात ढ असलेल्या मुलांनाही चष्मे दिसू लागले तेव्हा प्रोफेसर वर्गाचे पितळ उघडे पडले. आता तर त्यांचा विसरभोळेपणाही एवढा वाढला आहे की ते वाचन करायलाही विसरू लागले आहेत. थोडक्यात, पांडित्यांची साथ चष्म्याने आता सोडली आहे. लहान मुले भक्तिभावाने टीव्ही पाहतात त्यामुळे त्यांचे दृष्टिदोष लहानपणीच कळू लागले आहेत. प्रोग्रेसिव्हच्या काळात लवकरच गर्भात असलेल्या मुलांना टीव्ही नीट दिसत नसल्याचेही लक्षात येऊन आयांच्या (पक्षी अनेकवचन ऑफ आई) पोटांना बांधायचे चष्मे लवकरच दिसू लागतील. आमच्या ‘आई-वडिलांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलवणारा चष्मा मिळेल काय,’ अशी चौकशी लवकरच शहाणीसुरती मुले करू लागतील, तेव्हा समाजही या आधुनिक लेन्सप्रमाणेच प्रोग्रेसिव्ह झाला, असे म्हणता येईल.

— श्रीकांत बोजेवार

1 Comment on चष्मे हे जुलमी गडे

  1. very nice observations. recently my niece purchased a frame and lense or 25000/-. LEKH CHAN AAHE. TUMCHA MAGIL TOUR VRCHA LEKH PAN AAVADALA. DHNYAWAD.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..