
चायनीजचं वेड किती आहे सांगायलाच नको. प्रत्येकाला वाटतं, एकदा तरी चायनीज जेवण जेवावं. पण अस्सल चायनीज लोक मुंबईत भरपूर आहेत. पण ते शोधायला हवेत. गेली तीन-चार पिढया ही चायनीज मंडळी मुंबईत स्थायिक आहेत आणि उत्कृष्ट बम्बय्या हिंदी बोलतांत. शोधा म्हणजे सापडतील.
खाण्यापिण्याचे कधीच हाल होणार नाहीत असे शहर कोणतं? अस विचारलंत तर इतर शहरांचा एकंदर अनुभव लक्षात घेता मी म्हणेन, आपली मुंबई. कुठल्याही कोनाकोपऱ्यात जा, पाहिजे ते मिळेल.. फक्त माहिती पाहिजे.
शहरातलं सर्वात स्वच्छ आणि सर्वात आरोग्यवर्धक उपाहारगृह कोणतं, अस विचारलं तर मला वाटतं चायना गार्डन. तसा मी काही खाण्यापिण्यातला दर्दी नाही. पण कुठं काय चांगलं मिळतं याची माहिती मात्र जरुर असते. नेल्सन वँग हा चायना गार्डनचा मालक. जातीने फिरुन लक्ष देणार. त्याची मागे केव्हा तरी ओळख झाली आणि तो चांगला मित्रच बनला.
चिनी लोकानी बाकी काहीही बदल केले असले तरी दोन गोष्टी मात्र अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवल्या आहेत. एक म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आणि पारंपारिक औषधोपचार, फक्त चवीसाठीच चिनी पदार्थ नावाजलेले नाहीत. आरोग्यवर्धनही सहज साधलं जात. जवाहरलाल नेहरु यांचं निधन झालं, त्यावेळी माओने विचारल, काय, इतक्या तरुणपणी नेहरुंचं निधन झालं? माणसाला दीर्घयुषी ठेवण्याची ताकद तुमच्या जेवणात आणि आयुर्वेदात राहिलेली दिसत नाही.
आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही दोन्ही सोडलय, हे बिचाऱ्या माओला काय माहिती होतं. चायनीज पदार्थ बनवताना किती काळजी घेतली जाते, किती बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दिलं जात, हे वँगशी ओळख झाल्यावर लक्षात आलं.
बाहेर गेलो की, आपण कधीतरी चायनीज खातो आवर्जून. पण त्याचा संबंध त्याच्या चांगलेपणाशी फारसा नसावा. एक फॅशनच आहे, चायनीज खाणं म्हणजे. पण शहरात बरेच चायनीज लोक राहतात. अनेक वर्षांपासून. फरक एवढाच की जगाच्या पाठीवर चायनीज जे अनेक शहरात विखुरले, ते त्या त्या शहरात जाऊन दाटीवाटीने एकत्र राहिले आणि त्या त्या शहरात त्यानी चायना टाऊन तयार केल. तिथे जाऊनही आपल वेगळं स्वरुप कायम राखल.
मुंबईत मात्र असं स्वतंत्र चायना टाऊन त्यांना निर्माण करता आलेले नाही. भांडुपला चांग डेंटिस्ट अनेक वर्षांपासून स्थायिक आहे. वँग नेपीअन-सी रोडवर. तर अनेक वेगवेगळया भागात पसलेली आहेत. पण स्वत:चं व्यक्तिमत्व जपून आहेत.
वँगच्या म्हणण्याप्रमाणे तीन ते चार हजार चिनी माणसं आज शहरात आहेत. बहुतके तीन ते चार पिढयांपासून इथंच स्थायिक आहेत. बम्बई हिंदी चांगलं बोलतात. दिसतातही नागा-आसामींसारखे, त्यामुळे त्यांना फारशी वेगळी वागणूकही दिली जात नाही. चायनीज हॉटेलमध्ये काम करतात म्हणून ते चायनीज आहेत असं लोकाना जाणवतं एवढंच. जवळजवळ 1880 च्या आसपास ही मंडळी मुंबईत आली. 1900 साली झालेल्या बोअर युध्दात इतरत्र पसरली. बहुतेक लोक हे हाक या जमातीतले आहेत. कष्ट करणारे कामगार, शारिरीक कष्टात ते मागे पडत नाहीत. पण शिक्षणाची मात्र त्यांना फारशी आवड नसावी. पिढयान्-पिढया ते स्वयंपाक बनवणं एवढयाच गोष्टीत मश्गुल आहेत.
चायनीज रेस्टारंट प्रमाणेच चायनीज ब्युटी पार्लरही अतिशय आकर्षक पध्दतीने चालवली जातात. पण बाहेर कुठे बोर्ड नाही, जाहिरात नाही. पण चायनीज जडीबुटी वापरुन चालवली जाणारीही ब्युटी पार्लर्स फक्त गर्भश्रीमंतांनाच परवडू शकतात. येऱ्या-गबाळयाचे ते काम नाही. बरं ही पार्लर्स घरातच चालवली जातात. त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक निवड केली जाते. अनोळखी महिलेस प्रवेशसुध्दा मिळत नाही. ही ब्युटी पार्लर्स चालण्याचे कारण त्याची खात्रीपूर्वक वापरलेली औषध आणि कोणतेही अपाय होणार नाहीत याची खात्री.
दुसरा पारंपारिक पध्दतीने चालत आलेला व्यवसाय म्हणजे कागदी कंदील. हे आपल्या आकाश कंदीलासारखे असले तरी ते मोठया प्रमाणावर उपलब्ध होत नाहीत. ते फारसे तयार करत नाहीत. फक्त ऑर्डर मिळाल्यावरच ते बनवले जातात आणि चिनी दिवे आपल्या दिवाणखान्यात असावेत, अशी इच्छा मलबार हिल, कफ परेड, जुहू येथील प्रत्येकाला असते. पण प्रत्येकाला परवडत नाही. त्यची सुरुवात पन्नास हजारापासून होते. बरं ही कलाकुसर कागदी वाऱ्याने केव्हा निकालात निघेल हे सांगता येत नाही. पण हौसेला मोल नसतं. दिवे ठेवण्याचं हे खूळच आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्येही काही चायनीज आपल्याला दिसतील. ते फक्त रंगीबेरंगी पक्षी विकतात.
चिनी युध्दाच्या वेळी ही सारी मंडळी हबकली होती. मायदेशी फारसा संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे मुंबई हेच मूळगाव. हळूहळू शिक्षणाचा प्रसारही होताना दिसतोय. मुलं-मुली शिकताहेत. जाहिरात संस्थेत काम करणे ही त्यांची महत्वाकांक्षा. हेन्री हे त्यांच प्रतीक.
आपण जे चायनीज खातो त्यामुळे नेमकं चायनीज फूड कसं असतं याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. आपल्या परीने चायनीज माणूस मुंबईच्या विविधतेत भर घालताना दिसतो.
— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक 6 जानेवारी 1994
Leave a Reply