नवीन लेखन...

छोटा पेग

(गी द मोपासा च्या ‘The Little Keg’ या कथेवर आधारित)

मारुतराव चिकटे, वय अंदाजे चाळीस वर्षे, कोल्हापुरातल्या ‘चिकटे रेस्टॉरंट आणि बार’चे उंच पण तुंदिलतनु मालक. चिकटेमालक त्यांच्या ओळखीच्या मंडळीत सरनोबतवाडीतले मोठे ‘जबराट बिझनेसमॅन’ होते. बॉक-बॉक-बॉक-बॉक आवाज काढणाऱ्या बुलेट मोटरसायकलवरून ते रोज सकाळी आपल्या शेताकडे फेरफटका मारायला येत असत. त्यांच्या शेताला लागूनच एक छोटासा जमिनीचा तुकडा रखमाबाई सरनोबत ह्या सत्तरी गाठलेल्या, अंगाची धनुकली झालेल्या म्हातारीच्या मालकीचा होता. म्हातारीचं घरही त्या जमिनीवरच होतं. चिकटे मालकांचा डोळा होता त्या जमिनीवर. आजवर कितीदा तरी त्यांनी म्हातारीला पटवून जमीन विकत घ्यायचा प्रयत्न केला होता. पण म्हातारी बधत नव्हती. म्हणायची, “आरे बाबा, मी हितं, ह्या जमिनीवरच जलमले आणि ह्या जमिनीवरच राम म्हणणार आहे.” आज पुन्हा परत जाताना चिकटेमालकांनी त्यांची मोटरसायकल रखमा ‘आज्जी’ च्या घरासमोर थांबवली आणि उतरून घरात शिरले.

रखमाआज्जी चाकूनं बटाट्याची सालं काढत बसल्या होत्या. चिकटेमालकांनी आज्जीच्या खांद्यावर थोपटलं आणि “काय आज्जी? कसं काय?” म्हणत तिथंच तिच्या शेजारी बसले.

“चांगल आहे की बाबा.”

“आज्जी, तू चांगलीच असतेस ग नेहमी. बरं वाटतं बघ तुला असं बघून.”

“हय रे माज्या बाबा. आता तू कसं हाईस ते सांग.”

“मी मस्त धडधाकट आहे बघ. नाही म्हणायला जरा गुढग्यात आखडल्यासारखं वाटतंय मधनं मधनं, तेवढंच.”

“बरं हाये बाबा. असाच धडधाकट ऱ्हा.”

आज्जी यापेक्षा जास्त काही बोलली नाही. तिच्या जवळच बटाटयांचा ढीग होता. ती एका हातानं खेकड्याच्या वाकड्या नांगीसारख्या बोटात बटाटा पकडून दुसऱ्या हातात धरलेल्या चाकूनं त्याची सालं सराईतपणे काढत राहिली. दोन कोंबड्या तिच्या अवतीभवती फिरत होत्या. आज्जीनं टाकलेल्या सालांपैकी एखादं साल टप् कन् चोचीत पकडून उगाचच कुणीतरी पाठी लागल्यासारख्या पंख फडफडवत पळत होत्या.

चिकटेमालक थोडा वेळ चुळबुळ करत बसले आणि मग म्हणाले, “आज्जी, ऐक. एक बोलू का?”

“काय रं बाबा? बोल की.”

“मग काय? तू नाही विकणार तुझी ही जमीन मला? नक्की?”

“तुला कितींदा सांगू रं माज्या पुता? न्हाई विकायची मी माजी ही जमीन. पुन्ना विचारू नकोस बग.”

“बरं बरं. विकू नको. पण माझ्यापाशी एक नवीन आयडिया आहे. बघ तुला कशी वाटते ती. दोघांच्याही फायद्याची आहे. ऐक तर खरी!”

“काय म्हन्तोस?”

“तू जमीन मला विकायची, पण ती तुझ्यापाशीच राहील……. तू मरेपर्यंत. कळतय का? नाही? ऐक नीट. असं बघ. तू इथंच राहशील आत्ता राहतीस तश्शी. मी तुला दर महिन्याला तीनशे रुपये आणून देत जाईन. इथं, तुझा हातात. तू मस्त धडधाकट आहेस. आणखी वीस वर्षं तरी काय गचकत नाहीस. खरं का नाही? तोपर्यंत दर महिन्याला ३०० रुपये न चुकता तुला मिळत राहतील. काय? कळतंय का?”

