नवीन लेखन...

छटा एकेरीच्या

“इकडनं कधी येणं होणार आहे?”, “इकडची स्वारी आज खूप खुश दिसतेय” असे आपल्या पतीला उद्देशून असलेले संवाद आमच्या पिढीने पौराणिक/ऐतिहासिक पुस्तकात वाचले किंवा सिनेमा मालिकांमध्येच ऐकले….तर परवाच एके ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला “या Stupid ला काही कळत नाही” असं म्हणताना ऐकलं. आता त्या “स्वारी” पासून या “स्टुपिड” पर्यंतचा हा प्रवास काही एका दिवसात झालेला नाही. या मध्ये बरेच टप्पे आले. स्वारी नंतर अहो जाहो, मग जेमतेम उखाण्यातूनच नाव घेणं, मग नुसतच अहो, मग अहोच्या पुढे नाव..अहो अमुक, अहो तमुक, मग एकांतात नावानी आणि बाहेर अहो, मग फक्त सासरच्यांसमोर अहो आणि बाकी सगळीकडे नावानी, कधी आडनावानी तर कधी लाडनावानी ते आता हे नावं ठेवण्यापर्यंत.. असे अनेक……

हाच बदल पुढच्या पिढीतही झाला आणि बऱ्याच घरातले “अहो बाबा” आता “ए बाबा” झाला…. पण हे सगळे बदल हे काळानुरूप झाले असल्याने त्यात गैर काहीच नाही. आणि मुळात ही त्या त्या परिवारातली “वैयक्तिक” बाब आहे आणि परस्पर सहमतीने झाली आहे त्यामुळे त्यात इतरांनी आक्षेप घेण्यासारखे देखील काही नाही…पण आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात मात्र आपण बरेचदा एकेरी संबोधन ऐकतो, वापरतो. त्यात काही प्रकार आहेत…त्याला अनेक छटा आहेत…

पहिला प्रकार म्हणजे… उद्धटपणा.. या प्रकारातील व्यक्ती कुठल्याही वयाच्या व्यक्तीला कुठल्याही वेळेस एकेरीच संबोधतात. त्यामुळे त्यावर फार काही लिहून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.

या पुढचा प्रकार हा साधारणपणे पौगंडावस्थेतल्या किंवा कॉलेजमधल्या मुलांमध्ये आढळतो. आपसात बोलताना आपल्या शिक्षकांचा नावानी किंवा टोपण नावानी उल्लेख करणे, एकमेकांना त्याच्या वडिलांच्या नावानी हाक मारणे वगैरे वगैरे….पण या अशा बोलण्यात नेहमीच “अनादर करणे” हा हेतू असतोच असं नाही…. असते ती फक्त एक craze… काहीतरी वेगळं, हटके, भन्नाट करण्याची… कालांतरानी ही मुलं मोठी होतात, वयानुसार विचारात परिपक्वता येते आणि आपोआपच ही craze कमी होते. मग ते सगळ्यांना योग्य तो मान देऊ लागतात…त्यामुळे ही एक तात्पुरती अवस्था आहे.

आजकाल एकेरी ला एक Corporate छटा देखील आहे. सध्याच्या Corporate culture मधला एक अलिखित नियम म्हणजे त्या corporate कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या नावानी आणि एकेरी हाक मारायचं. मग तो लहान असो वा मोठा, ज्युनियर असो वा बॉस…. बाकी बॉस म्हणून तो हाताखालच्या लोकांना छळायचं ते छळणारच आणि ज्युनियर सुद्धा बॉसच्या नावानी यथेच्छ खडे फोडणारच पण…. एकेरी उल्लेखाने friendly atmosphere असल्याचं “मृगजळ” मात्र सगळ्यांना दिसलं पाहिजे…..

अनेक जणांच्या बरोबरचे शाळा, कॉलेज, ऑफिस मधले मित्र मैत्रिणी किंवा शेजारी पाजारी राहणारे पुढे जाऊन उच्च पदस्थ अधिकारी, नेते, अभिनेते, उद्योगपती किंवा मोठे celebrity होतात… तेव्हा ही मंडळी चारचौघात अशा celebrity चा एकेरी उल्लेख करून थोडा भाव खाऊन घेतात… किंवा आज प्रत्यक्षात असली नसली तरी एकेकाळी आमची किती घसट होती हे दाखवतात…. ही एक वेगळीच छटा… अर्थात हे मजा मस्करी पर्यंत सीमित असेल तर ठीक पण कोणी याचा दुरुपयोग मात्र करता कामा नये.

काही जणांना कोणाच्याही पहिल्याच भेटीत एकेरीवर यायची सवय असते मग ते महिला असो वा पुरुष……., समोरच्याला रुचतंय की नाही याचा विचार न करता… सामाजिक, व्यावसायिक भान न बाळगता!…. कालांतरानी ओळख वाढली, मैत्री वाढली आणि मग आपसूकच एकेरीवर आले तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे…..

तर “या उलट” काही ज्येष्ठ व्यक्ती कायम लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना नेहमीच अहो जाहो करतात… तसं तत्वच असतं त्याचं…हा एक अतिशय चांगला शिष्टाचार असला तरीदेखील कधीकधी समोरच्याला त्याचं दडपण येतं.. विशेषतः ती व्यक्ती वयानी लहान असेल तर….अशा वडीलधाऱ्या किंवा गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींकडून कधी पाठीवर कौतुकाची थाप तर कधी काही चुकलं तर आपुलकीची चापटी हवी असते…. पण या अहो जाहोच्या तात्विक गोष्टीत अडकल्याने त्यात अडसर निर्माण होतो….आणि त्या नात्यात म्हणावा असा मोकळेपणा रहात नाही….

सगळ्यात शेवटचा एकेरी उल्लेखाचा प्रकार…. ही फार मजेशीर छटा आहे… सर्वांनी जाहीर रित्या कितीही अमान्य केलं तरी वास्तवात आपल्यातला प्रत्येक जण खाजगी गप्पांमध्ये.. “अमिताभनी दिवार मध्ये काय सॉलिड काम केलंय रे!!…. लता आणि आशा यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही बाई…लता ती लता आणि आशा ती आशाच!!!… कपिल सारखा bowler आणि गावस्कर सारखा batsman नाही रे अजून कोणी!!!!…. रेखा अजूनही किती सुंदर दिसते नै!…. आणि हेमामालिनी पण काही कमी नाही बरं का!!…. शंकर महादेवन ला तोड नाही!!!……….अशा प्रकारचे संवाद होतातच…

आपल्या पेक्षा “वयानी, मानानी, स्थानानी आणि सगळ्याच बाबतीत” फार मोठ्या असलेल्या अशा व्यक्तींना आपण अगदी बिनधास्त “अरे तुरे” करतो….पण या सगळ्यामध्ये त्यांचा अपमान करणे, अनादर करणे हा हेतू “अजिबातच नसतो”…. असते ती फक्त “आपुलकी”… त्यांच्यात आणि आपल्यात निर्माण झालेल्या एका “अदृश्य अश्या नात्याची”…. अगदी आपल्या घरचे सदस्य असल्यासारखं!….आपण आपल्या आई,मामा,मावशी,आत्या यांना जितक्या आपुलकीने “अरे तुरे ‘ अगं तुगं” करतो ना अगदी तसंच…..आणि हीच त्यांच्या कर्तृत्वाची खरी पावती आहे…

तेव्हा थोडक्यात काय तर…” “एकेरी” उल्लेख करण्यासाठी आपल्यातल्या नात्याची वीण मात्र “दुहेरी” असायला हवी”!!!……

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..