पत्रिका छापताना मुलासाठी केवळ ‘चिरंजीव’ आणि मुलीसाठी चिरंजीव ‘सौभाग्यकांक्षिणी’ असं लिहिलं जाताना आपण वाचलं असेल. हे असं लिहिणं प्रथेचा भाग म्हणून ते वाचून सोडूनही दिलं असेल. परंतू असा भेद का, हा प्रश्न कुणाला कधी पडतो असं मला वाटत नाही.. चिरंजिवित्व आणि चिरतरुणत्व तर प्रत्येकालाच हवं असतं हे खरंच आहे. मग पत्रिकेत ते फक्त मुलालाच का आणि मुलीसाठी ‘सौभाग्यकांक्षिणी’ असा वेगऴा शब्दप्रयोग का, असा प्रश्न मला पडला..अर्थात माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असल्याने, हा वेळ घालवण्यासाठी असले काहीतरी प्रश्न मला पडत असतात..जगण्याच्या संघर्षात अशा प्रश्नांचा काहीच उपयोग नसतो हे मला कळतं, पण मला अश्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन पुढेही जाता येत नाही हे ही खरंय..
हल्ली सगळंच बदललं असलं तरी मराठी लग्नपत्रिकेवरच्या मुलीचा उल्लेख मात्र ‘चि.सौ.कां’ असाच केला जातो. असं का, या प्रशाचं उत्तर शोधायचं, तर आपल्या प्रचिन समाजातील समजुतींचा विचार करावा लागतो.
पुढे जाण्यापुर्वी ‘चि. सौ. कां’ या शब्दांतील प्रत्येकाचा शब्दश: अर्थ काय ते पाहावं लागतं. ‘चि.’ हा शाॅर्टफाॅर्म ‘चिरंजीव’ या शब्दाचा अाहे, ज्याचा अर्थ ‘मरण, अंत किंवा शेवट नसलेला/नसलेली’ असा होतो. आणि शेवटच्या ‘कां.’ या शब्दाचा फुसफाॅर्म ‘कांक्षिणी’ असा होतो, ज्याचा अर्थ ‘इच्छा बाळगणारी’ असा होतो. आता राहीला मधला शब्द, जो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे ‘सौभाग्य’. ‘सौभाग्य’ या, विशेषत:य स्त्रीच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा नेमका अर्थ लक्षात घेतल्यास, पत्रिकेतील ‘चि. सौ. कां’ या शब्दांचा अर्थ उलगडतो आणि तो मुलींसाठीच का वापरला जातो याचा अर्थही कळतो..
‘सौभाग्य’ हा शब्द ‘सु+भग’ या दोन शब्दांवरून तयार झाला आहे. यातील ‘सु’ हा शब्द चांगलं, उत्तम या अर्थाने आला आहे. आणि ‘भग’ हा शब्द? तर, ‘भग’ या शब्दाचे विविध अर्थ सापडतात. ‘भग’ म्हणजे सुख, वैभव, सुदैव इ. आणि या सगळ्यांसाठी आपण ‘भाग्य’ हा एकच शब्द वापरतो. ‘भाग्य’ हा शब्द ‘भग’या शब्दाचं एक रुप आहे. आपण सर्वच जण काही चांगलं घडलं, की ‘हे माझं सौभाग्य’ असं म्हणतो. मुलगी लग्न होऊन चांगल्या घरी गेली आणि ती सुखात नांदू लागली ती सौभाग्यशाली आहे असं म्हणतात, तसंच मुलाला चांगली बायको मिळाली तरी तोही सौभाग्यशाली आहे असंच म्हणतात. थोडक्यात भाग्य या अर्थाने वापरला जाणारा ‘भग’ हा शब्द स्त्री आणि पुरूष या दोघांसाठी एकाच अर्थाने वापरला जातो. याला इंग्रजीत ‘लक’ किंवा ‘फाॅर्च्यून’ असा प्रतिशब्द आहे.
‘भग’ या शब्दाचा दुसरा अर्थ मात्र फक्त मुली-स्त्रीयांसाठी वापरला जातो आणि या अर्थाचाच लग्न पत्रिकेतील ‘चि.सौ.कां.’शी जास्त नजिकचा संबंध आहे.
‘भग’ या शब्दाचा दुसरा अर्थ आहे ‘स्त्री जननेंद्रीय’ किंवा इंग्रजीत ‘Vagina’..! बहिणीसाठी किंवा इतर समवयस्क स्त्रीचा उल्लेख करताना वापरला जाणारा ‘भगिनी’ हा शब्दही याच ‘भग’चं एक रुप आहे. आता ‘सु-भग’ या अर्थाने लग्नपत्रिकेत येणारा ‘सौभाग्य’ या शब्दाचा अर्थ लाॅजिकने तुम्हालाही उलगडेल..
लग्नाला आपण काहीही नांव दिलं आणि त्यातून काहीही अर्थ काढला, तरी एक त्यातून एकच गोष्ट ध्वनित होते, ती म्हणजे त्यातून समाजाला मान्य असलेले ‘शरीरसंबंध’ प्रस्थापित होणे. पूर्वीच्या लग्नपत्रिकेत विवाह, लग्न असे गोड शब्द नसायचे, तर त्यासाठी ‘शरीरसंबंध’ असा रोकडा शब्द चक्क छापला जायचा हे अनेकांना माहित असेल. कारण लग्नामुळे होतात ते शरीरसंबंधच..!!
लग्नानंतर त्या लग्न झालेल्या मुला-मुलीत शरीर संबंध प्रस्थापित होतात, मग फक्त मुलीचाच उल्लेख ‘सौभाग्य कांक्षिणी’ असा का केला जातो याचा उलगडा करायचा, तर आपल्या समाजाच्या नियमांकडे आणि संकेतांकडे पाहावं लागतं. आपल्या समाजाने स्त्रीला विवाहापूर्वी आणि वैधव्यानंतर पुरुषसंबंध नाकारलेला आहे. मुलीचे शरीरसंबंध विधीवत लग्नानंतरच व्हावेत असा संकेत आहे. पुरुषावरही अशी बंधने असली, तरी ती पाळली जात नाहीत आणि जरी पुरुषांने अशी बंधने तोडली तरी त्याकडे गांभिर्याने पाहिलं जात नाही. ही सुट स्त्रीला नाही. ‘आपल्या लग्नानंतर आपल्याला आपल्या नवऱ्याकडून(च) अखंड शारीरिक सुख मिळो ही आकांक्षा बाळगणारी ती चिसौकां’..!
जे जननेंद्रीय नवऱ्याचं सुख मिळण्यास पात्र आहे ते ‘सुभग’ एवढाच याचा अर्थ नाही. तर हे सुख कशासाठी, तर त्यातून अपत्य प्राप्ती होवो हा त्यामागचा सर्वात महत्वाचा अर्थ आहे. वयात आलेली कोणतीही स्त्री, तिचा पुरुषाशी आलेल्या संबंधानंतर अपत्य प्रसवण्यास समर्थ असते. मात्र आपल्या समाजनियमांनुसार स्त्रीचे असे पुरुष संबंध -ते ही नवऱ्यासोबतचे आणि तत्पश्चातची अपत्य निर्मिती-ती ही नवऱ्याकडूनच, ही फक्त वैध मानली जाते. स्त्रीचे नवऱ्याव्यतिरिक्तच्या पुरुषांशी आलेले संबंध अनैतिक मानले जाता आणि त्यातून होणारी अपत्यप्राप्ती अनौरस. लग्नाचं प्रयोजन एवढ्यासाठीच. ‘लग्नानंतर स्त्रीची कुस सदैव हिरवी राहो’ किंवा ‘सदा सुहागन रहो’ किंवा ‘दुधो नहावो फुलो फलो’ किंवा ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ हे आशीर्वाद किंवा शुभेच्छा म्हणजे स्त्रीला सतत अपत्यप्राप्ती होवो किंवा तिचं ‘भग’ सतत संततीक्षम राहो हिच इच्छा प्रदर्शित करत असतात..विधवा स्त्रीला किंवा लग्न न झालेल्या कुमारीकेला आपल्या समाजात मान नाही तो या ‘सु-भगा’मुळेच..! कारण अशा स्त्रीयांना पुरुषसुख आणि नंतरची अपत्यनिर्मिती नाकारली गेली आहे.
पतिसुख शेवटपर्यंत मिळो आणि तीचं ‘भग’ शेवटपर्यंत ‘सु’फल राहो अशी इच्छा बाळगणारी ती ‘सौभाग्यकांक्षिणी’. शेवटी लग्नाचा हेतूच स्त्री-पुरुषांच्या शारीरिक गरजांची पूर्ती व्हावी आणि त्यातून अपत्य निर्मिती व्हावी आणि समाजाता गाडा चालत राहावा हा आहे. जी विवाहित स्त्री अपत्य जन्माला घालते तिच्याकडे पाहाण्याची समाजाची दृष्टी कौतुकाची असते, तर जी स्त्री विवाहित असुनही अनेक कारणांमुळे अपत्य जन्माला घालू शकत नाही, तिच्याकडे हेटाळणीने पाह्यलं जात. कुमारी माता, बलात्कारामुळे मातृत्व आलेल्या मुली किंवा विधवेचं मातृत्व आजही तिरस्काराचं धनी होतं, मग त्यात त्यांची चुक असो वा नसो..!
लग्न जुळवताना आजही मोठ्या प्रमाणावर मुला-मुलिंच्या जन्मपत्रिका जुळवल्या जाता. दोघांच्या पत्रिकेतील गुण जुळत नसल्यास विवाह करु नये असा संकेत आहे. पत्रिकेतील गुणमेलन हा प्रकार, पत्रिकेतला मंगळ विचार आणि लग्नानंतर स्त्री धारण करत असलेले मंगळसूत्र या गोष्टी संपूर्णपणे स्त्रीच्या शरिरसंबंधांचा आणि त्यातून होऊ शकणाऱ्या अपत्य निर्मितीचाच विचार करतात..!!
अर्थात आता बदललेल्या परिस्थितीनुसार स्त्री-पुरुष संबंधात मोकळेपणा येत चालला आहे. शिक्षणामुळे, टेक्नीॅलाॅजीमुळे समाजाचे हे नियमही आता ढिले होत चाललेत. स्त्री-पुरष आता एकाच पातळीवर आल्यात जमा आहेत. स्त्रीला इच्छा असल्यास ती लग्नाशिवाय आणि पुरुषशिवायही अपत्य जन्माला घालू शकते किंवा आवडत्या पुरुषाबरोबर लग्न न करताही त्याच्यापासून अपत्य निर्मिती करु शकते. जुन्या काळातली नीना गुप्ता ह्या अभिनेत्रीने अशा संबंधातून मसाबा या मुलीला जन्म दिलाय. अर्थात तिने केलेलं धाडस त्याकाळाच्या खुप पुढे होतं पण आता तसं झाल्यास काही आश्चर्य वाटणार नाही.
वर केलेलं विवेचन आताच्या काळात लागू आहे की नाही याचा विचार करणं हा या लेखाचा उद्देश नाही, तर तो तेंव्हा का आला हे सांगणं हा मुळ उद्देश आहे. चुल सांभाळणं, नवऱ्याला सुखी ठेवणं आणि मुलांना जन्म देण येवढ्यातच स्त्रीचं भाग्य सामानवलेलं आाहे असं समजण्याच्या काळातला हा शब्द आहे. माझा हा लेख लग्नपत्रिकेतील ‘चिसौकां’ या त्रिअक्षरी शब्दाचं अस्तित्व तिथं का आलं, हे सांगणारा आहे आणि हा लेख त्या काळाच्या संदर्भातच वाचावा.
माझं वैयक्तिक मत असं, की आता बदलत्या काळानुसार विवाह पत्रिकेवर लग्नाळू मुलगा-मुलगी अशा दोघांसाठीह ‘चिरंजीव’ म्हणायला हरकत नाही. ‘सौभाग्यकाक्षिणी’ हा शब्द आपल्या त्यावेळच्या सामाजीक परिस्थितीचा निदर्शक आहे, त्याला आधुनिक काळात तसा काहीच अर्थ आता राहीलेला नाही. तरीही गतकाळाची आठवण म्हणून तो तसा राहायलाही हरकत नाही, कारण तो कालबाह्य झालेला असला तरी, तो केवळ एक शब्द नाही, तर आपल्या समृद्ध प्रथा-परंपरांचा गतकाळचा प्रतिनिधी आहे..
— @ नितीन साळुंखे, मुंबई
9321811091
अवगत नसलेल्या गोष्टी अवगत झाल्या. खूप आभार.
Thank you so much Nitin sir for this amazing article…
नमस्कार, वर्तमान परिस्थितत आपल्या धर्माच्या रिवाजान मागे असलेली वैज्ञानिक शोध उलगडीस आणून तिचा प्रसार करण्याचे कार्य बदल हार्दिक शुभेच्छा. या पुढे अशीच माहितीची अपेक्षा आहे.
Khup molachi maahiti dilit tumhi..
विश्लेषण आवडले.