बेचाळीस वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीस व तिने मला लिहिलेली काही पत्रे परवा कपाट आवरताना अचानक पणे सापडली. जुनी झाल्यामुळे पिवळी पडलेली पत्रे मी डोळ्यावर मोठ्या भिंगाचा चष्मा चढवून चाळू लागलो. पत्र जरी आम्हीच लिहिलेली होती व आधी त्याची कितीतरी पारायणे झालेली होती तरी आता ती नव्यानेच वाचतो आहे असे वाटले. भाव ओळखीचे होते पण काळाने स्मृती पटलावरील अक्षरे धुसर झाली होती. पत्रातील प्रत्येक शब्द वाचताना त्या वरील धूळ पुसल्या जाऊ लागली. हळू हळू त्याचेशी समरस होऊन भूत काळातील त्या अनोख्या अनुभुतीत विरून गेलो.
तारुण्ण्याने भारलेल्या त्या दिवसात, जोडीदाराच्या समवेत केलेल्या वाटचालीची, कालचे स्वप्न ते आजचे वास्तव या जीवन प्रवासाची चित्रफीतच होती ती! प्रत्येक पत्रागणीक हळू हळू ती चित्र-फीत उलगडू लागली.
लग्न ठरल्या पासून ते विवाह होई पर्यंत व त्या नंतरच्या जोडीने केलेल्या काल क्रमणाच्या प्रत्येक टप्प्यावरची ती पत्रे साक्षीदार होती.
लग्न होण्यापूर्वी पण लग्न ठरल्यानंतर मी तिला पहिले-वाहिले पत्र लिहिले. वाचलेले साहित्य आणी बघितलेल्या नाटक-सिनेमा वरून जे काही सुचले-भावले ते शब्द बद्ध करून हृदयाची स्पंदने तिच्या पर्यंत पोहोचवण्याचा केलेला पहिला प्रयत्न. त्या स्पंदनांची लग्न होई पर्यंतची देवाण-घेवाण. लग्ना आधीच्या भेटीतील तसेंच लग्ना नंतरच्या सुखद अनुभुतीचे कबुली जबाब. सासर-माहेरच्या तिच्या नैमित्यिक वास्तव्यातील, परस्परांची ओढ व काळजी.
सुखी संसारात अपेक्षित तिसऱ्या व्यक्तीच्या आगमनाची चाहूल व शुभ आगमन. पुत्र-प्राप्ती नंतरचा माझ्या आजीच्या मांडीवर पणतू चा करण्यात आलेला ’मावंद’ सोहळा. मुलाला मांडीवर घेउन त्याचे कडून गिरवून घेतलेला श्रीगणेशा. त्याला मोठा करण्यासाठी त्याच्या आईने घेतले कष्ट व खाल्लेल्या खस्ता. चौथीच्या परीक्षेत मुलाने मिळवलेल्या शिष्यवृत्तीने हरखलेलो आम्ही. त्याला मोठ्या भावाचा मान व दर्जा देणाऱ्या धाकट्या मुलाचे सु-नियोजित आगमन.
एक एक प्रसंग अगदी कालच घडल्या सारखा स्पष्ट पणे पुढे सरकत होता. आम्ही मिळून पाहिलेल्या स्वप्नाचे रेखा चित्र येथ पर्यंत तरी सुबक पणे रेखाटले गेले होते. हातातील पत्रे संपली. तेवढीच जपली गेली होती.
या मध्यंतरात मी डोळ्यावरचा चष्मा काढून पुसला. स्वप्नांची सीमा रेषा तेथे संपत होती. तंद्रीतच डोळे मिटून स्वस्थ बसलो.
चित्र-फित पुढे सरकू लागली.
अनियमित नोकरीच्या वेळेमुळे व तिच्या मुलांमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे उभयतांनी पाहिलेली स्वप्ने धुसर होउ लागली. हळू हळू दोघेही आपापल्या कामात व्यस्त झालो. त्यामुळे एकमेकास वेळ देऊ शकलो नाही. परिणामत: लहान सहान कुरबुरी वाढू लागल्या. पूर्वीच्या लटक्या रुसण्या-फुगण्याचे परिवर्तन क्रोधात होउ लागले. समजुत काढण्यास वा समजून घेण्यास दोघांनाही वेळ नव्हता. अहंकार दोघांनाही माघार घेऊ देत नव्हता. धुसफुस वाढू लागली. शब्दाने शब्द वाढून वरचेवर तणाव निर्माण होउ लागला.
अशा रितीने जीवनातील वास्तवाची नियतीने जाणीव करून दिली. नियतीने आमच्या स्वप्नांचा ताबा घेतला. तिने आधीच योजिलेल्या आमच्या चित्रात वास्तवाचे स्वत: रंग भरू लागली. स्वप्न कितीही मनोहर असले तरी शेवटी ते स्वप्नच असते हे ध्यानात यावयास आम्हास फार वेळ लागला नाही.
स्वप्नातून बाहेर येऊन पुन: आम्ही एकजुट होऊन आमच्या वाट्यास आलेल्या भूमिंकेत एकरूप झालो. पुढ्यातील पत्रे गोळा करून नीट घडी घालून जागेवर ठेवली.स्वप्न पाहण्यास काय हरकत आहे? मी मनास समजावले.
“आबा, जेवणा पूर्वी घ्यायच्या गोळ्या घेतल्यात का? आजी विचारते आहे” उत्तराची वाट न पाहता मोबाईलशी चाळा करीत दहा वर्षाच्या नातवाने विचारले. तंद्रीतून जागा होत मी डोळ्यावरील चष्मा खाली उतरवला..
— अविनाश यशवंत गद्रे
Leave a Reply