१९८४ सालातील प्रसंग आहे. ‘ग्राफिना’मध्ये काम करणाऱ्या जयंता देवधरच्या बहीणीच्या ओळखीने हेमा लेले आमचं घर शोधत आल्या. त्यांना आमच्याकडून एका मासिकाचे काम करुन घ्यायचे होते. कल्याणी फोर्जच्या कामगारांसाठी संपादन केलेल्या “परिवार” नावाच्या मासिकाचे डिझाईनिंग त्यांना करुन द्यायचे होते. आम्ही ते काम आठवडाभरात करुन दिले. ही हेमा लेलेंशी झालेली पहिली भेट..
त्यांच्याशी बोलताना कळलं की, त्यांचं माहेर, शनिवार पेठेतील तांबे बोळ येथे होतं. त्या माॅडर्न महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापक होत्या. कामाच्या निमित्ताने त्यांचं आमच्या घरी येणं जाणं होत होतं. कधी त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर, सुभाष लेले यायचे. ते एखाद्या हाॅलीवूडच्या चार्लस ब्राॅन्सन सारखे दिसायचे. कधी त्यांची मुलगी व मुलगा दोघेही बरोबर असायचे.
या भेटी आधी मी हेमा लेले यांना काॅलेजमध्ये असताना पाहिले होते. मी मित्रांसोबत भरत नाट्य मंदिरात ‘तीन पैशाचा तमाशा’ हे ‘पुलं’चे नाटक पहायला गेलो होतो. नाटक धमाल होते. प्रयोग हाऊसफुल्ल होता. त्या नाटकाच्या भल्या मोठ्या टीममध्ये हेमा लेले काम करायच्या. त्या नाटकात उडत्या चालीची अनेक गाणी होती. हेमा लेले आणि दुसरी एक कलाकार यांच्या तोंडी ‘तुझं नाव लालन, तर माझं नाव मालन…’ असं धमाल गाणं होतं. थिएटर अॅकॅडमीच्या जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं हे सर्वोत्तम नाटक होतं…
कधीही काही डिझाईनचं काम निघालं की, हेमा लेले आमच्याकडे येत असत. त्यांनी ‘चिमणगाणी’ नावाचं लहान मुलांसाठी एक चित्रमय पुस्तक लिहिलं होतं. त्यातील गाण्यांवरुन एक लहान मुलांसाठी कार्यक्रम त्या भरत नाट्य मंदिरात करणार होत्या. त्याची पेपरमधील जाहिरात आम्ही करुन दिली. कार्यक्रम पहायला आम्ही दोघेही गेलो होतो.
त्यांची कन्या मधुरा, नृत्य शिकत होती. तिच्या ‘अरंगेत्रम’ कार्यक्रमाचे डिझाईन आम्ही केले होते. त्या कार्यक्रमाचे ब्रोशर त्यांनी आम्हाला दाखवले, त्यामधील सर्व नृत्यांगणांचा एक ग्रुप फोटो ‘कंपोज’ म्हणून अतिशय उत्तम होता. त्याबद्दल हेमाताई सांगत होत्या की, कॅम्प मधील एका निष्णात फोटोग्राफरने तो फोटो काढला होता. त्याचा आत्मविश्वास इतका दांडगा होता की, एकाच क्लिकमध्ये त्याने परफेक्ट रिझल्ट दिला होता. आताच्या सारखे भरपूर एक्स्पोज करुन त्यातून एक निवडणं सोपं आहे. मात्र फिल्मरोलच्या कॅमेऱ्यावर एवढं कौशल्य असणाऱ्या त्या फोटोग्राफरला सलाम!
हेमा लेले एकदा आमच्याकडे नवीन काम घेऊन आल्या. त्यांना ऑडिओ कॅसेटचं कव्हर करुन घ्यायचं होतं. ‘एक मैफल कवितेची’ असं त्या कॅसेटचं नाव होतं. मोहनकुमार भंडारी यांच्या ‘माॅम’ स्टुडिओने ते ध्वनीमुद्रण केले होते.
छोट्या मोठ्या कामासाठी मिस्टर लेले आमच्या ऑफिसवर अधूनमधून येत असत. संजय सूरकर दिग्दर्शित ‘घराबाहेर’ या मराठी चित्रपटात मधुरा लेलेनं छोटा रोल केला होता. काही वर्षांनी तपन दास दिग्दर्शित एका मराठी चित्रपटात तिने अजिंक्य देव बरोबर भूमिका केली होती.
हळूहळू आमचा संपर्क कमी होत गेला. काही वर्षांपूर्वी सुभाष लेले गेल्याचे वर्तमानपत्रात वाचण्यात आले. फार वाईट वाटलं…
परवा ऑफिसमध्ये आवराआवर करताना ‘चिमणगाणी’चं पुस्तक हाताशी लागलं आणि आठवणींचा ओघ सुरु झाला…
अशी अनेक आठवणींची खाती आमच्या व्यवसायात आनंदाने पुरेपूर भरलेली आहेत, त्यावर मिळणारे समाधानाचे व्याज कितीही खर्च केले तरी, संपता संपत नाही….
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-४-२१.
Leave a Reply