म्हातारीनं हातातला चाकू खाली ठेवला, डोक्यावरचा पदर सरकवून नीट केला आणि डोळे आणखीनच बारीक करून चिकटेमालकाकडं बघत राहिली. जरा वेळानं म्हणाली, “कळलं मला. पन् येक लक्ष्यात ठ्येव, माजी ही जमीन, नि ह्ये घर, मी तुला शाप्प विकनार न्हाई आनि मी हितनं कुटं जानार न्हाई.”

“ऱ्हायलं की. मी कुठं तुला इथनं उठवायला लागलोय? आज्जे, तुझा नवरा मरून आज पंधरा वर्षं झाली. तुला ना मूल ना बाळ. भावाची दोन वाया गेलेली पोर आहेत पण ना ती तुला विचारत ना तू त्याना जवळ करत. मग तू मेल्यावर तुला ह्या जमिनीचा काय उपयोग? त्यापेक्षा आता मी तुला पैसे देतो ते तुझ्या कामाला तरी येतील. तू फक्त वकिलासमोर करारनाम्यावर सही करायची की तू मेल्यानंतर हा सगळं बारदाना चिकटेमालकांचा म्हणून. बस्स. मग तू जगशील तोपर्यंत तूच खा ह्या जमिनीतनं पीक काढून. मी नाही येणार मागायला. येणार तो फक्त तुला ३०० रुपये द्यायला, महिन्याच्या महिन्याला. कळतय का?”

रखमाबाईचा विश्वास बसत नव्हता. पण तिच्या मनात थोडी चलबिचल व्हायला लागली होती हे खरं. ‘सौदा फायद्याचा वाटतो खरा. म्हणावं का हो?’ जरा वेळानं ते म्हणाली, “तू म्हंतोस त्ये बरूबर हाय, पन् मी ईचार करतो. टाईम दे थोडा. येक आटवडयानं ये परत. तवा सांगतो.”

चिकटेमालक खूष होऊन उठले आणि जायला निघाले.

रखमा आज्जीची झोपच उडाली होती. रात्रभर विचार करत राहिली. पुढचे चार दिवस सुध्दा ‘काय करावं? चिकट्याला हो म्हणावं का? की नको?’ ह्या उलाघालीतच गेले. पाचव्या दिवशी ती गावातल्या पाचपुते वकिलाकडं गेली सल्ला घ्यायला. पाचपुतेवकिलांनी ऐकून घेतलं आणि सल्ला दिला, “रखमाबाई, हो म्हणून टाका. अनमान करू नका. तुमचा फायदाच आहे यात. फक्त चिकट्याला म्हणाव तीनशे नाही, पाचशे दे दरमहा. तुमच्या जमिनीची किंमत आजच्या भावानं नव्वद हजारांच्या खाली नाही. पाचशे दरमहा दिले त्यानं आणि तुम्ही आणखी दहा बारा वर्षं जगलात तरी चिकट्याला ती पंच्याहत्तर हजाराच्या आतच मिळणार आहे. तो पण खूष होईल आणि तुमचा तर काय फायदाच फायदा.”

आज्जी खूष झाली पाचपुते वकिलांचा सल्ला ऐकून. तरीही तिच्या मनात शंका येतच राहिल्या की ‘यात काही काळंबेरं नसेल ना? चिकटे तयार होईल का पाचशे रुपये द्यायला?’ अखेर बराच विचार करून तिनं वकिलांना सांगितलं करारनामा तयार करायला आणि मग घरी परतली. दुसऱ्या दिवशी जेव्हा चिकटे आले तेव्हा म्हातारीनं बराच वेळ मला विकायची नाही जमीन असं ताणून धरलं. पण मग जेव्हा सौदा हातचा जातोय की काय असं वाटायला लागलं तेव्हा मेहरबानी करत असल्याचा आव आणून म्हणाली, “तू काय माजा पिच्छा सोडीत न्हाईस. बssर, देतो तुला जमीन आणि ह्ये घर पन्. मातुर म्हैना पाचशे रूप्पय पायजेत. देतोस?”

“आज्जे, का ओढून धरते आहेस? किती हाव करशील? चल्, साडेतीनशे देतो. बास?”

“न्हाई रं माज्या सोन्या, आरं, ह्या जमिनीचीच किंमत येक लाखाच्या खाली न्हाई, आनि वर ह्ये घर! आरंss, मी कटाकटी पाच, न्हाई तर सा वरसं जगन. माजी तब्येत बगतूयास तू. म तुला किती सस्त्यात पडतोय वेव्हार बग की.”

“तुला काय धाड भरलीय? चांगली शंभरी गाठशील तू. तुझ्या आधी मीच जाईन कदाचित.” चिकटेमालक म्हणाले.

“नको रं माज्या पुता आसं वंगाळ बोलूस. औक्षवंत हो बाबा.” असं म्हणून आज्जीनं दोन्ही हातांची बोटं मोडून चिकटेच्या गालावरून ‘अला बला’ केली. चिकटे गहीवरले आणि त्यांनी पाचशे दरमहा द्यायचं कबूल केलं.

“आनि वकिलाची फीसुद्दीक तूच भरायचीस बरं का! आदीच सांगतो. मागनं न्हाई म्हनू नकोस.” म्हातारीनं आणखी एक पाचर ठोकून खुंटा हलवून बळकट केला.

करारनाम्यावर सह्या झाल्या आणि पहिले पाचशे रुपये म्हातारीच्या हातात पडले.


तीन वर्षं झाली. पण म्हाताऱ्या रखमाबाईचं वय अगदी एका दिवसानंसुध्दा वाढलं असं दिसेना. रोजन् रोज तुकतुकीतच दिसायला लागलीय असं चिकटेमालकांचं मत व्हायला लागलं. त्यांचा धीर सुटायला लागला. त्यांच्या मनात आलं, ही तरणी म्हातारी अशीच पंधरा वर्षं जगली तर सौदा आपल्यासाठी आतबट्टयाचा होईल हे नक्की. पण काय करणार? बांधले गेलो आहोत ना करारानं! ते आता नेमानं रोजच म्हातारीच्या घराकडं जाऊन बघत. पहिला पाऊस कधी पडतोय ते बघायला शेतकरी जून महिन्यात रोज आभाळाकडं नजर लावतात की नाही? तसंच झालं त्यांचं. म्हातारी झोपडीच्या दारातून तिच्या लुकलुकत्या डोळ्यातलया धूर्त नजरेनं चिकटेमालकांकडं बघायची. तिला समजायचं की चिकटेमालकाच्या मनात आत्ता आपल्यासाठी ‘कधी मरणार ग तू थेरडे?’ हाच प्रश्न असणार.

मग एक दिवस चिकटे त्यांची बॉक-बॉक फटफटी – बुलेट म्हातारीच्या दारात थांबवून आत शिरले. म्हातारीची चौकशी करून इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि खिशातून शंभर शंभराच्या पाच नोटा काढून तिच्या हातात देत म्हणाले. “आज्जे, अगं इतकी वर्षं झाली मी हॉटेल आणि बार उघडून पण तू एकदा सुध्दा आली नाहीस तिकडं. असं का? ये की एकदा. आपली मैत्री झाली आहे न आता? म माझ्याकडची मटणाची थाळी. खाऊन बघ एकदा. एकदम स्पेशल असते. घाबरू नको, मी काय पैसे घेणार नाही तुझ्याकडून. आज्जी आहेस तू माझी. पैसे कसे घईन? कधी येतेस? सांग मी येतो तुला न्यायला माझ्या बुलेटवरून.”

“आरं लेकरा, ही रखमा कुणी बलिवल्याबिगर जाईत न्हाई कुटंबी. आता तू आज बलिवलंस, मं येतो की. परवाच्याला आईतवार हाय न्हवं? ते दिवशी येतो. यीऊ?”

“ये. ये. रविवारी मी जरा बिझी असतो. पण माझ्या माणसाला पाठवतो मी संध्याकाळी तुला न्यायला.”

रविवारी संध्याकाळी चिकटेमालकांनी हॉटेलातल्या गणपतला सरनोबातवाडीत रखमाबाईला आणायला पाठवलं. तोंडावर पदर घेऊन, बुलेटच्या मागच्या सीटवर दोन पाय दोन बाजूला टाकून बसलेल्या रखमा आज्जीला बघून चिकटेना खूप आनंद झाला. गल्ल्यावरून उठून त्यांनी दारात जाऊन प्रेमानं आज्जीला हाताला धरून आत आणलं. हॉटेल फिरून दाखवलं आणि मग स्पेशल रूम मध्ये नेऊन बसवलं. स्वत:ही तिच्यासमोर बसले. वेटरला बोलवून आज्जीसाठी स्पेशल मटन थाळी आणायला सांगितली. आग्रह करून तिला जेवायला लावलं. म्हातारी तशी रात्री कमी जेवणारी होती पण चिकटेमालकांचा आग्रह मोडायचा नाही म्हणून जरा जेवली.

जेवण झाल्यावर चिकटेमालक म्हणाले, “आज्जी, बाहेर थंडी फार आहे न? आणि त्यात जेवण झाल्यावर तर जास्तच थंडी वाजते. काही गरम पिशील का?”

आज्जी म्हणाली, “च्या? न्हाई र् बाबा. जेवल्यावर कुनी च्या पितंय व्हय रं?”

“अगं चहा नाही. दारू म्हणतोय मी. आमच्याकडं देशी, फॉरेनची अशी सगळ्या प्रकारची दारू मिळते. बघ तर घेऊन.”

“नको रं बाबा. माजा न्हवरा हुता तवा त्यानं एकडाव मंबईस्न येताना आणलाता येक खंबा. तवा प्येलेलो दोगबी. लई घुमलीती. त्यावर पुन्यांदा न्हाई प्येलो.”

“अगं तेव्हा गावठी प्यालीस. आता जरा चांगली घेऊन बघ. काय घुमणार नाही. स्पेशल आहे.” असं म्हणून मालकांनी गणपतला हाक मारून डी एसपी ची बाटली आणि दोन ग्लास मागवले.

गणपतनं सारं काही आणल्यावर मालकांनी दोन ग्लासात ती व्हिस्की ओतली. म्हणाले, “घे आज्जी. इतकीशीच तर दिलेय. ‘छोटा पेग’ म्हणतात याला. तुला आवडेल ही नक्की.”

म्हातारीनं एक घोट सावकाश घेतला. मग जरा वेळानं दुसरा घेतला. चव आवडल्याचं दिसलं तिच्या तोंडावर. म्हणाली, “व्हय की रं बाबा. चांगली लागती. घुमत न्हाई. वत बरं आनि येक, छोटा पेग का काय म्हन्तुस त्ये.”

“मग? मी म्हटलंच होतं तसं.” असं म्हणत त्यांनी ती नको म्हणत असताना दोघांच्याही ग्लासात फुल पेग व्हिस्की ओतली. आज्जीनं यावेळीपण चवीनं घुटके घेत घेत सावकाश ग्लास रिकामा केला.

“बघ आज्जे. असं मजेत जगायला पाहिजे” म्हणत चिकटेमालकांनी तिसरा पेग ओतला. म्हातारी जेमतेम अर्धाच प्याली आणि तिनं ग्लास बाजूला सारला. आतापर्यंत चिकटे मालकांचीही जीभ जरा जड झाली होती आणि औदार्य वाढलं होतं. “हे बघ रखमा आज्जी. तुला ही दारू आवडली. आवडली की नाही? आं? होय नं? खरं बोल, मनापासून! मग मला पण समाधान झालं बघ. आगदी मनापासून. पण आता रात्र फार झालीय. तुला घरी जायला पाहिजे. कोंबड्या वाट बघत असतील तुझ्या. होय की नाही? बssर. नीघ आता. गणपत, आज्जीला नीट सांभाळून तिच्या घरी सोडून ये. आज्जे, तू माझी प्रेमाची आज्जी आहेस. उद्या तुला माझ्याकडून स्पेशल भेट घेऊन येतो मी बरं का. जा आता.” आज्जी गणपतबरोबर बुलेटवर बसून गेली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चिकटे रखमाबाईच्या घरी गेले तेव्हा त्यांनी बरोबर डी एस पीच्या दोन फुल बाटल्या नेल्या आज्जीला स्पेशल भेट म्हणून. म्हणाले, “आज्जी, बघ एक घोट घेऊन, तुला आवडली होती तीच, कालचीच, आहे का नाही ते.”

आज्जी म्हणाली, “आरं उघड की बाबा. मला काय येतीय व्हय आसली बाटली उघडायला?”

