नवीन लेखन...

चिमणी..

माघ महिन्यातील श्रीगणेश जयंतीच्या दिवशी मला ‘चिमणी’ची न चुकता आठवण होतेच. कमर्शियल जाहिरातींची कामं करताना अनेक स्त्री-पुरुषांशी संपर्क आला‌. कामानिमित्तानं आलेला हा संपर्क, कुणाशी काही दिवसांचा तर काहींशी अनेक वर्षांसाठी असायचा.
रमेश, वेलणकरांकडे कामाला असतानाची गोष्ट आहे. दर शनिवारी ग्राहक पेठची ‘ऐका हो ऐका’ ही छोटी जाहिरात ‘दै. सकाळ’ मध्ये शेवटच्या पानावर असायची. ते काम आले होते अलका अॅडव्हर्टाइजमधून.‌ अलका अॅड.चे मालक होते श्री. अत्रे. त्यांची बाहेरची व आॅफिसमधली सर्व कामं करणारी एक असिस्टंट होती, तिचं नाव रोहिणी जोशी.

वसंत टाॅकीजसमोर पूर्वी एक पाण्याचा मोठा हौद होता. त्या हौदाच्या मागे असलेल्या तीन मजली बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर अलका अॅड.चे आॅफिस होते. अत्रे हे बॅन्केत सर्व्हिसला होते. ते सकाळी दहा वाजेपर्यंत आॅफिसमधील कामं मार्गी लावून कामावर जायचे. संध्याकाळी कामावरुन आॅफिसमध्ये येऊन, दिवसभराचा आढावा रोहिणी जोशीकडून घेऊन घरी जायचे.

१९८० साली रोहिणी जोशीने अत्रेंकडे नोकरी सुरु केली. टपोरे डोळे, साधी शेपट्याची वेणी, प्रिंटेड साडी, पायात चपला व खांद्याला मोठी पर्स. अशा पेहरावात तिने अत्रे अॅड. ला काही वर्षांतच यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.

आमच्याशी तिचा संपर्क आला तो ‘ऐका हो ऐका’ च्या निमित्ताने १९८३ पासून. एके दिवशी एक रिक्षा आमच्या घरासमोर उभी राहिली. त्या मुलीने रिक्षावाल्याचे पैसे मीटरप्रमाणे दिले व ‘नावडकर इथेच राहतात का?’ असे मला विचारले. ती रोहिणी जोशीची पहिली भेट. ती जाहिरात हस्ताक्षरात करावी लागत असे. बुधवारी सूर्यकांत पाठक मजकूर देत असत. त्या मजकुराचे लेखन करुन शुक्रवारी ‘सकाळ’ला ती जाहिरात द्यावी लागे. कधी मजकूर उशीरा मिळाला तर धावपळ होत असे. त्या करता डिझाईनच्या दोन ब्रोमाईड करुन ठेवलेल्या होत्या.‌ ‘सकाळ’ मधून आधीची ब्रोमाईड आणायची व दुसरी लिहिलेली नवीन नेऊन द्यायची. असं अनेक वर्षे चालू होतं.
एकदा कामानिमित्ताने रोहिणी आलेली असताना तिने ‘माझ्या सरांना भेटायला एकदा आमच्या आॅफिसमध्ये या.’ असे सांगितले. आम्ही दोघेही दुसरे दिवशी सकाळी गेलो. अत्रेसाहेबांशी चर्चा झाली आणि आम्ही अलका अॅड. ची कामं करण्यास सुरुवात केली.
१९८५ ते १९९० या पाच वर्षांत आम्ही अलका अॅड. ची शेकडो कामे केली. त्यामध्ये डेक्कनवरील मे. रविंद्र, हॅपी हाऊस, तोडकर बिल्डर्स, बजाज ईलेक्ट्रीकल्स, मिठापेल्ली हॅण्डलूम, ढेरे अॅण्ड सन्स, घरकुल बिल्डर्स, ग्राहक पेठ, स्वोजस बिल्डर्स, नहार काॅम्प्युटर, वर्मा फार्मसी, गोपी किचन मशीन, विविध लहरी, व्हरायटी स्टोअर्स, निमोणकर क्लासेस, प्रोफिशियन्ट क्लासेस, इत्यादींच्या जाहिराती केल्या. त्या जाहिराती करायला सांगण्यापासून पूर्ण करुन पेपरला नेऊन देईपर्यंत रोहिणीच्या रिक्षाने आमच्याकडे अनेक चकरा होत असत.

