सकाळी सकाळी मुलीचा मेसेज आला होता की आता तू थोडा वेळ उठून बसू शकतेस तेंव्हा लिहियला सुरुवात कर. म्हणजे तुला बर वाटेल आणि नैराश्य दूर होईल. ग्रुपवर सगळे तुझी वाट पाहत आहोत. पण काय लिहावे कळत नाहीये पण माझ्या चातुर्मासाची समाप्ती लेकीने माझ्या इच्छे प्रमाणे पूर्ण केली आहे म्हणून हाच विषय मांडत आहे.
माझ्या लहानपणी चाळीतील बायका पहाटे पाच वाजता उठून सगळी पारोसी कामे आटोपून अंघोळ करून पुजेचे साहित्य घेऊन आवळी पुजनाला जायच्या आम्ही लहान मुली त्यांच्या सोबत जायचो. एकमेकांच्या सहकाऱ्याने परिसर स्वच्छ झाला व पुजेच्या पाण्याने झाड टवटवीत झाले होते. नैवेद्य आरती आणि प्रसाद म्हणून दिवाळीचा उरलेला फराळ म्हणून लाडू. फळाची फोड असे बरेच काही मिळायचे. लांब चालूच आलेले प्रदक्षिणा पूर्ण झाली की पाहे प्रसादाची वाट असे व्हायचे आणि सकाळी सकाळी खायला दिले की आंनद व्हायचा. आवळी भोजनाने सांगता व्हायची प्रत्येकाला एक पदार्थ वाटून दिला जाई. भली मोठी गोलाकार पंगत धपाटे. वांग्याची भरली भाजी शेंगदाण्याची चटणी. कांदा. काकडी. शेवटी गरम गरम खिचडी तूप. निसर्गाच्या सान्निध्यात असे जेवण त्याची मजा काही औरच असते. गेले ते दिन गेले. आठवणी आहेत फक्त. आणि त्या वेळी काही मुले हातात थाळी घेऊन हिंडत फिरत जेवत होते म्हणून आज्जी म्हणायची असे जेऊ नये अन्नाचा अपमान होतो. घारी झडप घालतात. भुकेलेले आशाळभूत पणे बघतात. तेंव्हा समजले नाही पण आता समजले…
एका ग्रामीण भागात नोकरी करत असताना मी एक माहेर जोडले होते. चातुर्मासाची सुरवात झाली होती आणि बायका कोणते व्रत कोणता नेम करणार याची चर्चा करताना मी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की तुमचे हे पहिले वर्ष आहे म्हणून तुम्ही तिन्ही संध्याकाळी दिवा लावला की एका सवाष्णीला घरी बोलावून पाटावर बसवून हळदीकुंकू लावून पाया पडत जा. यावेळी लक्ष्मी घरात येत असते तिचा आशीर्वाद मिळतो. आणि बऱ्याच व्रताची व समाप्तीती माहिती माझ्या भावजयीने सांगितली होती म्हणून मी शेवटी त्या सवाष्णीला थोड्या मोठ्या दोन वाट्या दिल्या होत्या. आर्धिक परिस्थिती नव्हती चांगली नाही तर चांदीचा करंडाच दिला असता. पुढे रोज तुळशीला माळा वस्र वाहिले व माझ्या भाच्चीला एक चिटाचे कापड घेऊन फ्रॉक शिवला होता माझ्या भावजयीला सहा मुली आणि परिस्थिती बेताची…
एका पिढीने पुढच्या पिढीला दिलेल्या चांगल्या संस्काराची ही शिकवण आहे. निरपेक्ष भावनेने केलेले व्रत आणि सांगता यात जे समाधान मिळते याचा अनुभव मी घेतला आहे तो मी आता परत लिहून पाठवते.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply