अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत.
एकदा अकबर बादशहाने त्याला एक तातडीचे काम सांगितले. सरदार गडबडीने घरी आला. चार घास खाल्ले व नवीन वस्त्रे घालून तो कामाला निघाला. त्या गडबडीत रत्नाचा एक हार त्याने खुंटीवर ठेवला. बादशहाने सांगितलेले काम संपवून तो रात्री घरी परतला. तो फारच थकला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली व त्या हाराबद्दल तो पूर्णपणे विसरून गेला.
दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात जावयाचे होते. त्याने दरबारी पोषाख चढविला. गळ्यात माळा घातल्या. तेव्हा त्याला आपला रत्नांचा हार दिसेना. त्याने शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी आपण तो हार काल गडबडीत खुंटीवर टांगला होता, याची त्याला आठवण झाली. लगेच त्याने आपल्या सर्व नोकरांना दिवाणखान्यात बोलावून हारासंबंधी विचारले. कोणी कबूल करेना. त्याने बराच धाक दाखवला. तरीही त्याची मात्रा चालेना. त्याला दरबारी जायचे असल्याकारणाने तो तसाच दरबारी गेला.
त्याची चिंताग्रस्त मुद्रा पाहून बिरबलने त्याला विचारले, “ आज काय तुमचा चेहरा काळवंडला आहे? कालचे बादशहाचे काम बरोबर झाले नाही का? महाराज काही बोलले का?” हे ऐकून त्या सरदाराने रत्नाचा हार चोरीला गेल्याची सारी हकिगत बिरबलाला सांगितली. बिरबल म्हणाला, “तुम्ही मुळीच काळजी करू नका. खरा चोर मी तुम्हाला पकडून देतो.”
बिरबलाने काठ्यांचा एक भारा आणवला. त्या काठ्या त्याने एकाच मापाच्या कापून घेतल्या व त्या साऱ्या काठ्या त्याने एकत्र बांधल्या. सरदाराच्या नोकरांना त्याने बोलावणे पाठविले. त्या सर्वांना एकत्र बोलावून तो त्यांना म्हणाला, “ या काठ्या मी एका मांत्रिकाकडून मंत्रून आणलेल्या आहेत. ही एकेक काठी तुम्हा प्रत्येकाजवळ देतो. ती तुम्ही घरी घेऊन जा व उद्या परत आणा. ज्याने तो रत्नहार चोरला आहे, त्याची काठी उद्या दोन बोटे वाढलेली असेल.”
एवढे सांगून त्याने प्रत्येकाच्या हाती एकेक काठी देऊन त्या सर्वांना रजा दिली. सारे जण घरी गेले.
ज्या नोकराने रत्नहारांची चोरी केली होती, त्यास मुळीच झोप येईना. आपली काठी उद्या सकाळपर्यंत दोन बोटे वाढली तर? हीच चिंता त्याला सतावीत होती. त्याला झोप येईना. बिछान्यावर पडून तो या कुशीवरून त्या कुशीवर तळमळू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. आपली काठी मुळातच दोन बोटे कमी केली तर? लगेच तो घरात गेला; त्याने कोयता आणला आणि ती काठी दोन बोटे कमी करून टाकली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबल त्या सरदाराच्या घरी आला. सारे नोकर कामावर हजर झालेलेच होते.
बिरबलाने एकेकाला बोलावून काठी तपासण्यास सुरुवात केली. ज्या नोकराने चोरी केली होती, तो आरामात होता. त्याने मुळातच काठी दोन बोटे कमी केली होती. आता त्याला बिलकूल भीती नव्हती. त्याने आपली काठी बिरबलाच्या हाती दिली. ती दोन बोटे कमी भरली. बिरबलाने लागलीच त्याला मानगुटीस पकडले आणि सरदाराला सांगितले, “हा घ्या तुमचा रत्नहार चोर.”
ह्या अनपेक्षित प्रसंगाने तो नोकर घाबरून गेला. त्याने बिरबलाचे पाय धरले. धन्याची माफी मागितली व आपणच हार चोरला, ही गोष्ट कबूल केली. तो चोरलेला हारही आणून दिला.
चोरी पकडण्यासाठी बिरबलाने कोणती युक्ती केली, हे त्या सरदाराला अजूनही समजले नव्हते.
बिरबलाने सांगितले, “ ह्या काठ्या मी कोणा मांत्रिकाकडून मंत्रून आणल्या नव्हत्या. पण जो खरा चोर असेल तो आपली काठी दोन बोटे कमी करेल हे मला चांगले माहीत होते. आणि अगदी तसेच झाले. या युक्तीने चोर मात्र हाती गवसला.” त्या चोराकडे वळून बिरबल म्हणाला, “हे पहा, दागिन्याने पुरुषाचे सौंदर्य कधीच वाढत नाही. शौर्य हाच खरा पुरुषाचा दागिना! हे शौर्य ज्याच्या अंगी असेल तोच पुरुष खरा सुंदर!”
Leave a Reply