चिकट्यांनी एक बाटली उघडली, म्हातारीनं वास घेतला आणि म्हणाली, ‘व्हय की, कालच्यासारकीच हाय. पिनार का तू बी?” आणि तिनं दोन कप आणले आतनं. मग तिनं आणि चिकटेमालकांनी एक एक करत तीन तीन पेग रिचवले. त्यानंतर “आज्जे मला बास झाली. जायला पाहिजे मला आता. पण हे बघ, ह्या बाटलीत अजून उरली आहे थोडी. आणि दुसरी फुल्ल आहे. कधी वाटलं तर घेत जा. आणि संपली तर सांग. भीड बाळगू नको. आणखीन देतो तुला. आणि हे बघ, कुणाला सांगू नकोस ही दारू मी तुला देतो म्हणून. काय आहे, लोकं लागतील माझ्या मागं आम्हाला पण द्या म्हणत.” म्हणत चिकटेमालकानी निरोप घेतला.

त्यानंतर चार दिवस चिकटे म्हातारीच्या घराकडं फिरकले नाहीत. पाचव्या दिवशी गेले तेव्हा म्हातारी भाकरी थापत होती. चिकट्यांनी विचारलं, “आज्जी, काय भाकरी करतेस होय?”

“दिसत न्हाई व्हय रं तुला? आंदळा झालाईस?” आज्जी गुरकावली. चिकटे जरा जवळ गेले. म्हातारीच्या तोंडातनं भपकारा येत होता – व्हिस्कीचा.

“आज्जी अगं चार दिवस झाले तुझ्या बरोबर प्यायला बसून. म्हटलं आज बसावं. आहे का शिल्लक घोटभर? नाहीनाही, नसेल तर काळजी करू नकोस. माझ्याकडं आहे बुलेटच्या डिक्कीत. आणतो मी.” चिकटेनी डिक्कीतून आणलेल्या दोन फुल बाटल्या म्हातारीला दिल्या. दोघांनी मग परत दोन दोन पेग चढवले आणि चिकटेमालकांनी निरोप घेतला आज्जीचा.

हळू हळू आख्ख्या सरनोबतवाडीच्या लक्षात येत गेलं की म्हातारी दारू प्यायला लागली आहे म्हणून. कधी तिच्या चुलीपुढं तर कधी शेतात आणि नंतर नंतर रस्त्यावरसुध्दा नशेत पडलेली दिसायची म्हातारी. उचलून आणून ठेवायचे लोक तिला तिच्या घरात. चिकटेमालकानी तिच्या घरी वरचेवर जायचं सोडलं. महिन्यातून एकदा पैसे आणि ‘स्पेशल भेट’ देण्यापुरते जायचे. लोक म्हातारीतल्या बदलाविषयी सांगायचे तेव्हा म्हणायचे, ‘वाईट वाटतंय. या वयात तिनं असं दारूच्या आहारी जायला नको होतं. पण कुणी सांगायचं नि काय सांगायचं! एकटीच राहाते, विरंगुळा म्हणून ही वाट धरली असेल तिनं. कसंही असलं तरी एकंदरीत वाईटच. मरायची अशानं एक दिवस.”

आणि एक दिवस खरंच रखमाआज्जी मेली. सहा महिने काढले असतील जेमतेम. पावसाळा सुरू झाला आणि एक दिवस तिच्या घराच्या पायरीवरच पडली. पडली ती एकदम निपचितच!. ज्यानं बघितलं तो उठवायला गेला तर तोवर कारभार संपलेला होता.

मर्तिकाला चिकटेमालक गेले तेव्हा खिशातला कारारनाम्याचा कागद चाचपून बघत म्हणाले, “गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये, पण म्हातारीला दारूच्या आहारी जायची अवदसा सुचली नसती तर कदाचित अजून दहा वर्षं जगली असती.”

— मुकुंद कर्णिक.

दुबई

karnik.mukund@gmail.com

Whatsapp : +971505973810

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

4 Comments on छोटा पेग

  1. मजेशीर संवाद.. म्हातारी न चिकटे ची फजिती करायला हवी होती. दारू प्यायचं नाटक करुन. लब्बाड चिकटे ने घात केला.. अखेरीस.. ?

  2. चिकटे नावा प्रमाणे चिकट निघाले. रखमा आज्जीची राख केली.
    कथेतील संवाद चांगले रंगवले आहेत. पुढे काय याची उत्सुकता वाटत राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..