चिंता हा शब्द आणि त्याबरोबरीनं येणारा त्याचा अर्थ यांचा अनुभव घेतला नसेल असा माणूस शोधूनही सापडायचा नाही. काळजी, तणाव हे शब्दही समान अनुभूती देणारे. चिंतामुक्त जीवन ही काय मग केवळ एक कल्पना आहे का? की तशी असायला हवी अशी निव्वळ इच्छा, स्वप्न? चिंता, काळजी ही नेहमीच तापदायक, त्रासदायक असते का? की या अवस्थेतूनही प्रेरणा मिळते, बळ मिळते? संकटाला संधी समजून त्यावर मात करता येते, असं म्हणतात. अनेकांनी आपल्या आयुष्यातूनही असा थेट संदेश दिलेला पाहायला मिळतो; पण ही संख्या किती अन् चिंता-काळजीनं ग्रासलेल्यांची संख्या किती? मला वाटतं काळजी-चिंता-तणाव या साऱया मनाच्या अवस्था असाव्यात. काही वेळा अशा अवस्थांना कारणं असतातही, काही वेळा ती नसतातही. या असलेल्या किंवा नसलेल्या कारणांच्या मुळाशी आपण जातो का, हा खरा प्रश्न असावा. तसा शोध घेण्याचा प्रयत्नच मग चिंतामुक्त होण्याचा मार्ग ठरू शकेल का? मला वाटतं हा प्रत्येकानं अनुभवण्याचा विषय असावा. एक मात्र खरं, की अशा प्रयत्नातून काळजी-तणावाची तीव्रता कमी होऊ शकते. तिचा कालावधी कमी होऊ शकतो.
नागपूरमधील घटना आहे. अर्थात, घटनाच अशी आहे, की तिला कोणत्याही स्थानाचा आधार नसला तरी बिघडणार नाही. एका आध्यात्मिक सत्संगाचा कार्यक्रम होता तो. `मानवी जीवनातील तणाव’ असाच काहीसा विषय होता. व्याख्यान संपलं. मी जे काही बोललो ते काहींना पटलं, काहींना बिलकूल पटलं नाही. एक मध्यमवयीन महिला पुढे आल्या व म्हणाल्या, “तुम्ही जे काही सांगितलं ते म्हणजे `आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी’ अशा थाटाचं होतं.” मी म्हटलं, “जरा स्पष्टपणे सांगा.” त्या म्हणाल्या, “आजकाल मुलांचं शिक्षण हाच मुळात मोठा तणावाचा विषय बनलाय. चांगल्या शाळा, कॉलेज काढणं, त्यात प्रवेश सुकर करणं हे काम सरकारचं; पण सरकार ते करीत नाही आणि आम्हा पालकांना मात्र प्रवेशाच्या तणावाला सामोरं जावं लागतं. आता मला सांगा, माझ्या मुलाला मेडिकलमध्ये प्रवेश हवा असेल, तर मला किमान 20-25 लाखांची उभारणी करायला हवी. कसं शक्य आहे हे? मुलांना त्यांच्या आवडीचं शिक्षण मिळावं यासाठी तुम्हा पत्रकारांनी सरकारवर कडाडून टीका करायला हवी. अग्रलेख लिहायला हवेत. त्याऐवजी तुम्ही मात्र येणाऱया तणावांना सामोरं कसं जावं, हे सांगत बसला आहात. तणावाचं मूळ नष्ट करण्याचं सोडून वेगळंच काही तरी सांगत आहात.” या महिला माझ्याशी बोलत असतानाही त्यांची काळजी-चिंता-तणाव लपत नव्हता. उलट, या विषयावरच्या चर्चेनं तो वाढला होता. मी म्हटलं, “बसा, आपण बोलू.” आम्ही सभागृहाच्या एका कोपऱयात बसलो. मी म्हणालो, “आपण काय करता?” त्या म्हणाल्या, “मी डॉक्टर आहे आणि पतीही.” मग मी विचारलं, “तुमचा मुलगा आता काय करतोय?” अगदी सहजपणे त्या म्हणाल्या, “सातवीत शिकतोय.” “दुसरा काय करतोय?” मी पुन्हा विचारलं. त्या म्हणाल्या, “आम्हाला एकच मुलगा आहे अन् तो सातवीत शिकतोय.” मला सावरायला अवधी लागला; पण सातवीतल्या त्यांच्या मुलाला आणखी पाच वर्षांनी मेडिकलला प्रवेश मिळेल का? चांगलं कॉलेज मिळेल का? त्यासाठी डोनेशन किंवा कॅपिटेशन फी किती द्यावी लागेल? ती कशी जमवायची? हे त्या महिलेच्या काळजीचे विषय होते. चिंता अन् तणावाचे विषय होते. मी म्हटलं, “अजून पाच वर्षे आहेत. तोपर्यंत मुलाला भावी अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं तयार करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. कदाचित तो बोर्डात पहिलाही येईल अन् त्याला हवा तो अभ्यासक्रमही निवडता येईल शिवाय त्याला डॉक्टर व्हायचंय की आणखी काही हेही समजावून घ्यायला हवं.” त्या बाई म्हणाल्या, “त्याला काय कळतंय, आम्ही त्याला सांगितलंय- डॉक्टरच व्हायचं; पण उद्या प्रवेश परीक्षेत नाहीच चांगले मार्क मिळाले, तर पैशाची तयारी नको का करायला? 25 लाख जमवायचे म्हणजे काळजी वाटतेच ना?”
या महिलेशी मी खूप वेळ बोललो; पण तिच्या चिंतेची तीव्रता कमी झाली का? या प्रश्नाचं नेमकं उत्तर मला नाही देता आलं. कारण साधं आहे. चिंतेच्या मुळाशी जाण्याचा मार्ग तिचा तिनं शोधायला हवा होता अन् तिनं तर सारे रस्तेच बंद करून ठेवले होते. सरकारने काही करावं, पत्रकारांनी काही करावं, समाजसेवी संस्थांनाही करण्यासारखं बरंच काही आहे. असं तिचं स्पष्ट मत होतं. मी काय करणार? काय करावं? हे प्रश्नच तिला पडलेले नव्हते. स्वाभाविकपणे चिंतेनं तिला ग्रासलं होतं.
पाच वर्षांत माणूस काय करू शकणार नाही? काय वाट्टेल ते करू शकेल. काळजी करावी; पण ती नियोजन करण्यासाठी. नियोजन करावं अन् प्रयत्नही करावेत मग चिंता ही प्रेरणा न बनली तरच नवलच!
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply