

माणसाच्या शरिराची देवाने जी रचना केली आहे त्याला खरंच तोड नाही. आता हेच पहाना; डोकं, डोळे, कान, नाक, तोंड, हात व पाय या सर्व अवयवांना देवानं संरक्षण असं काहीही दिलेलं नाहीये. फक्त एकाच अवयवाच्या संरक्षणासाठी, बत्तीस चौकीदारांची नेमणूक केलेली आहे. ती म्हणजे माणसाची सर्वांत शक्तिशाली धारदार तलवार, जीभ!
जीभ हा असा अवयव आहे की, जो माणसाला जन्मापासून शेवटपर्यंत उत्तम स्थितीत साथ देतो. या एकाच अवयवावर वार्धक्याचा काहीएक परिणाम होत नाही. जन्माच्या वेळी जीभ असते, दात जरा उशीरानं येतात. दात येतात, पडतात, अपघाताने निकामी होतात, साठीनंतर खिळखिळे होतात, ऐंशी नंतर एकेक करुन निवृत्त होतात, काही जण सर्वच दात काढून जिभेला सवत म्हणून, म्हाताऱ्या तोंडात तरणीबांड ‘कवळी’ बसवतात. तरीदेखील ‘चिरयौवना’ जिभेचं काम हे बिनबोभाट चालूच असतं.
माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, जो जिभेमुळे बोलून आपल्या मनातील विचार व्यक्त करु शकतो. इतर प्राणी तोंडाने विशिष्ट आवाज काढून एकमेकांशी व्यक्त होतात. तीन वर्षांपासून पुढे मूल व्यवस्थित बोलू लागते. शाळेत जाऊन ज्ञानार्जन करते. घरातील संस्कार व बाहेरची संगत आणि शाळेतील शिक्षण यावरुन त्याच्या बोलण्यात प्रगती होत रहाते.
घरातील वातावरण उत्तम असेल, खेळीमेळीचे असेल, अपशब्द कानावर पडत नसतील तर तो चांगलेच बोलणार. शाळा शिस्त लावणारी असेल, शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थी चांगला नागरिक व्हावा, अशी तळमळ असेल तर तो विद्यार्थी आदर्शच घडतो. त्याची मित्रमंडळी, जिथे राहतो ती वसाहत जर शांत असेल, तेथील नागरिक सुजाण, भांडखोर नसतील तर त्याचाही परिणाम त्याच्या जडण-घडणीवर, म्हणजेच बोलण्यावर होतो.
समोरचा माणूस गप्प असताना त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, तो बोलू लागला की, ‘कळू’ लागतो ते त्याच्या बोलण्यातून. सवयीनुसार प्रत्येकाचे बोलणे बदलत जाते. काहींना शिवीचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही. त्याउलट संस्कारी माणूस कितीही चिडला तरी अपशब्द बोलूच शकत नाही, त्याऐवजी तो गप्प राहणेच पसंत करतो.
तोंडातून चुकीचा शब्द बाहेर पडला तर आपण जीभ चावून दिलगिरी व्यक्त करतो. पदार्थाची चव जिभेमुळेच कळते व आपण चमचमीत पदार्थ खाऊन तिचे नेहमीच चोचले पुरवितो. आजारी पडल्यावर डाॅक्टर पहिल्यांदा जीभ दाखवायला सांगतात, त्यावरुन त्यांना तब्येतीचा आलेख समजतो. इतरवेळी तुम्ही कुणाला जीभ काढून दाखवलीत तर त्याला ते ‘वेडावून दाखवणं’ ठरते.
काहीजण आपल्या जिभेने चांगलं बोलून सुखावतात, तर काही जण टोकाचं बोलून समोरच्याला कायमचं दुखावतात. रागाच्या भरात नाही नाही ते बोललं जातं. नको असताना मागचं ‘दिलं घेतलं’ उकरुन काढलं जातं, परिणामी संबंध दुरावले जातात.
एकदा तोंडातून गेलेला शब्द माघारी घेता येत नाही. मग ‘माझ्या मनात ‘तसं’ काही नव्हतं’ अशी कितीही सारवासारव केली तरी त्याचा उपयोग होत नाही. शब्दाला शस्त्रापेक्षा अधिक धार असते. जेव्हा समोरच्या व्यक्तीचा अतिशय राग आलेला असतो, तेव्हा तो बोलण्यातून व्यक्त करण्यापेक्षा शांत रहाणंच कधीही योग्य असतं.
रामायणात, महाभारतात देखील ऋषीमुनींनी क्रोध अनावर होऊन शाप दिलेले आहेत. आताच्या कलीयुगातही साधू संतांनी देखील आपल्या जिभेवर ताबा ठेवण्यास सांगितलेले आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने माझा असंख्य व्यक्तींशी संपर्क आला. त्यातील कित्येकजण रागावर संयम न ठेवू शकणारे होते. त्यांच्याशी मी सौम्यतेने वागलो. काहींशी कामावरुन वाद झाले, नंतर मीच त्या गोष्टी विसरुन गेलो. समोरच्याने कितीही मोठ्या आवाजात बोललं तरी आपण आपला तोल ढळू द्यायचा नसतो. शब्दाने शब्द वाढतात, मात्र निष्पन्न काहीही होत नाही. डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर असेल तर जीभेला नेहमीच लगाम राहतो.
आपल्याकडे संक्रांतीसारखे सण असतात, ज्यावेळी एकमेकांना ‘तिळगुळ घ्या आणि ‘गोड’ बोला’ असे आवाहन केले जाते. दुरावलेल्यांना दसऱ्याच्या निमित्ताने ‘आपट्याच्या पानांचे’ सोने देऊन एकत्र येण्याचा सुमुहूर्त साधता येतो.
सर्व साधारणपणे शाकाहारी असणारी व्यक्ती जिभेचा वापर सांभाळून करते, मांसाहारी व्यक्तींना राग आल्यावर बोलण्याचे भान रहात नाही. याला अपवादही असू शकतो.
काहींना ‘वाचासिद्धी’ असते. ते बोलतात तसंच घडतं. त्यांनी त्या सिद्धीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला तर सिद्धी रहाते, अन्यथा ती नाहीशी होते.
एकूण काय, आपण अवश्य बोला, भरपूर बोला… मात्र ‘जबान संभालके….’
– सुरेश नावडकर १२-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.
Leave a Reply