किशोरवय हे वय स्वतःला शोधण्याचं असतं, समाजामध्ये स्वतःच स्थान मोजण्याचं असतं आणि या विश्वाच्या अफाट पसार्यात स्वतःच्या बिंदुभर अस्तित्वाला जपण्याचसुध्दा असतं. या वयात जर मुलांना योग्य दिशा देणारा मार्गदर्शक मिळाला, तर पुढे नक्कीच ते जीवनात काहीतरी भव्य दिव्य असं करू शकतात. या वयात जर मुलांना विविध छंद जोपासण्याची, आपल्यामधील क्षमता पारखून घेण्याची, व स्वतःमधील शारिरीक आणि बौध्दिक शक्ती योग्य ठिकाणी वापरण्याची जर हक्काची जागा मिळाली तर त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याच्या प्रक्रेला वेग प्राप्त होतो आणि जर समवयीन मुलामुलींमध्ये मिसळून त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करुन जर त्यांना घडवणारे छात्र-प्रबोधन सारखे व्यासपीठ मिळाले तर विचारायलाच नको. या वयात जर मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास शिकवले, त्यांना प्रत्येक गोष्टींकडे बघण्याची स्वतःची नजर विकसीत करण्यास शिकवले, तर त्यांच्या आयुष्याला ते एखाद्या शिल्पाप्रमाणे रेखीव आणि कलात्मक बनवू शकतात. या विचारांनी प्रभावित झालेले, राज जोशी आणि त्यांचे काही सहकारी यांनी अलिबागमध्ये छात्र प्रबोधन सुरू केले आणि किशोरवयीन मुलांच्या अलोट प्रतिसादामुळे आणि उत्साही सहभागामुळे ते अल्पावधीतच बहरले. छात्र प्रबोधनने या मुलांना विविधांगी विचार करण्यास शिकवले, त्यांच्यात कृतीशिलतेची बीजे पेरली आणि रुजवलीसुध्दा, व त्यांना प्रत्येक गोष्टींकडे जबाबदारीने आणि कलात्मतेने बघण्यास सुध्दा शिकवले.
छात्र प्रबोधनतर्फे अनेक गिर्यारोहक भटकंती शिबीरे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आयोजित करण्यात आली व हरवत चाललेल्या गड संस्कृतीला तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळाला. अलिबागमधील अनेक युवकांनी या शिबीरांना हजेरी लावली मजा आणि मनोरंजन हा या भटकंतीमधील भाग होता, तिच्यामागचा उद्देश किंवा हेतु नाही. कारण याशिवाय या शिबीरामध्ये अनेक उपक्रम राबवले गेले, डोंगरांवर आणि पठारांवर बिया उधळण्याचा कार्यक्रम घेतला गेला, स्फुर्तीगीते गाऊन देशप्रेमाची आणि स्वाभिमानाची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवती ठेवली गेली, ज्या जागेवर आपण उभे आहोत त्या जागेचा इतिहास आणि भुगोल सर्व गिर्यारोहकांना सोप्या भाषेत समजावून सांगितला गेला, सर्व गिर्यारोहकांना पर्यावरणाविषक संदेश देवून अशा ठिकाणी कचरा न फेकण्याचा कानमंत्र दिला गेला, अनेक संवेदनशील सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर चर्चासत्रे ठेऊन सगळयांना मुक्त बोलण्याची परवानगी दिली गेली. थोडक्यात काय, तर या शिबीरांमार्फत तरूणांचे डोळे उघडले गेले, आजूबाजूचे डोंगर आणि झाडे त्यांना मित्रांसारखी वाटायला लागली. व त्यांच शरीर काटक आणि लवचिक तर झालचं, शिवाय त्यांच मन डोंगराप्रमाणे विशाल आणि खळखळत्या झर्याप्रमाणे निर्मळ आणि पारदर्शी बनले. छात्र प्रबोधनने सर्व तरूणांना कुणालाही हानी न पोहोचवणारी निखळ मजा करण्यास शिकवले. ही मजा निरागस तर होतीच, शिवाय ती निर्दोषसुध्दा होती. या गिर्यारोहक शिबीरांद्वारे तरुण स्वतःच्या मर्यादा ओळखायला तर शिकलेच त्याचबरोबर प्रचंड जिद्दीने आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करायलासुध्दा शिकले. नेहमीच्या शाळा, अभ्यास, टीव्ही आणि संगणक यांच्या चाकोरीतून मुक्त होवून ते निसर्गाशी समरस व्हायला शिकले, कमीत कमी सुविधांमध्ये जास्तीत जास्त मजा करायला शिकले, व स्वतःच्या शारिरीक क्षमता अधिक ताणायलासुध्दा शिकले. उभ्या उभ्या जेवण, विविध सामुहिक खेळ, गटचर्चा, सर्व डबे आपापसात वाटून खाणं, यामुळे अनोळखीपणाच्या बेडया तर तुटल्याच शिवाय मैत्रीच्या बंधांनी तरुणाईची मने जुळली, विचारसुध्दा जुळले आपण कुणीतरी खास आहोत किंवा दिव्यत्चाचा थोडा अंश आपल्यातसुध्दा आहे, याची जाणीव सर्व प्रबोधकांना झाली.
