आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.
चिंचेच नावं काढले की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटायलाच पाहिजे. आमच्या शेतावरील खळ्यात चिंचेची मोठी झाडे आहेत. लहानपणापासून या चिंचेच्या झाडांना बघत आलोय म्हणण्यापेक्षा त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतच आलोय. वड आणि आंबा यांच्यासारखे डेरेदार झाड चिंचेशिवाय दुसरे कोणतेही नसावे. आमच्या शेतावर असलेली ही वडिलोपार्जित झाडे किती जुनी आहेत किंवा कोणी व कधी लावली आहेत ते पण कोणाला माहिती नाही.
खळ्या समोरील शेताच्या बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाची मोठी मोठी मुळे जमिनीबाहेर आलेली आणि त्या मुळांना आमचे बैल बांधले जायचे. चिंचेच्या झाडाखाली शांतपणे पेंडा खाणारे आमचे बैल आम्ही गावातल्या घरातून शेतावर गेल्यावर आमची चाहूल लागल्या क्षणी टकामका बघत बसायचे. चिंचेच्या सावलीत बसलेले आपले डौलदार पशुधन बघताना कौतुक वाटायचे. वर्षातून कधीही कोणत्याही ऋतूत चिंचेची पाने गळतात, नवीन पालवी फुटते, फुले येतात, चिंचा लागतात, पीकतात आणि गळतात, हे कधीही न थांबणारे चक्र लहानपणापासून बघायला मिळत आहे. आता तर नवीन घर शेतावरच खळ्याला लागून बांधले आहे. घराच्या तीन बाजूला चिंचेची विशाल झाडे आहेत. अंगणात गेट समोरील झाडाची सावली बारा वाजेपर्यंत असते तर मागील बाजूला दिवस मावळला तरी घरावर चिंचेची शीतल सावली असते. सगळी पाने गळून गेली तरी लहान लहान असंख्य फांद्यांमुळे झाडाखाली नेहमी सावली असते. रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांप्रमाणे चिंचेच्या फांद्यांचे दाट जाळे पसरलेले असते.
एकदा का चिंचेची पाने गळायला सुरवात झाली की जोपर्यंत सगळी पाने गळत नाहीत तोपर्यंत नवीन पालवी फुटायला सुरवात होत नाही. चिंचेची हिरवीगार पाने सुद्धा गळण्यापूर्वी पिकायला लागतात सुरवातीला पिवळसर आणि नंतर तांबूस लाल होऊन गळायला सुरवात होते. सगळी पाने गळल्यावर चिंच उघडी बोकी आणि भकास दिसायला लागते. पालवी फुटताना फांद्यांच्या टोकावर हळू हळू कोंब बाहेर डोकवायला लागतात. डोके बाहेर काढलेले कोंब मग हळू हळू मिसरूड फुटावं तसें बाहेर पडू लागतात. इवली इवली कोवळी पाने लालसर तांबूस असतात व दोन चार दिवसात पोपटी रंग घेतात संपूर्ण चिंचेच्या झाडाला लालसर पोपटी असा संमिश्र रंग दिसायला लागतो. लहान असतानाच काय अजूनही चिंचेला फुटलेला कोवळा आणि लूसलूशीत आंबट पाला हाताने खुडून खाण्याचा मोह आवरता येत नाही. कोवळी पालवी आपला पोपटी रंग बदलत बदलत गडद हिरवी होताना जून होतं जाते पण त्यातच मध्ये चिंचेला फुले यायला सुरवात होते. चिंचेची फुले त्यातून बाहेर येणारे तुरे आणि फुलांच्या फिकट पिवळ्या आणि तांबड्या पाकळ्या पुन्हा एकदा संपूर्ण झाडात नवनवीन रंग भरत असतात. बरीचशी फुले गळून पडतात. चिंचेच्या फुलांचा अक्षरशः सडा पडतो, या सड्यावर झाडाखाली अनवाणी चालताना पायाला मऊ मऊ मखमालीवर चालल्याचा भास येतो एवढ्या फुलांचा थर एकावर एक पसरलेला असतो. फुले आलेली असताना चिंचेच्या पाच झाडांपैकी एका तरी झाडावर आग्या मोहोळच्या मधमाशांचे पोळे बसते. भरपूर मोठे असले तरी सहज कोणाच्याही नजरेला ते पोळे दिसत नाही. फुलांचे परागी भवन झाल्यावर इवल्या इवल्या चिंचा लटकायला लागतात, कोवळ्या कोवळ्या इवल्याशा चिंचा सुद्धा खायला खूप मजा येते. काहीशा आंबट गोड असणाऱ्या कोवळ्या चिंचा जसजशा वाढायला लागतात तसतशा जास्त जास्त आंबट व्हायला लागतात. अशा आंबट चिंचा खाण्यासाठी घरातून शेतावर जाताना कागदावर मीठ आणि त्यात चिमूटभर मसाला घेऊन त्याची पुडी बांधून खिशात टाकली जायची. झाडावर चढूनच चिंचेचे आकडे खुडून वर फांदीवरच बसून हिरव्यागार रसाळ चिंचेला मीठ मसाला लावून दात आंबेपर्यन्त चिंचा खाल्ल्या जात.
