जेष्ठ मराठी गायिका माणिक वर्मा या वंदना गुप्ते यांच्या आई. ‘अभिनेत्री’, ‘चारचौघी’, ‘अखेरचा सवाल’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न्’, ‘सुंदर मी होणार’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘श्री तशी सौ’, ‘सोनचाफा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशा अनेक नाटकांमध्ये वंदना गुप्ते यांनी काम केलं. त्यांचा जन्म १६ जुलै रोजी झाला. मात्र त्यांना स्वतःची ओळख दिली ती ‘अखेरचा सवाल’ या नाटकानं. अरुण जोगळेकर, दया डोंगरे, दत्ता भट या मंडळींबरोबरच विजया मेहताही या नाटकात काम करत होत्या. कर्करोगग्रस्त नंदू नावाच्या मुलीची ती भूमिका होती. दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं ‘सोनचाफा’ हे नाटक फार गाजले. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या या नाटकात काम केल्यामुळे एका स्वाभिमानी स्त्रीचं जगणं कसं असतं, ह्यात एका स्वाभिमानी स्त्रीची ही भूमिका होती. महेश मांजरेकर यांच्या ‘मातीच्या चुली’ या चित्रपटात मा.वंदना गुप्ते यांचा सहज सुंदर अभिनय आपल्याला बघायला मिळाला, खरं तर ‘पसंत आहे मुलगी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘लपंडाव’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘नॉट ओन्ली मिसेस राउत’, ‘भेट’, ‘मणी मंगळसूत्र’, ‘बे दुणे साडेचार’, ‘आंधळी कोशिंबीर’ इत्यादी चित्रपटामधून त्यांनी अभिनय केला आहे. मा.वंदना गुप्ते यांनी अभिनयाच्या क्षेत्रात विविध माध्यमातून लोकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केले आहे. मा.वंदना गुप्ते यांनी चित्रपटापेक्षा नाटकांत अधिक कामे केली आहेत. त्यांनी ५९ नाटके केली आहेत व विविध नाटकांचे दीड हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. सुयोग, चंद्रलेखा, श्री चिंतामणी अशा नामांकित नाट्यसंस्थांमध्ये काम केले आहे. त्यांनी निवडक मालिका व मराठी चित्रपटही अभिनय केला आहे. ‘समांतर’, ‘आई’, ‘एक चिरंजीव ज्योत’, ‘अभिलाषा’, ‘आंबट गोड’ इत्यादी निवडक मालिका त्यांनी केल्या. ‘या गोजिरवाण्या घरात’मधील कांचन नेनेची भूमिका अजूनही लोकांचा स्मरणात आहे.
वंदना गुप्ते यांना ‘नाट्यदर्पण’, ‘निर्माता संघ’, ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय’, ‘म. टा. सन्मान’, ‘महाराष्ट्र शासन पुरस्कार’ तसेच ‘मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ ,‘नटरंग कलागौरव पुरस्कार’ असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘पछाडलेला’ चित्रपटातील दुर्गा मावशी भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट विनोदी भूमिकेचा पुरस्कार मिळाला. ‘मातीच्या चुली’मधील सासूच्या भूमिकेसाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply