ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली, परंतु गाडी चालविणाऱ्या इंजिनचा हुकमाचा पत्ता स्वतःच्या हातात ठेवला होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतीय रेल्वे पूर्णपणे ब्रिटिशांनी ग्रेट ब्रिटन येथे तयार केलेल्या इंजिनांच्या आयातीवर अवलंबून होती. त्यातच दुसऱ्या महायुद्धात भारतातील रेल्वे इंजिन आफ्रिका व मध्य आशिया येथे युद्धसामग्री हलविण्यासाठी नेण्यात आली. त्यामुळे भारतीय रेल्वेचं कंबरडंच मोडलं होतं. १९४७ साली रेल्वेची इंजिनं भारतात बनविण्यासाठीचा सर्वांत पहिला कारखाना उभारला गेला. पश्चिम बंगालचे भूतपूर्व महान राजकीय पुढारी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नावाने अतिभव्य असा हा इंजिन बनविण्याचा कारखाना आणि ५००० कर्मचाऱ्यांची कुटुंब व्यवस्थित राहू शकतील असं अद्ययावत सोयी असलेलं शहर वसविण्यात आलं. एके काळी दलदल व डासांचं माहेरघर असलेल्या जागी आज घडीला रात्रीच्या काळोखात विजेच्या दिव्यांनी झगमगणारं हे छोटं शहर पाहताक्षणी चटकन् मनात भरावं असं दिमाखात उभं आहे. कारखान्याची व्याप्ती १० लाख चौरस फुटांच्या आसपास असून, मधलं मुख्य दालन १५,००० फूट लांब, २१२ फूट रुंद, ७५ फूट उंच आहे. येथे इंजिनाची संपूर्ण बांधणी होते. ९८५ तऱ्हेची यंत्रं व इंजिनाचे ५००० सुटे भाग येथे तयार होतात. ८० टक्क्यांहूनही जास्त सुटे भाग त्या जागीच बनविले जातात. अगदी मोजके भाग बाहेरून आयात केले जातात. इ.स. १९४७ मध्ये येथील सर्व बांधकामासाठी १४ कोटी रुपये खर्च आला होता. कारखान्याचं उद्घाटन कै. चित्तरंजन दास यांच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आलं होतं.
सन १९५० च्या नोव्हेंबर महिन्यात पहिलं वाफेचं इंजिन या जागी तयार झालं. त्याच्या शुभारंभाचं उद्घाटन भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झालं होतं. पुढील दोनच वर्षांत इथून ४६ इंजिनं तयार होऊन बाहेर पडली.
चित्तरंजन प्रकल्पामुळे रेल्वेला लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींत भारत स्वावलंबी झाला. परदेशी गंगाजळीत मोलाची भर पडली आणि एक आदर्श, नव्याने बांधलेलं अद्ययावत शहर म्हणून चित्तरंजनची भारतभर ख्याती झाली. रेल्वेने स्वतःची वीज तयार करण्याची जबाबदारी पूर्णत: उचलल्याने इलेक्ट्रिक इंजिनांची बांधणीही चित्तरंजन येथे सुरू झाली व भारतात इलेक्ट्रिक इंजिनांचं युग अवतरलं.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply