छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला.
संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. मोगलांकडे गेलेल्या मराठा सरदारांना मराठ्यांच्या राज्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना ते म्हणत, “”हे मऱ्हाठे राज्य तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्ष्या-अभिमान) धरून स्वामिकार्य करावे.” शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा धर्माचे रक्षण करणे ही तुमची- माझी सर्वांची प्रामाणिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी या सरदारांना करून दिली.
राजाराम महाराजांनी सटवाजी डफळे, नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने, गणोजी शिर्के इत्यादी मोगलांकडील मराठा सरदारांना स्वराज्यात परत आणण्याचे काम केले. नावजी बलकवडे, विठोजी करके, बहिर्जी घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, गंगाजी बाबर, अमृतराव निंबाळकर, गिरजोरी यादव, कृष्णाजी सावंत, चांदोजी व नागोजी पाटणकर, बडोजी ढमाले, मकाजी देवकाते, नामाजी गायकवाड इत्यादी सरदार या काळात नावारूपाला आले.
राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे पराक्रमी सरदार उदयाला आले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, “”राजाराम मोगलशाही पालथी घालील.” त्यांचा हा विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार करून लष्करी मोहीम काढणारे कृष्णा सावंत हे पहिले मराठा वीर होते. राजाराम महाराजांनी जिंजीवरून महाराष्ट्रातील लष्करी मोहिमांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत पाठवली. विशेषतः १६९० मध्ये एक लाख होनांचा खजिना त्यांनी रायगडाकडे पाठवला होता.
स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. राजाराम महाराज हे पराक्रमी, निर्भीड, मुत्सद्दी, समंजस, धोरणी, प्रजावत्सल राजे होते. मोगलांशी कडवी झुंज देत स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
१६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये धनाजी जाधव, परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली. पण या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली, मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराज यांचे ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply