“देवबाप्पा” देव्हार्यांत तू,
नुसताच असतोस ना बसून ?
मग माझी ‘हरवलेली’ गोष्ट तेवढी,
दे ना रे शोधून |
अरे शोधून शोधून, मी गेलोय थकून,
भाऊ नाही, बहीण नाही, कोण येईल धावून ?
शाळा आणि ट्यूशनमध्ये,
पार गेलोय पिचून,
नंबरासाठी अभ्यासही
करावा लागतो घोकून |
आई बाबां साठी एखाद्या,
छंदवर्गाला बसतो जाऊन,
मग दोस्तांसाठी खेळायला,
सांग वेळ आणू कूठून ?
त्यात होमवर्कच्या टेन्शनने, गेलोय मी थकून,
कार्टून सुध्दां पाहायला देत नाहीत, डोळे बिघडतील म्हणून |
बघता बघता एक दिवस,
मी जाईन कि ‘मोठा’ होऊन,
अन् किती तरी ‘मजा’,
करायच्या जातील राहून |
कळल कां रे बाप्पा
माझं काय गेलय ‘हरवून’?
उशीर नको रे करू,
माझं “बालपण” दे ना शोधून
माझं बालपण दे ना शोधून |
— सौ. अलका वढावकर
छान आणि उत्तम