बहुतेक करून उन्हाळ्याच्या सुट्टीतील कोणत्या ना कोणत्या एका महिन्यात झाडावरच्या चिंचा गाभुळलेल्या मिळायच्या. गाभुळलेल्या चिंचांची चव तर सांगायलाच नको. पिठूळ आणि आंबट गोड आंबट धड पिकलेली नाही की कच्ची नाही. चिंचा पाडायला आकडी असायची पण दुसऱ्या कोणी पाडू नये म्हणून ती लपवून ठेवायला लागायची. घरातले कोणी शेतावर दिसलें नाही की कोणीपण येऊन काठीने किंवा दगडाने चिंचा पाडायचा प्रयत्न करायचे. नेम धरून चिंचा पाडताना कितीतरी दगड मारायला लागायचे. एकदा का चिंचा पूर्ण पिकायला लागल्या की मग त्या खाव्याशा वाटतं नाहीत. वाऱ्याने पडलेल्या चिंचा मग गोळा केल्या जायच्या. एखाद दिवशी झाडावर चढून फ़ांद्या हलवून हलवून चिंचा पाडल्या जायच्या. त्यातील बिया विळीवर काढून ज्याला चिंचा कातळणे बोलतात असे झाले की त्यात खड्याचे जाडे मीठ घालून गोळे केले जातात, हे गोळे उन्हात वाळवून बरणीत व्यवस्थित ठेवले जातात. कुठलीही ताजी मासळी किंवा सुकी मच्छी जसे की बोंबील आणि सुकट यांच्यात चिंच घातल्याशिवाय आमच्या घरात मच्छी केलीच जात नाही.
चिंचांच्या बिया किंवा चिंचोके भाजून त्यांना सुपारी सारखे खाल्ले जायचे पण हल्ली चिंचोके भाजून खायला सांगितले तर कोणालाही हास्यास्पद वाटेल, म्हणतील दुसरं काही खाण्यासाठी नाही का. चिंचेच्या झाडावर चढताना उतरताना मांड्यांची चामडी सोलून निघायची पण झाडावर चढायची हौस काही कमी नाही व्हायची. चिंचेचे झाड आणि फ़ांद्या एवढ्या चिवट आणि टणक असतात की मनगटाच्या जाडीची फांदी कोयत्याने तोडताना हाताला फोड यायचे. डोक्यावर असलेल्या फांदीवर उड्या मारून लटकायचे आणि झोके घायचे, झोके घेताना हातातून फांदी सुटल्यावर धाडकन खाली मातीवर पडायचे, पडल्यावर लोळायचे असे खेळ खेळतांना कोणी अडवायचे नाही. शेतावर भाताची मळणी करायला आलेल्या एका मजुराने एक मोठा दोर झाडाच्या सगळ्यात उंच फांदीला बांधून त्याचा झोका करून दिला होता. त्या झोक्यावर उंचच उंच घेतलेले झोके, मळणी झाल्यावर चिंचेच्या झाडाखाली गोल रचलेला पेंड्याचा ढीग आणि त्या ढिगावर चिंचेच्या झाडावरून मारलेल्या स्टंट मन सारख्या उड्या आजही आठवतात. चिंचेच्या झाडावर पूर्वी बैलांना खायला घालायचा पेंडा मचाण बांधून चढवला जायचा पण आता बैलच नसल्याने पेंडा जपून ठेवायचा आणि झाडावर चढवून रचून ठेवायचा जमाना गेला. पाऊस पडल्यावर मातीला येणारा मृदगंध जसा अनोखा असतो तसाच गूढ आणि अनोखा गंध पाऊस पडून गेल्यावर दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली गळालेली पाने किंवा फुले कुजल्याने येत असतो. दरवर्षी हजारो चिंचोके जमिनीत रुजतात त्यातून अंकुर फुटून रोपटी निघतात पण आमच्या खळयातल्या झाडांसारखे विशाल वृक्ष काही होतं नाहीत. मागील काही वर्षांपासून असंख्य चिंचोके ओसाड जागी पावसाळ्यापूर्वी टाकले पण त्यातले किती रुजले किती वाचले आणि किती जगले माहिती नाही.
आमच्या चिंचेच्या झाडांनी आमच्या खळ्याला असलेले नैसर्गिक सौंदर्य आमच्या नवीन घराला पण दिले. चिंचेच्या छायेत आमचे नवीन घर सतत बहरलेले दिसते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
आठवणी ना उजाळा देणारा लेख खूप सुंदर