नवीन लेखन...

चिनी कलेची विविधता – भाग ३

जेवणाची वेळ होईपर्यंत अशीच गंमत जंमत चालली होती. अर्थातच ‘तू’ जमातीची विवाहपद्धती परदेशी पाहुण्यांना माहीत करून देण्यासाठीच हा सगळा खेळ होता. जेवणाची वेळ होताच आम्ही सगळे आतल्या खोलीत गेलो, नेहेमी प्रमाणे टेबलाभोवती बसलो. ‘नवरा मुलगा’ आमच्या शेजारीच होता. सूपचा आस्वाद घेत होतो तोच ‘नवरीला’ बरोबर घेऊन तिच्या ‘सख्या’ जेवणघरात आल्या आणि ‘नवऱ्यामुला’च्या खुर्चीमागे घोळका करून दाटीवाटीने उभ्या राहिल्या. सूप चालू असताना त्या चिनी भाषेत गाणी गात होत्या. आमचे बाऊल उचलून दुसऱ्या प्लेट आल्या, पण ‘नवऱ्या’ मुलाचे सूप बाऊल ‘नवरी’ च्या सख्या उचलूच देईनात. आमच्यासाठी भात व भाजी आली, पण ‘नवरा’ रिकामा बाऊल पुढ्यात घेऊन तसाच! सख्यांची गाणी संपेनात, बाऊल उचलला जाईना! शेवटी आमच्या गाईडला ‘दया’ आली व त्याने ‘मुली’ कडच्या एका वयस्कर स्त्रीला पुढे आणले व “हा काय प्रकार आहे?” असे विचारले. भाषेचे गोंधळ संपले व उलगडा झाला की मैत्रिणींना बाऊल उचलण्यासाठी ‘मेहुणीचा मान’ म्हणून काही रक्कम हवी होती. शेवटी नवरोबांनी काही किरकोळ नोटा त्यांच्या हातात सरकवल्यावर त्याला पुढचे जेवण मिळाले. जेवण पूर्ण होईपर्यंत नवरी नवऱ्याला वारा घालत होती, जेवण वाढत होती, आग्रह करत होती. तोही या ‘व्ही आय पी’ ट्रीटमेंटमुळे खूप खूष होता, एन्जॉय करत होता, त्याची खरी बायको व्हीडियो शूट करत होती. आम्ही सगळे गंमत पहात होतो. त्याचे जेवण होताच लग्न समारंभ संपल्याचे जाहीर झाले, सगळे उठले. आम्ही वस्तीबाहेर पडणार तोच शेवटच्या घरातून पुनः नवरीच्या मैत्रिणी व नवरी तिचे सामान घेऊन आडव्या आल्या. नवरी राजरोसपणे आपल्या सख्यांना सोडून नवऱ्या शेजारी जाऊन उभी राहिली. तिच्या सख्या मोठमोठ्याने हुंदके देऊ लागल्या. तिची ‘आई’ तर तिला मिठी मारून रडायला सुद्धा लागली. आमची बस थोडी दूरवर उभी होती. आम्ही, आमच्या मागे नवरा-नवरी, त्यांच्या मागे त्याची खरी बायको, व तिच्या मागे वस्तीवरचे ‘बाराती’. बस जवळ आली तरी मंडळी मागे फिरेनात. उलट नव्या नवरीची नव्या नवऱ्याबरोबरची जवळीक वाढतच चालली. शेवट तिने त्याचा हात पकडला तेव्हा मात्र तोच काय आम्ही पण चपापलो. गाईडच्या मध्यस्थीने विचारले तर कळले की वस्तीवरचे लोक म्हणताहेत, “या दोघांचे लग्न झाले असून ही आता त्याची बायको झालीय, त्यामुळे ती त्याच्या बरोबर सिंगापूरला जाणार व त्याला तिला न्यावेच लागणार.” आता मात्र नवरा व त्याची खरी बायको चांगलेच सटपटले. बसमधे चढून त्याची खरी बायको त्याला बसमध्ये खेचू लागली, तर ‘ती’ त्याला बसमधून खाली ओढू लागली. “हे काय संकट आले” म्हणून बायको, तर ‘तो’ आपल्याला नेणार नाही” म्हणून ‘ती’ रडू लागली. शेवटी मी सिंगापूरला रहातो, तिथे तुला व्हिसाखेरीज प्रवेश मिळणार नाही” असे सांगताच खरी गोष्ट उघडकीस आली व ‘नवरी’ला माहेरी ठेऊन घेण्यासाठी भल्या मोठ्या रकमेची मागणी झाली. घासाघीस होऊन शेवटी थोड्याशा डॉलर्सवर सौदा तुटला. बिचाऱ्या नवरदेवाला फुकटचा भुर्दंड व त्याची बायको रडून रडून हैराण ! पैसे घेऊन ‘नवरी’ व बाराती मागे झाले व ‘नवऱ्या’ला बसमधे जाण्याची परवानगी मिळाली. बस सुटेपर्यंत बाराती मात्र खिडकीपाशी टाचा उंच करून, नवरीकडे अंगुलीनिर्देश करून ‘तिला लवकर घेऊन जा, विसरू नका’ असे हातवारे करून सांगत होते. आता चालकाला तो नवराच बस सोडण्याची घाई करू लागला.

तेवढ्यात आमच्यासारखीच दुसरी प्रवासी बस तिथे येऊन थांबली. त्यातून नवे प्रवासी उतरू लागताच इतका वेळ ओक्साबोशी रडणारी ‘नवरी’ हसतहसतच नटण्यासाठी खोलीकडे पळाली, बाराती बस मधल्या लोकांच्या स्वागतासाठी परत दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभे राहिले. नव्या पाहुण्यांबरोबर हाच खेळ, याच थेटरात फक्त नवीन ‘नवऱ्या’साठी सज्ज होत होता. हा सगळा पैसे मिळवण्यासाठी चालणारा खेळ आहे हे जरी सुरुवातीपासूनच माहिती होते तरी त्या कलाकारांच्या अभिनयाला मनापासून दाद द्यावीशी वाटली. पैसे मिळवण्याची अशी पूर्वी न पाहिलेली अजब युक्ती गाईडने समजावताच चीनी नवरा आणि त्याची बायको यांच्यासह सर्वजण हसायला लागले. आम्ही मार्गस्थ झालो पण डोळ्यासमोर तरळत होती ती त्या नवरीची अप्रतिम ‘अभिनय कला.’

पुढचा टप्पा होता चेंगडू. विमानप्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो. तिथली उत्कृष्ट बाग पहाणे व बाकी राहिलेली किरकोळ खरेदी एवढाच कार्यभाग होता. चेंगडूही ३००० फुटांवर आहे. त्यामुळे हवा आल्हाददायक होती. सिच्युआन प्रॉव्हिन्समधील चेंगडू हे महत्त्वाचे गाव. दुसऱ्या महायुद्धाचे वेळी या गावाचा चीनला खूप उपयोग झाला होता अन् त्यामुळे महत्वही. जगातील सर्वात उंचावरून जाणारा रेल्वेमार्ग सुरू होण्याअगोदर तिबेटमध्ये प्रवेश करण्यासाठी हा मार्ग जास्त सोयिस्कर होता. शहरावर चिनी छाप अगदी ठळक दिसत होती. गजबजाटही बऱ्यापैकी होता. फिरत फिरत आम्ही तिथले प्रसिद्ध उद्यान व त्याच्या जवळच्या बाजार गल्लीपाशी आलो. आता चिनी वस्तू सर्वत्र मिळत असल्याने मोठे मोठे रंगीत पंखे, लाल केशरी दिवे, लायन-ड्रॅगनच्या मूर्ती यांचे विशेष आकर्षण वाटले नाही. बाग मात्र आकर्षक होती. वेगवेगळ्या पुष्परचना, ठिकठिकाणी कमानी होत्या. मधोमध एक ऍफीथिएटर होते. एक छोटा हौशी ऑर्केस्ट्रा आपली कला सादर करत होता. त्या सुरांवर व तालावर गोबरी गुटगुटीत मुले नाचत होती. खूपच छान होते ते दृश्य! आम्ही बागेत हिंडत असता ती मुले आमच्या जवळ येऊन माझ्या साडीला हात लावून पहात होती. पदर ओढत होती, इतकेच काय आमच्या हातालाही स्पर्श करत होती. तिथे आम्ही दोघेच भारतीय असल्याने मोठ्या माणसांचेही आम्ही आकर्षण केंद्र ठरलो. खूप मजा वाटली या सगळ्याची. आम्ही भारतीय वंशाचे हे मात्र त्यांनी माझी साडी-कुंकू पाहून ओळखले. काही जणांनी आमच्या बरोबर फोटोही काढून घेतले. भारतीय वेषभूषा व भारताची काही वैशिष्ट्ये इतक्या दूरवरही माहिती आहेत हे पाहून खूपच आनंद झाला.

