चेहऱ्याला सजवावे म्हणतो
अश्रूंना लपवावे म्हणतो,
नव्या ऋतूच्या स्वागताला
नव्याने उमलावे म्हणतो.
पुन्हा एकदा रुजावे म्हणतो
वादळवाऱ्यात तगावे म्हणतो,
कोसळणाऱ्या प्रपातातून
स्वत:ला वाचवावे म्हणतो.
पुन्हा एकदा उडावे म्हणतो
आभाळाला भेटावे म्हणतो,
सुकलेल्या एका दाण्यासाठी
दोन थेंब मागावे म्हणतो.
पुन्हा एकदा जगावे म्हणतो
ताठ उभे रहावे म्हणतो,
खोल ओलाव्याच्या शोधात
खोल खोल जावे म्हणतो.
झाडांपासून शिकावे म्हणतो
स्वत:ला सावरावे म्हणतो,
नको असलेले ओझे टाकून
पुन्हा एकदा बहरावे म्हणतो.
— अभय बापट.
Leave a Reply