नवीन लेखन...

चित्रकाराचे चातुर्य

(कोरियन लोककथा)

एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत. प्रचंड अशी लोकप्रियता, प्रसिद्धी अन् पैसा मिळाला तरी हा चित्रकार अहंकारापासून दूर होता. त्याचा स्वभाव अगदी सरळ होता. त्याला पैशाचा मोह मुळीच नव्हता. एखादा रसिक त्याच्या चित्रासाठी मोठी रक्कम द्यायला असमर्थ असला तर तो त्याची अडवणूक करीत नसे. तो देईल त्या रकमेत आपलं चित्र त्याला देऊन टाकी. कमविलेल्या संपत्तीचा बराचसा भाग तो रंजल्या-गांजलेल्यांना मदत करण्यात खर्च करीत असे.

त्याच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या एका धनाढ्य सावकाराला त्याच्याकडून आपले चित्र काढून घ्यायची इच्छा झाली. मानधनाची रक्कम एक हजार वौन (कोरियाचे चलन) ठरविण्यात आली. चित्रकाराने काही दिवसात चित्र तयार केले. मन लावून त्याने हे चित्र काढले होते. अगदी हुबेहूब चित्र होतं ते.

सावकाराने जेव्हा चित्र पाहिलं तेव्हा तो खूप आनंदित झाला. पण चित्रकाराला एक हजार वौन देणं त्याच्या जिवावर आलं. त्याला ही रक्कम फार मोठी वाटू लागली. क्षणभर विचार करून तो धूर्तपणे म्हणाला, “याला माझं चित्र म्हणतोस तू? माझे डोळे, नाक किती विचित्र दिसतात या चित्रात. हे माझं चित्र आहे असं कुणीही म्हणू शकणार नाही. आता तुझं नुकसान व्हावं असं मला मुळीच वाटत नाही. कॅनवास, रंग यांच्यासाठी तुझे शंभर-दीडशे वौन नक्कीच खर्च झाले असतील. मी तुला फार तर तीनशे वौन देईन. तुझी इच्छा असेल तर मी लगेच पैसे द्यायला तयार आहे. सावकाराने विचार केला हे चित्र स्वतःजवळ ठेऊन चित्रकार काय करील? त्याला तर याचा काहीच उपयोग नाही. त्याला नाईलाजाने चित्र विकावंच लागेल… आपल्या युक्तीवर सावकार बेहद्द खूश होता.

चित्रकाराला फार मोठा धक्का बसला. सावकाराचे हे वर्तन त्याला आवडले नाही. खूपच दुःख झालं. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. त्यानं सावकाराला धडा शिकवायचा निश्चय केला. काही क्षण विचार करून तो म्हणाला. “तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी चित्र काढू शकलो नाही याचा खेद वाटतो मला… पण हे चित्र तुमचं नाही याची खात्री आहे ना तुम्हाला? ” “हो. नक्कीच. हे चित्र माझं नाहीच.” सावकार ठासून म्हणाला. खुद्द चित्रकारानेच चित्र चांगलं नसल्याचं कबूल केलं होतं, तेव्हा तो आपण सांगितलेल्या किंमतीला चित्र नक्कीच देणार असा सावकाराला विश्वास वाटत होता.

“हे चित्र तुमचं नाही असं लिहून देऊ शकाल का तुम्ही? ” चित्रकाराने विचारले.

“कां नाही? आताच लिहून देतो तसं.” असं म्हणून सावकाराने एका कागदावर ‘हे चित्र माझं नाही’ असं लिहून त्या खाली स्वाक्षरी केली अन् तो कागद चित्रकाराला देऊन टाकला. चित्रकाराने तो कागद आपल्या खिशात ठेवून दिला अन् म्हणाला, “जे चित्र तुमच्या पसंतीला उतरलंच नाही त्याच्यासाठी तुमच्याकडून पैसे घेणे मला उचित वाटत नाही.”

आणि ते चित्र एका कागदात काळजीपूर्वक लपेटून चित्रकार निघून गेला. चित्रकाराने चित्र परत नेल्याचे पाहून सावकाराला त्याच्या मूर्खपणाचे हसू आले.

दुसऱ्या दिवशी सावकाराची बायको जेव्हा बाजारातून परतली तेव्हा संतापाने ओरडलीच, ‘काय फाजीलपणा आहे हा? ‘ “आँ? काय झालं?” सावकाराने विचारले.

मी म्हणते असं करायची त्याची हिंमतच कशी झाली? ” ती आणखी भडकून म्हणाली.

‘पण झालं तरी काय? ”

“मला काय विचारताय? तुम्हीच जा चौकात अन् तिथं काय चाललय् ते पहा आपल्या डोळ्यांनी.” ती फणकाऱ्याने म्हणाली.

सावकार चौकाच्या दिशेने निघाला. चौकात ही गर्दी जमली होती. तिथं लावलेलं एक चित्र पाहून लोक पोट धरून हसत होते. तो लगबगीने तेथे पोहोचला. लोकांनी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तर लोकांची हसून हसून मुरकुंडी वळली!

ज्या चित्राला पाहून लोक हसत होते ते चित्र त्याचंच होतं. चित्राच्या खाली मोठ्ठया अक्षरात लिहिलं होतं- ‘मूर्ख शिरोमणी’. – चित्रकाराचे चातुर्य.

हा प्रकार पाहून तो भडकला. तडक चित्रकाराकडे गेला. त्याला पाहताच तो रागावून ओरडला, “काय अगाऊपणा आहे हा?” “काय झालं शेठजी?” चित्रकाराने शांतपणे विचारले.

“माझं चित्र चौकात लटकावून वर मलाच विचारतोस? ” सावकाराचा पारा खूपच चढला.

“तुमचं चित्र? पण तुम्हीच तर लिहून दिलय् की ते चित्र तुमचं नाहीए म्हणून…” चित्रकार म्हणाला.

सावकार गप्प गारच झाला. काय करावं हेच त्याला सुचेना. फारच अस्वस्थ झाला तो. चित्रकाराने आपल्याला चांगलंच कोंडीत पकडलं हे त्याला कळून चुकलं. बऱ्याच वेळेनंतर तो कसाबसा म्हणाला, “ठीक आहे. मी एक हजार वौन द्यायला तयार आहे. ते चित्र मला देऊन टाक. ”

“पण ते चित्र तर तुमचं नाहीए… काय करणार तुम्ही ते घेऊन?’ चित्रकाराने विचारले.

“त्याच्याशी तुला काय करायचंय? ते चित्र मला हवं आहे अन् त्याची किंमत द्यायला मी तयार आहे. त्या चित्राचं मी काय करीन याच्याशी तुला कर्तव्य नाही.” आपला राग आवरून सावकार म्हणाला.

“ठीक आहे शेठजी, पण आता या चित्राची किंमत दहा हजार वौन आहे.

आणि एवढी रक्कम तुम्ही देऊ शकत नसाल तर मला हे चित्र विकायचं नाही.”

चित्रकार दृढतेने म्हणाला.

आणि सावकाराला दहा हजार वौन मोजून द्यावे लागले.

ही सारी रक्कम चित्रकाराने एका अनाथालयाला देऊन टाकली !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..