चेंगडूमध्ये आमचे भेट देण्याचे दुसरे ठिकाण होते ‘सिच्युआन ऑपेरा.’ इतरही बरेच ऑपेरा आता जागोजागी दिसतात, पण ‘सिच्युआन ऑपेरा’ हे महत्त्वाचे, खूप पुरातन व मुख्य सांस्कृतिक केंद्र आहे. चेंगडू शहराची शोभा बघत बघत आम्ही पूर्वीच्या पद्धतीच्या खास चिनी कलाकुसर दाखवणाऱ्या भव्य कमान असणाऱ्या ऑपेराहाऊसपाशी पोहोचलो. सायंकाळी पाचच्या सुमारास हा खेळ सुरू होणार होता. भल्यामोठ्या प्रशस्त रंगमंचासमोरच्या अर्धगोलाकारात मांडलेल्या आसनांवर आम्ही स्थानापन्न झालो, पहातापहाता सगळे थिएटर आमच्यासारख्या पर्यटकांनी भरून गेले. भोवताली असलेल्या २ मजली छोट्या छोट्या कमानी असणाऱ्या खोल्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत ही आसनव्यवस्था होती. सगळीकडे रंगीबेरंगी छोटे-मोठे आकाशदिवे टांगलेले होते. पताकांच्या माळा वाऱ्यावर झुलत होत्या. संगीताचे मंद स्वर वातावरण प्रसन्न करत होते. आम्ही सगळी शोभा बघतो आहोत तोच कार्यक्रमाच्या निवेदनाला सुरुवात झाली. निवेदक सांगत होता, “या कार्यक्रमात रंगीबेरंगी वेशभूषा केलेले विविध समूह एकामागोमाग आपापली कला सादर करतील. यात सिच्युआन प्रॉव्हिन्सच्या, चीनच्या इतिहासाची उजळणी केली जाईल. कलाकार नाच, गाणे, नकला यांच्या माध्यमातून इतिहास आपल्या डोळ्यासमोर साकार करतील. चिनी राजेराण्यांच्या, त्यांना घाबरवणाऱ्या राक्षसांच्या, परिकथेतील दयाळू पऱ्यांच्या गोष्टी छोट्या छोट्या नाटकांद्वारे आपल्या समोर येतील.” सर्व निवेदन अर्थात मॅडरिन भाषेत होते. आम्हाला भाषा कळत नव्हती तरी त्याचे व इतर कलाकारांचे हावभाव इतके बोलके होते की, कथा सहज समजली. कार्यक्रम सुरू असताना छोट्या छोट्या किटल्यातून बिन दुधाचा बिन साखरेचा चिनी चहा, भाजलेल्या विविध बिया, शेंगदाणे आमच्या समोर येत होते. त्याचा आस्वाद घेताना कार्यक्रमात अधिकच रंग भरत होता. साधारण २ तास हा कार्यक्रम चालला.त्यानंतर चेंगडूच्या पारंपारिक कलेचा खेळ सादर होणार होता. तो होता ‘फेस चेंजिंग उर्फ ‘बियान लियान’ -सिच्युआन प्रॉव्हिन्सचा फार पूर्वापार चालत आलेला खेळ. तो सादर करणारे कलाकार अत्यंत चमकदार रंगीबेरंगी वेशभूषा करतात. त्यांना साथसंगत तशीच नाट्यमय व जलद गतीची असते. रंगभूमीवर कुठली तरी चिनी परिकथा चालू असते. त्यात राक्षसाचा किंवा खलनायकाचा प्रवेश उशीरा असतो. भाषेमुळे कथा कळत नाही, पण राक्षस अवतरला की लगेच कळते की, हा आता राजाराणीला त्रास देणार. त्या दोघांना मदत करणारी देवताही यथावकाश अवतरते. आणि सुरू होते त्या दोघांचे युद्ध! आपण गुंग होऊन पहात असतो. आता देवतेची सरशी होणार…..तेवढ्यात पिवळ्या चेहऱ्याचा राक्षस अचानक लाल तोंडाचा दिसू लागतो. पुन: देवता त्याच्यावर कुरघोडी करणार तितक्यात लाल चेहरा अचानक निळा होतो. अंगातल्या कपड्यांमुळे एकच व्यक्ती वेगवेगळ्या चेहऱ्यांखाली आहे हे पटते. कोणतीही रंगरंगोटी न बदलता, स्टेजवरून नाहीसे न होता आपल्या डोळ्यांसमोर त्या व्यक्तीचा चेहरा पिवळ्याचा लाल-लालचा निळा-निळ्याचा हिरवा-काळा-पांढरा होत असतो. कोणाच्याही मदतीशिवाय, नृत्य नाट्यात क्षणभराचाही खंड पडू न देता हे चेहरे एकच व्यक्ती वारंवार बदलते याचे खूप आश्चर्य वाटते. जोवर हे सगळे स्टेजवर चालू आहे तोवर “अंतर खूप आहे, त्यामुळे हातचलाखी दिसत नसेल, एकावर एक मुखवटे घातले असतील, ओढून काढलेला मुखवटा अंगरख्यात लपवला असणार” वगैरे शंका मनात येतात. पण जेंव्हा तेच पात्र प्रेक्षकात उतरून असे चेहरे क्षणार्धात बदलू लागते, तेंव्हा तोंडाचा ‘आ’ वासून दाही बोटे कधी तोंडात जातात, कळतही नाही. पापणीही न लववता हे आश्चर्य डोळ्यात साठवून घेता घेता कार्यक्रम संपतो. जेमतेम १५-२० मिनिटे चालणारा हा ‘बिआन लिआन’ चा खेळ मनात घर करून रहातो. पूर्वी हा खेळ फक्त चिनी सणावारीच ऑपेरात केला जाई, तोही फक्त चीनमध्येच. हल्ली मात्र त्याचे वैशिष्ट्य व वेगळेपण लक्षात आल्याने सिच्युआनमधील कलाकार हे प्रयोग जगभर करतात.

या खेळाबद्दल खूप गंमतशीर माहिती समजली. ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जाते. पण पहिल्या पिढीतले बुजुर्ग पुढच्या पिढीतल्या फक्त मुलांनाच ही कला शिकवतात. मुली लग्न होऊन दुसऱ्या घरात जातात, त्यांच्या बरोबर आपली फेस चेंजींगची कला दुसऱ्या घराण्यात जाऊ नये यासाठी ही खबरदारी! मलेशियात काही स्त्री कलाकारांना ही कला येते, पण त्यात मुखवटे बदलताना इतकी सफाई येत नाही हेही आम्ही नंतर पाहिले. चिनी कलाकारांची शिताफी मात्र अगदी जवळून लक्ष देऊन पाहिले तरी समजत नाही. सहसा ४ पद्धतींनी हे मुखवटे बदलले जातात. डोक्यावर घट्ट मास्क एकावर एक बसवून ते संगीताच्या तालावर नाचता नाचता मानेला झटका देऊन चेहऱ्यावर ओढणे हा एक प्रकार. काही वेळा भुवया, गालावरचे कल्ले यात वेगवेगळे रंग लपवतात व बघता बघता तो चेहऱ्यावर ओढून मूळ रंगच बदलतात. कधीकधी फक्त मिशीत लपवलेला रंग मिशीवर ओढून आणून मिशीमुळेच चेहऱ्याचे वेगळेपण भासवले होते.

चौथ्या प्रकारात चक्क मुठीत धरलेली धूळ वा रंगाची पूड उधळणे व त्या धुळीच्या पडद्या आड चेहऱ्याचा मुखवटा बदलणे हे केले जाते. जरी या चारी पद्धती प्रेक्षकांना माहीत झाल्या तरी प्रत्यक्षात ते कसे साध्य केले जाते हे अजिबात समजत नाही हेच या खेळाचे वैशिष्ट्य. चिनी कलाकारांच्या या नाविन्यपूर्ण ‘चेंजींग फेस’ या कलेला किती नावाजावे तेवढे थोडेच.

बियान लियान चा मनावरचा प्रभाव कमी व्हायला खूप वेळ लागला. त्यानंतर एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये १३ कोर्सचे ग्रँड डिनर होते. पूर्ण शाकाहारी असल्याने मी फक्त सूप, ब्रेड, भाजी व भात याचीच मानसिक तयारी ठेवली होती. पण सिंगापूरहून आलेली एक पाहुणी पूर्ण शाकाहारी असल्याचे शेफला सांगताच तो मान डोलावून अदृश्य झाला. हळूहळू इतरांची एकेक डिश समोर येऊन गट्टम होऊ लागली. मी मात्र तशीच! इतरांच्या सात-आठ डिशेस संपल्यासुद्धा. तितक्यात आतून माझ्यासाठी एका मागोमाग एक पदार्थ -दिसायला इतरांसारखे पण पूर्ण शाकाहारी-यायला लागले.१२ पदार्थ माझ्यासमोर मांडले गेले. हे आश्चर्य व शेफच्या कौतुकाने पोट खाण्याआधीच भरले. शेवटची १३ वी डिश मात्र आम्ही बनवू शकत नाही कारण बीफ फ्लेवर हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे” असे सांगून शेफने मनापासून माफी मागितली व त्याची भरपाई आइस्क्रीम खिलवून केली. सर्वच पदार्थ एकदम चविष्ट व आकर्षक होते. प्रत्येक डिश सादर करताना शेफचा आविर्भाव ‘अतिथी देवो भव’ मानणाऱ्या संस्कृतीशी मिळता जुळता होता. भरल्या पोटाने व आनंदी मनाने शेफचे आभार मानत आम्ही त्याचा निरोप घेतला. साध्या जेवणात सुद्धा त्याने जी त्याची ‘पाककला’ दाखवली त्याने मन एकदम तृप्त होऊन गेले. चेंगडू सोडून सिंगापूरला परतलो तरी या साऱ्या गोष्टी कायमच्या मनात ठसल्या. अचानक बघायला मिळालेल्या विविध कला दाखवणाऱ्या कलाकारांची आठवण मनात कायमच घर करून राहिली आहे.

— अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..