या शिबीरांद्वारे त्यांना स्वावलंबनाची शिकवणसुध्दा दिली गेली. या शिबीरांच्या सर्व नियोजनाची जबाबदारी सर्व प्रबोधकांवरच सोडली जायची. ट्रेकचे ठिकाण ठरवणे, सर्व खर्चाचा अंदाज बांधणे, सर्वांना या सहलीमध्ये सहभागी करून घेणे, नकाशे घेवून त्या ठिकाणाच्या आसपासच्या खुणा जसे रस्ते, नद्या, कंपन्या, डोंगर इ. तपासणे, त्या जागेचा इतिहास, भुगोल, वातावरण आणि विशेष गुणांचा आढावा घेणे, या सर्व जबाबदार्यांमधून मुलं आतून विचार करण्यास शिकली त्यांच्या नेतृत्वगुणांना, तसेच आपापसातील सहकार्याला वाव मिळाला.
आकाशदर्शन:
अलिबागमध्ये आकाशदर्शनाचा घाट सर्वात पहिल्यांदा शुक्राचे अधिक्रमण या १२५ वर्षांनंतर घडणार्या एका घटनेच्यावेळी घातला गेला. या ऐतिहासिक घटनेच्या आधी काही दिवस आर. सी. एफ. क्रीडा संकुलामध्ये या घटनेबद्दल सविस्तर माहिती देणारं प्रदर्शन, चित्रे तक्ते व प्रतिकृतींसह भरवले गेले. १० ते १२ उत्साही युवकांनी आधी स्वतः या घटनेचा सखोल अभ्यास केला, व मग इतर लोकांना या दुर्मिळ घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. ८ जूनला, म्हणजे प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी जवळपास १००० लोकांनी वाचनालयाच्या भिंतीवर लावलेल्या प्रोजेक्टद्वारे तर काहींनी टेलिस्कोप लावून ही ऐतिहासिक घटना बघण्याचा आनंद घेतला. यानंतर आकाश अभ्यासण्याची आवड व गोडी असलेले काही तरुण आपणहून पुढे आले, व मग उल्कावर्षाव, चंद्रग्रहण, सुर्यग्रहण, विधानयुती आणि शुक्राची कोर पाहणे, अशा विविध सामुहिक कार्यक्रमांद्वारे आकाशदर्शनाचा पाया रचना गेला.
वाचक मेळावा :- मे महिन्याच्या सुट्टीत अलिबागमध्ये मुलांच्या प्रतिभाशक्तीला आणि निर्माणशक्तीला वाव देणारी अनेक शिबीरे आयोजित करण्यात आली, या सर्वांमध्ये लक्षणीय ठरलेले शिबीर म्हणजे वाचक मेळावा. या मेळाव्यात प्रत्येक वाचकाचा वाचनवेग मोजण्याचा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला व चुकीच्या वाचनाच्या पध्दती टाळण्यासाठी, तसेच नजरेचा आवाका वाढवून आकलनासहित वेगाने वाचन करण्यासाठी अनेक सोपी तंत्रे व क्लुप्या वाचकांना शिकवल्या गेल्या.
सायकल सहली:- अलिबाग परिसरात तसेच रायगड जिल्हयात मिळून ४ सायकल सहली घेण्यात आल्याण् त्यांना प्रबोधकांचा तुडुंब प्रतिसाद लाभला. यातील रायगड जिल्हा सायकल सहलीमध्ये पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे युवकसुध्दा सहभागी झाले होते, ही सायकल सहल अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, म्हसळा, पाली, नागोठणे या निसर्गरम्य टुमदार गावांना प्रदक्षिणा घालून पार पडली.
ग्रामीण परिचय शिबीर:- पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीतर्फे महाराष्ट्राच्या आसपास पसरलेल्या अनेक खेडयांमध्ये ग्रामीण परिचय शिबीरे घेण्यात आली, ज्यात ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्या अनेक गावांच्या पर्यावरणाची, रिवाजांची, परंपरांची, व्यवस्थेची आणि आर्थिक उलाढालीची ओळख शहरी युवकांना करून देण्यात आली. आतल्या गावांमध्ये कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय राहायचं, तिथल्या गावांचे, गावकर्यांचे, स्त्रियांचे प्रश्न जाणून घ्यायचे, ग्रामसेवकांची भेट घेवून त्यांच्या मदतीने स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम आखायचे व राबवायचे, सामुहिक खेळांमध्ये आणि विवीध उपक्रमांमध्ये तिथल्या मुलांना सहभागी करून घ्यायच, हा या शिबीरांमागचा हेतु होता.
कथाकथन आणि महाभारती ः- मुलांच वक्तृत्व सुधारावं, त्यच्या हावभावांमध्ये आणि गोष्टींमधील पात्र रंगवण्यामध्ये सादरीकरणाच तंत्र आजच्या युवकांनी आत्मसात करावं या अनेक हेतुंमुळे सामुहिक कथाकथनाचा उपक्रम अलिबागमध्ये योजण्यात आला. त्यात प्रत्येक मुलाने एक प्रभावी गोष्ट तयार करावी, इतरांना सांगावी, इतरांनी जिवंतपणा यावा, लोकांबरोबर एखादी गोष्ट शेअर करताना येणारी भीड चेपावी आणि प्रभावी त्याने गोष्ट सांगताना केलेल्या चुकांच आणि आलेल्या उठावदारपणाच विश्लेषण करावं अस ठरलं. आणि बरेच आठवडे हा उपक्रम चालला.
— अनिकेत जोशी
Leave a Reply