रोहिणीच्या अंगी असलेल्या लाघवी संभाषण कलेमुळे सर्व ठिकाणी तिचे कौतुक होत असे. तिची जाहिरात येईपर्यंत ‘सकाळ’मधील माणसं देखील प्रिंटींगप्रोसेससाठी थांबून तिला सहकार्य करीत असत. रोहिणीच्या हाताखाली कुलकर्णी नावाचे आॅफिसबाॅय होते, ते काम देण्यासाठी कधी कधी सायकली वरुन आमच्याकडे येत असत.

एकदा सांगली बॅन्केची फुलपेज जाहिरात करण्याचे काम तिने आम्हाला दिले होते. त्याकाळी संपूर्ण डिझाईन हे हाताने केले जात असे. फोटो, टाईपसेट लावून डिझाईन पूर्ण होण्यासाठी आम्हाला पहाट झाली. पहाटे चार वाजता अत्रे स्वतः आमच्या आॅफिसमध्ये आले, त्या डिझाईनवरुन त्यांनी खाडिलकर प्रोसेसमध्ये ब्लाॅक करुन घेतला व कुलकर्णी दुपारी सांगलीला पोहोचले. दुसरे दिवशी ती जाहिरात ‘केसरी’ पेपरमध्ये झळकली.

घरकुल बिल्डर्ससाठी जाहिरात करताना मी सिनेअभिनेत्री रजनी चव्हाण हिचे फोटोसेशन करुन जाहिरात केली. तोडकर बिल्डर्सची जाहिरात करताना ती वाचूनच त्यांच्या सातारा रोडवरील पुण्याईनगर येथील स्किममध्ये फ्लॅट घेतला.

त्यावेळी रोहिणी शनिपार जवळ रहायची. कधी मंडईला जाता येता दिसायची. तिचा प्रवास हा पायी चालण्यापेक्षा जाहिरातींची वेळ पाळण्यासाठी रिक्षानेच अधिक झाला आहे. कधी कामाच्या निमित्ताने आल्यावर काम चालू असताना गप्पा होत असत. तिचं सतत बोलणं हे चिमणीच्या चिवचिवाटासारखं वाटायचं. म्हणून आम्ही तिला ‘चिमणी’ हे टोपणनाव ठेवलं. ती गणेशभक्त आहे. तिची चतुर्थी कधी चुकली नाही. माघ महिन्यातील श्रीगणेश जयंतीला ती दिवाळीपेक्षा अधिक महत्त्व देते. आपण साधारणपणे दिवाळीला नवीन कपडे करतो. रोहिणी, गणेश जयंतीनिमित्त कपडे खरेदी करते. तिची गणपतीवर अपार श्रद्धा आहे. सारसबागेतील गणपतीचे दर्शन तिने कधी चुकविले नाही.

नव्वदनंतर आम्ही नाटक- चित्रपट जाहिराती करण्यामध्ये व्यस्त झालो. साहजिकच अलका अॅड. चे काम कमी होत गेले. काही वर्षांनंतर अत्रेसाहेब नोकरीतून निवृत्त झाले आणि त्यांच्या मुलाबरोबर जाहिरात संस्था चालवू लागले. नंतर रोहिणीने स्वतःच फ्रिलान्स कामे करणे सुरु केले. कधी पेपरगल्लीत, प्रिंटरकडे, डिटीपी वाल्याकडे तिची भेट होत राहिली. हुजूरपागा शाळेचे काम करताना ती दिसत होती.
आज तिने पूर्वार्ध पूर्ण केला आहे, मात्र तिच्यामध्ये रुपेरी केसांशिवाय काहीही बदल झालेला नाहीये. तोच प्रसन्न चेहरा, तोच उत्साह, तसाच आहे. कुठे तरी मी वाचलं होतं, काहींजण वयाकडे फक्त एक आकडा म्हणूनच पाहतात. त्या आकड्यांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कधीच होत नसतो. ‘चिमणी’मध्येदेखील तसाच काहीएक फरक झालेला नाही.. फक्त पूर्वीची रोहिणी जोशीची आता सुमेधा आगाशे झालेली आहे….

‘चिमणी’ला व आपणा सर्वांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!!

© – सुरेश नावडकर १५-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on चिमणी..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..