व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.
व्ही. शांताराम यांचे पूर्ण नांव शांताराम वणकुद्रे. त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी झाला. वयाच्या 19 व्या वर्षीच ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. आणि बाबुराव पेंटर ह्यांचे सहाय्यक म्हणून काम करताना त्यांनी चित्रपटाचं तंत्र आत्मसात केलं. त्यानंतर त्यांनी अनेक अंगांनी त्यावर विविध प्रयोग केले. आणि वैविध्यपूर्ण असे आपले स्थान निर्माण केले. ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमध्ये घुटमळणाऱया चित्रपटांना सामाजिक विषयांचे संदर्भ देऊन काळाच्या बरोबरीने त्यांची निर्मिती केली.
आशयघनता आणि प्रतिकात्मक विषय हे दिग्दर्शकाचं खरं कौशल्य आहे हे त्यांनी दाखवून दिले. गंधर्व कंपनीच्या नाटकात गोविंदराव टेंबे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी नाटकात भूमिका करण्यास सुरुवात केली. लहान वयातच चित्रपट सृष्टीत प्रवेश करून कलात्मक बुद्धी, कामावरील निष्ठा आणि आत्मविश्वास याच्या जोरावर चित्रपट सृष्टीत त्यांनी आपले स्वतचे असे एक अढळस्थान निर्माण केले.
प्रभात फिल्म कंपनीतील कुंकू, माणूस, गोपालकृष्ण, तुकाराम, ज्ञानेश्वर इत्यादी अनेक गाजलेल्या चित्रपट निर्मितीत व्ही. शांताराम यांचे मोठे योगदान होते. पुढे त्यांची स्वतची `राजकमल’ ही संस्था उभी राहिली आणि अनेक नामवंत कलावंतांबरोबर सदाबहार असे दर्जेदार चित्रपट पडद्यावर आले. सिनेमा ही एक कला आहे, हे जाणून त्यांनी स्वतची शैली सिनेमाला दिली. `अमृतमंथन’ या सिनेमात व्ही. शांताराम यांनी प्रथमच क्लोजअप लेन्स वापरले. `शाहीर रामजोशी’, `अमर भूपाळी’, `शेजारी’, `दो ऑंखे बारह हाथ’, `नवरंग’, `पिंजरा’ यातील त्यांच्या दिग्दर्शनाचे कौशल्य भुरळ घालते.
जेमतेम प्राथमिक शिक्षण झालेल्या शांताराम बापूंनी आपल्या तपश्चर्येने भारतीय सिनेमाला समृद्ध केले. `दो ऑंखे बारह हाथ’
ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. समाजानी त्यांना `चित्रपती’ पदवीने गौरविले. 28 ऑक्टोबर 1990 ला त्यांचे निधन झाले.
व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.
Leave a Reply