संगीतरंगभूमीवरील सुप्रसिद्ध मराठी गद्यनट आणि नाट्यनिर्माते अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर जन्म १२ मार्च १८९१ रोजी झाला. चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील वर्तमानपत्र लेखक व उत्कृष्ट वक्ते होते. चिंतामणरावांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना नाटके वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत १९११ मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते ’भरत नाटक मंडळी’त गेले. १९१४ मध्ये ते ’किर्लोस्कर नाटक मंडळी’त आले आणि त्यांचा भाग्योदय झाला.
१९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी ’बलवंत नाटक कंपनी’ काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक विविध भूमिका पार पाडल्या. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका केल्या. १९३३ मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या ’राजाराम संगीत मंडळी’त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ मध्ये गेले. अखेरीस त्यांनी ‘ललित कला कुंज’ नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला ’बहुरूपी’” हे नाव दिले आहे.
जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. जेष्ठ नट चित्तरंजन कोल्हटकर हे चिंतामणरावांचे सुपुत्र होते. चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके : पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. ‘वेड्यांचा बाजार’ हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक पुढे मा.चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.
चिंतामणराव हे १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांना रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply