छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले आणि १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे. शिवाजी महाराजांचे लढावू आयुष्य, सुरुवातीचा लढा, पहिली स्वारी आणि तोरणागडावरील विजय, शहाजीराजांना अटक, जावळी प्रकरण, आदिलशहाशी संघर्ष, अफझलखानाचा वध, प्रतापगडावरची लढाई, कोल्हापूरची लढाई, सिद्धी जोहरचे आक्रमण, पावनखिंडीतील लढाई, पुरंदराचा तह, मोगल साम्राज्याशी संघर्ष, शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेची पहिली लूट, मिर्झाराजे जयसिंग प्रकरणे, आग्य्राहून सुटका, सवर्त्र विजयी घोडदौड, राज्याभिषेक, दक्षिणेतील दिग्विजय असा शिवाजीराजांचा एकंदर इतिहास मन भारावून टाकणारा आहे.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन ३ एप्रिल १६८० रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply