
चिं.त्र्यं खानोलकर-म्हणजेच चिंतामण त्र्यंबक खानोलकर मराठी साहित्यातील एक अवलिया व्यक्तिमत्व होते. अवलिया म्हणायचे कारण म्हणजे अवलिया जसा आपल्या मस्तीत,धुंदीत जगतो तसे खानोलकर आयुष्यभर जगले.
जन्म ८ मार्च १९३०. जन्मगाव बागाल्यांची राई.
त्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ले येथे झाले.१९४९ मध्ये मेट्रिक ला दाखल झाले. पण नापास झाले.त्यांची भवितव्य कविता व मोगर्याची वेणी कथा प्रसिद्ध झाली.पुढे त्यांनी कुडाळ येथे “वीणा गेस्ट हाउस” खानावळ सुरु केली.तिथे गल्ल्यावर बसताबसता त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली.फेब्रुवारी १९५४च्या सत्यकथा मासिकात त्यांची “शून्य शृंगारते” कविता आरती प्रभू टोपण नावाने प्रसिद्ध झाली.आरती प्रभू त्यांनी नाव का घेतले याचे अनेक प्रवाद आहेत.काही जणांच्या मते त्यांनी ती कविता (R.T.Prabhu) या नावाने पाठवली होती.त्यांचे घरगुती नाव रघुनाथ व मूळचे आडनाव प्रभू म्हणून रघुनाथ त्र्यंबक प्रभू म्हणून आरती प्रभू. स्वत: खानोलकरांच्या मते त्यांच्या होणाऱ्या भावी पत्नीचे नाव आरती होते,पण ते लग्न होऊ शकले नाही म्हणून आरती प्रभू हे नाव . मुळचा तापट स्वभाव म्हणून गेस्ट हाउस मध्ये येणाऱ्या गिर्हाईकाशी भांडणे होऊ लागली. परिणामी त्यांना गेस्ट हाउस बंद करावे लागले.
१९५९ला त्यांना लोणावळा यथे नोकरी मिळाली पण तापट व व्हीम्झीकल स्वभावामुळे ती नोकरी सोडली. मंगेश पाडगावकर यांच्या मदतीने मुंबई आकाशवाणीवर नोकरी मिळाली पण कम्युनिस्ट चळवळीत भाग घेत असल्याच्या कारणावरून त्यांना काढून टाकण्यात आले.धरसोड वृत्तीमुळे त्यांचे खूप नुकसान झाले. त्यांच्या मनात कित्येक दिवस दोन शब्द घोळत होते. ये रे घना,येरे घना. पुढे त्यांनी ती कविता लिहिली. त्याच सुमारास त्यांच्या कविता हृदयनाथ मंगेशकर यांच्या वाचनात आल्या.आणि मराठी रसिकांसाठी अलिबाबाची भावगीताची गुहा उघडली.”गेले द्यायचे राहुनी,समयीच्या शुभ्रकळ्या,नाही कशी म्हणू तुला,कसे कसे हासायाचे,ये रे घना,” निवडुंग,चानी चित्रपटाची गाणी,आणि जीवनावर भाष्य करणारे भास्कर चंदावरकर यांनी संगीत दिलेले “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” अशी कितीतरी गाणी रसिकांना मिळाली.
खानोलकर उत्तम नाटककारही होते.पाश्चात्य रंगभूमीवर प्रचलित असलेल्या absurd नाट्यप्रकारावर आधारित “ एक शून्य बाजीराव” नाटक कसेबसे मेट्रिक झालेल्या खानोलकरांनी लिहिले हे पाहून विजया मेहता आणि श्रीराम लागू थक्क झाले हे नाटक विजया मेहतांनी रंगायन साठी दिग्दर्शित केले.Caucasian chalk circle ह्या ब्रेक्तच्या नाटकावर आधारित “अजब न्याय वर्तुळाचा” नाटक लिहिले.जे जर्मनीला नेण्यात आले.त्या निमित्ताने खानोलकरांना जर्मनीला जाण्याचा योग आला. त्यांच्या “ कालाय तस्मै नमा” नाटकावर आधारित अनकही चित्रपट निघाला.एव्हढे लिखाण करून , मानमरातब मिळूनही त्यांची आर्थिक स्थिती कायम ओढग्रस्त राहिली.
असा हा अवलिया २६ एप्रिल १९७६ला जग सोडून निघून गेला.
त्यांची साहित्य संपदा–
कविता संग्रह — जोगवा,दिवे लागण, नक्षत्रांचे देणे(याच नावाने अल्फा मराठीने कार्यक्रम सुरु केला आणि त्याचे पहिले मानकरी खानोलकर अर्थात आरती प्रभू होते)
कथा संग्रह— सनई,राखीपाखरू,चाफा आणि देवाची आई,
कादंबऱ्या— रात्र काळी घागर काळी, अजगर,कोंडुरा,त्रिशंकू,गणुराय आणि चानी, पिशाच्च,अंगचर
नाटके—एक शून्य बाजीराव,सगेसोयरे,अवध्य, कालाय तस्मै नमा,अजब न्याय वर्तुळाचा.
— रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply