इस्रोचे प्रमुख व भारतीय चंद्रयान मोहिमेचे मुख्य डी. के. सिवन यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ तमिळनाडुतील कन्या कुमारी जिल्ह्यातील सरक्कजलविलई गावी झाला.
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी १९ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चे यशस्वी प्रक्षेपण केले, पण लॅण्डरचा संपर्क तुटल्याने ते पुढील मिशन यशस्वी होऊ शकले नाही. सिवन यांनीच विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्याची घोषणा केली होती. त्यावेळीच त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. ते विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्यानंतरही मोदींशी चर्चा करताना त्यांना माहिती देताना दिसले. चंद्रयानचे यशस्वी प्रक्षेपण झाले त्यावेळी ‘भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात झाली आहे’ अशा शब्दांमध्ये चंद्रयान मोहिमेचे मुख्य के. सिवान यांनी या मोहिमेचे वर्णन केले होते.
डी.के.सिवन यांचे पूर्ण नाव कैलासावडिवू सिवन पिल्लणई आहे. डी.के.सिवन यांच्या वडीलांचे नाव कैलासवदिवू असून आईचे नाव चेल्लम आहे. नागरकॉइलसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या सिवान यांना सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक अडचणी आल्या. सुरुवातीला त्यांना एस.टी. हिंदू कॉलेजात गणिताची निवड करावी लागली होती. गणितात ते हुशार होते. इतर चार विषयांतही शंभर टक्के गुण मिळाल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून त्यांना मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत प्रवेश मिळू शकला. सिवान यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांना शेत जमिनीचा तुकडा विकण्याची वेळ आली. मिसाइल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्या मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेचे माजी विद्यार्थी होते त्याच संस्थेत सिवान शिकले. कलाम हे चौथ्या बॅचचे विद्यार्थी होते तर सिवान हे २९ व्या बॅचचे विद्यार्थी होते. म्हणजेच कलाम यांच्यानंतर बरोबरच २५ वर्षांनी तेच विषय घेऊन सिवान यांनी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला होता.
१९८२ मध्ये सिवान इस्रोत काम करू लागले. त्यानंतर ३६ वर्षांनी त्यांना इस्रोच्या प्रमुखपदाचा मान मिळाला. कन्याकुमारी जिल्ह्य़ातील तरक्कनाविलाय या छोटय़ा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेला, पालिकेच्या शाळेत तमिळ भाषेतून शिक्षण घेतलेला मुलगा इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख बनला. मेहनत व अभ्यासाच्या जोरावर फाडफाड इंग्लिशच्या जमान्यात तमिळ भाषेचे बोट धरून ते सर्वोच्च पदावर पोहोचले यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.
२०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवान यांच्या हाती देण्यात आली आहे. त्या आधी म्हणजेच २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात. इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते. भारताचा सर्वात शक्तिशाली असा जीएसएलव्ही (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सिवान यांनी इस्रोच्या अग्निबाणांच्या मार्गाचे सादृश्यीकरण करणाऱ्या सितारा या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. फेरवापराच्या अवकाश प्रक्षेपकांची अतिशय आव्हानात्मक योजनाही त्यांच्याच प्रयत्नांमुळे पार पाडता आली. १९८० मध्ये ते हवाई अभियांत्रिकी विषयात मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पदवीधर झाले. नंतर त्याच विषयात आयआयएस्सी संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेऊन, २००६ मध्ये मुंबई आयआयटीतून पीएचडी झाले.
सत्यभामा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, विक्रम साराभाई पुरस्कार, बिरेन रॉय अवकाश विज्ञान पुरस्कार असे अनेक मानसन्मान डी.के.सिवान यांना मिळाले आहेत.
Leave a Reply