चिऊताई आणि मानवाचा संबंध फार जवळचा असावा. निदान आपल्या भारतीय संस्कृतीत तरी तो फार जवळ्चा आणि लिव्हाळ्याचा असल्याच जाणवत. म्ह्णूनच तर आपण चिमणी सारख्या छोट्याश्या निरूपद्रवी पक्षालाही आपल्या ताईची उपमा देतो. भारतीय सभ्यतेत ताईच स्थान हे आईच्या तोलामोलाच मानल जात हे वेगळ सांगायला नको. असं असतानाही आपली संस्कृती ज्या चिऊताईला आईच्या तुलनेच मानत आली त्या चिऊताईच अस्तित्वच आज धोक्यात असल्याच वाचनात आल आणि बरीच वर्षे विस्मरणात गेलेल्या चिऊताईची अचानक आठवण झाली. त्यामुळे आमच्या बाळ्पणीच्या आठवणीही जाग्या झाल्या. वीस-एक वर्षापूर्वी आजच मुंबईतील गोरेगांव हे खरोखरच गावासारखच होत. त्यावेळी आमच गांव आणि गोरेगांव यात आंम्हाला फारसा फरक जाणवत नव्हता म्ह्णूनच आंम्ही आमच्या गावापासून दूरावलो ते कायमचेच. त्याकाळी गोरेगावातील आमच्या झोपडीच्या आजूबाजूला बरीच मोकळी जागा होती त्याकाळी आमचा आणि निसर्गाचा फारच जवळ्चा संबंध होता. आता कोणाला खरं वाटणार नाही. पण साप, विंचू अगदी घोरपडीसारखे प्राणीही आंम्ही प्रत्यक्ष हाताळलेत. त्याकाळी संध्याकाळ होईपर्यत आंम्ही पतंग उडवत राहायचो एकदा का चिमण्यांचा थवा आपल्या विसाव्याच्या ठिकाणी जाताना दिसला की आंम्ही आमच्या पतंगाचा मांजा गुंडाळायला घ्यायचो. अंगणात पडलेले दाणे, आणि खाऊ खायला चिऊताईन येण यात आमच्यासाठी नवळ वाटण्यासारख काहीच नव्ह्त. त्यावेळी लहान मुलांनी चिऊताईला अंगणात खायला घालण आणि त्यांनी ते खाण अथवा त्यांच घरात मोकळेपणाने वावरण सार नित्याच होत.
जग धावायला लागल मग आंम्हीही त्या जगासोबत धावायला लागलो. त्या धावण्यात आंम्हाला आमच्या सख्या नातलगांचाही विसर पडला त्यात चिऊताईच स्मरण कस होणार ? आज अचानक चिऊताईच स्मरण व्हायला खास म्ह्णावं अस काही कारण घडल नाही पण आज रस्त्याने चालताना नजरे समोरून एक चिऊताई उडत जाताना दिसली बर्याच दिवसानंतर आणि मग माझ्या डोक्यात अचानक प्रकाश पडला मी मागे कधी तरी चिमण्यांची संख्या घटत असल्याच वाचल होत. मुंबईसारख्या शहरात चिमणीच दर्शन मला अपवादाने व्हावं हे माझ्या मनाला कोठेतरी टोचून गेल. काही वर्षापूर्वी मी जेंव्हा एका कारखाण्यात नोकरीला होतो तेंव्हा त्या कारखाण्यातील जेष्ठ कामगार रोज दुपारी जेवनाच्या सुट्टीत जेवण्यापूर्वी बाहेर गॅलरीच्या कटड्यावर चिऊताईसाठी भाकरीचे बारीक तुकडे ठेवत आणि चार- पाच चिमण्या ते तुकडे न चुकता टिपत. काही वर्षानंतर ते कामगार कारखाना सोडून गेल्यावर मी ते कार्य सुरू ठेवल पण नंतर मी ही त्या कारखान्याला दुरावलो आता काही महिन्यापूर्वीच मी त्या कारखान्यात पुन्हा गेलो असता मी ठेवलेला भाकर तुकडा खायला चिमण्या आल्या नाहीच पण आजूबाजूलाही दिसल्या नाहीत. पण तेंव्हा मी त्याचा फारसा विचार केला नव्हता. आता जगभरातील पन्नास देशात चिमण्या वाचविण्यासाठी चळ्वळ सुरू झालेय. आपल्या देशातही काही व्यक्तींनी आणि संस्थानी व्यक्तीगत पातळीवर कामही केंव्हाच सुरू केलय. मुंबईसारख्या शहरात शहरातील वाढत्या गगणचुंबी इमारती, कमी झालेली झाडांची संख्या, तोडलेली जंगले, वाढते सर्वच प्रकारचे प्रदूषण व इतर मानव निर्मित कारणांमूळे चिमण्यांच्या अस्तिवाला धोका निर्माण झालाय हा गोष्टीचा वेळीच गांभिर्याने विचार व्हायला हवा. चिमण्या वाचाव्यात म्ह्णून प्रत्येकाने चिमणीचा वाटा उचलायला ह्वा. मुंबईसारख्य शहरात कृत्रीम घरट्यांची संकल्पनाही पूढे येतेय त्यासाठी काही संस्था पुढे आल्या आहेत त्यांचे कौतुक करायला हवेच त्याचबराबर आपल्या मदतीचा हात त्यांनी आपली मदत मागण्यापुर्वीच पुढे सरकायला हवा.
पूर्वी आंम्ही शाळेत असताना आमच्या वर्गातील सर्वात नाजूक, सुंदर आणि गोड आवाज असणार्या मुलीला आंम्ही प्रेमाणे चिमणी म्हणायचो, आजही कित्येक प्रियकर आपल्या प्रेयसीला चिमणी म्ह्णतात. शाळेत असताना आमच्या चिमणीवरील कविता तोंडपाठ असायच्या, लहान मुलांसाठी गायल्या जाणार्या अंगाईत तर चिमणीला मानच स्थान आजही आहे. आमच्या मुंबईत राहणार्या कवींच्या कवितेतून ह्ल्ली चिमणी डोकावताना दिसत नाही. आमच्या कथांमध्येही चिमणीच डोकावण अशक्य झालयं कारण आता आंम्ही तिच्या अस्तित्वाची दखल घेणही केंव्हाच सोडलय. आता मी काढलेल्या चिमणीच्या फोटोलाही फेसबुकवर इतके लाईक का मिळाले होते हे आता माझ्या लक्षात येतय…
— निलेश बामणे
Leave a Reply