भुसावळच्या गणेशोत्सवाचे पाच पदर असायचे- चार ठळक आणि एक आमचा लुडबुडवाला ! ठळक म्हणजे- गावातला, घरचा, शाळेचा आणि आमचा – पण गल्लीतला (खरंतर तीन इमारतींपुरता), लुडबुडवाला म्हणजे मोठया स्तरावरील चिरा गल्लीतील (जेथे आम्हांला कोणी विचारत नसे).
मुंबईशी अंतराच्या दृष्टीने जवळीक असल्याने भुसावळला मंडळांच्या मूर्ती तेथून येत- नयनरम्य, देखण्या आणि मोठया आकाराच्या पण मितीत बसणाऱ्या ! घरगुती मूर्तींसाठी बऱ्हाणपूर पसंत केले जायचे. देखावे किंवा हलते देखावे यांचे फारसे प्रस्थ नसायचे.
गणेश चतुर्थीची मिरवणूक आमच्या राम मंदिर वॉर्डातील गल्लीतून जात असे. गावातील प्रमुख ४०-५० गणपती सकाळी साधारण दहा ते दुपारी ३ पर्यंत त्यामध्ये बघायला मिळत.त्यामुळे सकाळी घरातील प्राणप्रतिष्ठा लवकर आटोपून आम्ही तिसऱ्या मजल्यावरील आमच्या गच्चीत कोंडाळे करून स्थानापन्न होत असू. अधून-मधून घरातील वडीलधारी मंडळी आम्हाला जॉईन होत असत.
विसर्जनाची मिरवणूक सायंकाळी साधारण पाचच्या सुमारास मेन रोडने असे. घरापासून काहीशी दूर असल्याने ती तब्येतीत संपूर्ण बघायला मिळत नसे. संपे कधी याविषयीचे खरे-खोटे दावे १-२ दिवसांनी कानी येत. ते व्हॅलिडेट करायच्या भानगडीत आम्ही पडत नसू कारण तापी नदी तशी गावाबाहेर आणि क्वचितच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची घरून परवानगी मिळे. पण दहा दिवस गणपती बघायला आधी घरच्यांबरोबर आणि नंतर शिंग फुटल्यावर आम्ही मित्र-मित्र जात असू, स्वतःच्या पातळीवर रसग्रहणही करीत असू. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची- ” घेता किती घेशील ” अशी अवस्था व्हायची! दूरवर असलेल्या रेल्वे कॉलनीत मनोरंजनाचे कार्यक्रम असत. आणि रेल्वेच्या बँडचे आकर्षण जबरदस्त ! तशी कुंभार वाड्याजवळच्या बँड आळीत शाळेत जाता-येता त्यांची रिहर्सल कानी पडायची, पण मिरवणुकीत बँड हा काही मंडळांचा स्टेटस सिम्बॉल असायचा हे नक्की !
आमच्या गल्लीच्या थोडी पुढे आणि बाजाराच्या अलीकडे मशीद होती आणि त्या काळातील स्फोटक वातावरणामुळे क्वचित वाद व्हायचे. मग दोन्ही मिरवणुकांमध्ये मशिदी समोरून जाताना वाद्यवृंद बंद असा तोडगा निघाला होता.
घरामध्ये आमची (मला आणि भावाला) मतं फुटायला चौथी वगैरे उजाडली. तत्पूर्वी पितृवचन अंतिम ! त्यांतही एकदा (आणि एकदाच) धमाल झाली. वडिलांनी चक्क उजव्या सोंडेचा गणपती निवडला. आज्जींनी खूप तोंड केले. पुढचे दहा दिवस पराकोटीचे सोवळे पाळून आम्ही तो उत्सव साजरा केला -सतत भय आणि काही चुकले तर ? या दोन छत्रांखाली. त्यामुळे एरवीची धमाल नाही आली. घरी महालक्ष्मी नसल्याने आई बरोबर किमान दोन दिवस आम्ही दरवर्षी जळगांवला आजोळी जायचो. “नेत्रवैद्य बिल्डिंग ” या आमच्या इमारतीतील विहिरीत घरच्या गणेशाचे विसर्जन होत असे.
शाळेत-न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गणपती बसायचा. प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधी निवडले जायचे. आठवीत मी आणि शिरीष महाबळ प्रतिनिधी होतो. आमचे काम वर्गातील सर्वांकडून प्रत्येकी एक रुपया वर्गणी गोळा करणे, त्याचा हिशेब ठेवणे आणि शाळेतल्या गणपतीच्या कार्यक्रमात हातभार लावणे- मिरवणूक, अथर्वशीर्ष स्पर्धा इत्यादी !
चिरा गल्ली गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध होती. एके वर्षी शेतात नांगरणी करणारा गणेश आणि पाठीमागून त्याच्यासाठी न्याहारी आणणारी शारदा अशी देखणी मूर्ती होती. एके वर्षी “विठू माझा लेकुरवाळा ” या संकल्पनेनुसार गणेशाला विठ्ठलरूपात उभे केले होते आणि अंगाखांद्यावर संत मंडळी ! त्यावर्षी सदर मूर्तीचे विसर्जन केले गेले नाही उलट पुढील काही वर्षी गल्लीतल्या भागवत सप्ताहाच्या वेळी मंडपात तिचे सर्वंकष पूजन होत असे. बाय द वे, भुसावळला दर वर्षी विसर्जन मस्ट -मोठाल्या,मंडळांच्या मूर्तीही त्याला अपवाद नसत. म्हणूनच दरवर्षी नव्या थीमची मूर्ती बसविली जात असे.
आमचे घरमालक डॉ अशोक चौधरी बरीच वर्षे चिरा गल्ली गणेशोत्सवाचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे दर वर्षीच्या मूर्तीचे फोटो फ्रेम करून त्यांच्या घरात लावले जात.
काही कारणाने त्यांचे गल्लीशी बिनसले आणि त्यांनी अध्यक्षपद सोडले. आम्हालाही गल्लीत महत्व नसल्याने त्या वर्षी आम्ही स्वतःचे “बाल गणेश मंडळ” सुरु करायचा निर्णय घेतला. डॉ अशोक यांचा छुपा पाठिंबा होताच. वर्गणी हा मुख्य प्रश्न कारण आधीच चिरा गल्ली वर्गणी वसूल करीत असे. तरीही घरच्यांना कन्व्हिन्स करून आम्ही प्रत्येकी पाच रुपये गोळा करायचे ठरविले. घरी येणाऱ्या परिचितांकडून, नातेवाइकांकडून रीतसर पावती देत वसुली सुरु केली.
त्याकाळात किसन मोरे आणि तुकाराम मोरे (बहुधा चुलत भाऊ असावेत आणि कौटुंबिक कलहामुळे वेगळे झाले असावेत) हे बिनीचे स्थानिक मूर्तिकार ! किमान चार महिने आधी त्यांचे काम सुरु व्हायचे आणि शाळेत जाता -येता त्यांच्या कामाची प्रगती उलट-सुलट भाष्य करीत आम्ही बघत असू. त्यातही तुकाराम मोरे उजवा !
आम्ही त्याच्याकडे जाऊन आधीच तयार असलेली मूर्ती बुक केली- किंमत होती ५१रुपये.
देखावा तयार करण्यासाठी सहा बाय सहाच्या बोर्डवर चित्र काढून देण्याची विनंती गल्ली आणि वर्ग मित्र विकास कोळंबे ला केली. समोरच्या राजारामबुवांनी त्यांच्या वाड्यातील एक रिकामी खोली दहा दिवसांसाठी हाती सोपविली, त्याबदल्यात त्यांच्याकडून वर्गणी न घेण्याचे ठरले.
मूर्ती एका असुराचा वध करतेय अशा पोझमध्ये असल्याने त्या असुराचे नांव आम्हीच ठरविले. त्याच्या वधाचे वृत्त मी एका बोर्डवर रंगवून खोलीत लावले. इफेक्ट यावा म्हणून लाल जिलेटीनचे कागद बल्ब वर चिकटवून त्यांचा प्रकाश मूर्तीवर पडेल अशी रचना केली. रात्री अकरा पर्यंत जागरणासाठी पाळी ठरविली. आपोआप घरच्या गणपतीकडे दुर्लक्ष झाले.
विसर्जनासाठी हातगाडीवर मूर्ती ठेवून नदीवर जाण्याचा आमचा बेत घरच्यांनी उशीर+ काळजी+ गर्दी इत्यादी कारणांनी हाणून पाडला. शेवटी नाक घासत चिरा गल्लीच्या ट्रकवर मूर्ती ठेवली आणि त्यांच्या डोळ्यांतील विजयी हास्याकडे दुर्लक्ष करीत घरी परतलो.
हा सगळा इतिहास १९७४ पर्यंतचा- माझ्या मेंदूत साठलेला ! आज हे सगळं असंच सुरु आहे कां ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply