नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर

कॅमेऱ्यासमोर आपण उभे राहिलो, की आपल्यासारखा दुसरा कलाकार कुणी नाही, हा शांता आपटे यांचा गुरुमंत्र जपणारे चित्तरंजन कोल्हटकर हे सर्वार्थाने महान रंगकर्मी होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला.

घराणेशाहीचा वरदहस्त लाभलेले, नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचे सुपुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनी वडिलांचा अभिनयाचा वारसा तितक्याच सामर्थ्यांनं तब्बल ६० वर्षे मराठी रंगभूमीवर चालविला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’मुळे नाटकाचा वारसा चित्तरंजन कोल्हटकर यांच्याकडे आला असला तरी चिंतामणरावांना मात्र प्रारंभी आपल्या मुलाने नाटकात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याने उत्तम शिक्षण घेऊन बॅरिस्टर व्हावे आणि राष्ट्रकार्य करावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी देशभक्त बॅ. चित्तरंजन दास यांच्या नावावरून आपल्या या मुलाचे नाव ‘चित्तरंजन’ ठेवले होते. परंतु चित्तरंजनने बॅरिस्टर व्हावे, ही त्यांची इच्छा फलद्रुप होऊ शकली नाही. चित्तरंजन कोल्हटकरांनी प्राथमिक शिक्षण घेतले आणि ते पोटापाण्यासाठी नोकरी शोधू लागले. मुंबईत अॅीम्युनिशन फॅक्टरीत त्यांना नोकरी मिळालीही.

परंतु तिथे त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला गेल्याने स्वाभिमानी चित्तरंजननी नोकरीसह मुंबईही सोडली. त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. परंतु उंची आणि वजनात मार खाल्ल्याने तिथे त्यांची डाळ शिजली नाही. मुलाचे कुठेच काही जमत नाही, हे पाहिल्यावर त्याला बेकार बसू देणे धोक्याचे आहे, हे ओळखून चिंतामणरावांनी त्यांना आपल्या नाटक कंपनीत प्रॉम्प्टरचे काम दिले. नाटक कंपनीचे मालक असलेल्या दुसऱ्या कुणा बापाने मुलाला एखाद्या नाटकात मुख्य नट म्हणून उभे केले असते. परंतु चिंतामणरावांनी तसे केले नाही. त्यामुळे एक झाले- अनेक नाटकांत प्रॉम्प्टर म्हणून काम केल्याने आणि प्रॉम्प्टरला सबंध नाटकभर दक्ष राहावे लागत असल्याने चित्तरंजनना अनेक नाटके मुखोद्गत झाली. त्याच वेळी वडिलांच्या नाटकांच्या तालमींतून हजर राहिल्याने त्यांची नाटक बसविण्याची पद्धत, संवादफेकीचं तंत्र, रंगमंचीय व्यवहारांतील मेख, बडय़ा नटांच्या अभिनयातील खाचाखोचा यांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष शिक्षण त्यांना मिळत गेले.

तरीही चिंतामणरावांनी त्यांना नाटकात घेण्याचे मनावर घेतले नाही. परंतु एके दिवशी काही अडचणीमुळे ‘भावबंधन’मधील बावळट मोरूचे काम करण्याची संधी चिंतामणरावांनी चिरंजीवांना दिली. त्या छोटय़ा कामात चित्तरंजननी हुकमी हशे वसूल करून वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. आणि तेव्हापासून कंपनीच्या नाटकांतून चित्तरंजनना छोटय़ा छोटय़ा भूमिका मिळू लागल्या. पण वसंत शिंदे, जयराम शिलेदार यांच्यासारखे बडे नट कंपनीत असेतो चित्तरंजनना कधीही मोठी भूमिका मिळाली नाही. या नटांनी कंपनी सोडल्यावर ‘युद्धाच्या सावल्या’त मारवाडी, ‘भावबंधन’मधील घन:श्याम, ‘पुण्यप्रभाव’मध्ये नुपूर अशा महत्त्वाच्या भूमिका चित्तरंजन यांच्याकडे आपसूक चालत आल्या. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही भूमिका चित्तरंजन एव्हाना लीलया पेलू लागले होते. याच काळात बोलपटांमुळे नाटकाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आणि चिंतामणरावांची नाटक कंपनी बंद पडली.

चित्तरंजन यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तेव्हा नाइलाजाने ते मुंबईच्या नाटकांतून ‘नाइट’वर कामे करू लागले. याच दरम्यान त्यांना ‘गरिबांचे राज्य’ या बोलपटात एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला. या चित्रपटातले त्यांचे काम भालजी पेंढारकरांना इतके आवडले, की त्यांनी ‘मी दारू सोडली’ या त्यांच्या चित्रपटात चित्तरंजनना घेतले. आणि इथून त्यांचे चित्रपटसृष्टीत बस्तान बसले. यशस्वी खलनायकी भूमिकांबरोबरच काही चित्रपटांतून त्यांनी नायकाची कामेही केली. ‘सौभाग्य’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मुरळी मल्हारीरायाची’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘रायगडचा राजबंदी’, ‘अशी रंगली रात’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. शारीरिक उंचीची उणीव त्यांनी अभिनयाने भरून काढली. गोरेपान देखणे व्यक्तिमत्त्व, घारे डोळे आणि सहजाभिनयाबरोबरच सळसळता उत्साह यामुळे त्यांच्याकडे भूमिका चालून येऊ लागल्या. एव्हाना सिनेमाचा रूपेरी पडदा त्यांनी आपलासा केलेला असला तरी स्वत:ला रंगभूमीचा विसर त्यांनी कधीही पडू दिला नाही.

दोन्हीकडे त्यांचा मुक्त संचार सुरू झाला. तत्कालीन नाटकांतून पल्लेदार संवाद, भाषेची चित्तचमत्कारिक आवर्तने, स्वच्छ, सुस्पष्ट वाणी यांना मागणी होती. चित्तरंजन कोल्हटकर या सगळ्यांत ‘बाप’ होते. पल्लेदार वाक्ये उच्चारताना भल्याभल्यांचा अभिनय सटपटे आणि अभिनयाकडे जास्त लक्ष दिले की तोंडची वाक्ये घरंगळत. पण चित्तरंजन याला अपवाद होते. ‘भावबंधन’मधील त्यांचा घन:श्याम आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ‘एकच प्याला’तील ‘सुधाकर’ आणि ‘तळीराम’ या दोन्ही भूमिकांवर त्यांनी अशीच आपली नाममुद्रा उमटविली. कुठल्याही भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यात चित्तरंजन वाकबगार होते. रंगभूमीवर सहज वावर असलेल्या हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा कलावंतांमध्ये चित्तरंजन कोल्हटकरांचा अंतर्भाव करावा लागेल. ते एकदा का रंगमंचावर अवतरले, की नाटक सहजी कवेत घेत. ‘नाटय़संपदा’चे ‘अश्रूंची झाली फुले’ हे अत्यंत गाजलेले नाटक रंगभूमीवर येत असताना एका मोठय़ा अनर्थातून चित्तरंजननीच वाचविले. त्याचे झाले असे : ‘नाटय़संपदा’ची तत्पूर्वीची दोन-तीन नाटके कोसळल्याने संस्था अडचणीत आली होती. त्यामुळे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक संस्थेसाठी जीवनमरणाचा विषय झाले होते. या नाटकासाठी सरकता रंगमंच बनवण्यात आला होता. परंतु पहिल्याच प्रयोगाच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे तो रंगमंच सरकेचना. त्याची दुरुस्ती करून तो चालू करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले.

तशात प्रयोगाला जसजसा उशीर होऊ लागला, तसतसे प्रेक्षकही अस्वस्थ होऊ लागले होते. शेवटी प्रयोग आहे त्या परिस्थितीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलीच एन्ट्री चित्तरंजन कोल्हटकरांची होती. रंगमंचावरील आयत्या वेळच्या अडचणीमुळे दुसरा तिसरा नट कदाचित हेलपाटला असता; परंतु चित्तरंजननी सहज एन्ट्री घेतली आणि काही क्षणांतच प्रयोगातील ताण नाहीसा झाला. नाटक मार्गी लागले. या नाटकाने पुढे उत्तम धंदा केला आणि ‘नाटय़संपदे’ला कर्जातून बाहेर काढले. कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणे, हा चित्तरंजन कोल्हटकरांचा स्वभावच होता. ‘गारंबीचा बापू’मध्ये डॉ. काशीनाथ घाणेकरांचा ‘बापू’ लोकांनी डोक्यावर घेतला होता. घाणेकरांचा करिष्माच तसा होता. काही कारणांनी घाणेकरांनी चांगले चाललेले हे नाटक अचानक सोडले आणि निर्माते मोहन वाघांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला : डॉ. घाणेकरांच्या जागी ‘बापू’ म्हणून कुणाला उभे करायचे? या भूमिकेवर त्यांची एवढी जबरदस्त छाप होती, की त्यांच्या जागी कुणा ऐऱ्यागैऱ्याला प्रेक्षक स्वीकारणे शक्यच नव्हते. मोहन वाघांनी चित्तरंजनना या भूमिकेसाठी विचारलं.

दुसऱ्या नटाने गाजवलेली भूमिका सहसा कुणी नट स्वीकारीत नाही. कारण त्याची आधीच्या नटाशी तुलना होते आणि त्याने कितीही जीव तोडून काम केले तरी ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. पण चित्तरंजन कोल्हटकरांनी हे आव्हान स्वीकारले आणि डॉ. घाणेकरांची आठवणही येऊ न देता आपल्या पद्धतीने ही भूमिका रसिकांच्या गळी उतरविली. रंगभूमीवरील अव्यभिचारी निष्ठा हे चित्तरंजन कोल्हटकरांचे व्यवच्छेदक लक्षण होते. ते शेवटपर्यंत आपल्या ‘वरद रंगभूमी’ या संस्थेद्वारे सक्रीय होते. साठहून अधिक वर्षांच्या प्रदीर्घ नाटय़-कारकिर्दीत त्यांनी वाटय़ाला आलेल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. ‘मुद्राराक्षस’ या नाटकातील आर्य चाणक्याची भूमिकाही त्यांनी नव्या रंगभाषेच्या शोधात निघालेल्या मंडळींबरोबर तितक्याच सहजतेने केली. ‘वरद रंगभूमी’तर्फे त्यांनी आपल्या हातखंडा भूमिका असलेल्या ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’ आदी नाटकांची निर्मिती केली. शेवटपर्यंत आपल्याला रंगभूमीची सेवा करता यावी, ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार ते शेवटपर्यंत सक्रीय राहिले. या प्रवासात विष्णुदास भावे पुरस्कारासह अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालत आले. नाटय़संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. पुणे नाटय़ परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

चित्तरंजन कोल्हटकरांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांना सिनेमांतील आणि नाटकांसाठी विष्णुदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते. हिंदुत्ववादाचा वसा त्यांनी अभिमानाने मिरवला. रंगभूमीच्या भल्यासाठीच्या मागण्या घेऊन ते शासनाकडे जात आणि त्या पदरात पडेतो त्यांचा पाठपुरावा करीत. आपल्या नाटय़कर्तृत्वाने शासन दरबारी दबदबा निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मीमध्ये चित्तरंजन कोल्हटकर अग्रस्थानी होते. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांचे २५ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रशांत देसाई

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..