सोनाली खरे… अत्यंत मोजके चित्रपट स्वीकारून स्वत:चं वेगळेपण तिने दाखवलंय…
दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली. ‘तेरे लिये’, ‘हम जो कहे ना पाये’ या हिंदी सिनेमांत तर ‘सावरखेड एक गाव’, ‘नवरा माझा भवरा’, ‘चेकमेट’, ‘7 रोशन व्हिला’, ‘हृदयानंतर’ या मराठी सिनेमांत तिने आपला तगडा अभिनय सादर केला. सोनालीची हीच ओळख हेरून मला फोटोशूट करण्याबाबत विचारण्यात आलं होतं. या शूटसाठी सोनालीचा लुक ग्लॅमरस ठरला होता. सोनालीशी बोलून शूटनिमित्तानं आम्ही भेटायचं निश्चित केलं.
सोनालीचं फोटोशूट हे ग्लॅमरस करण्याचं निश्चित झालं असतानाच गुढीपाडव्यानिमित्ताने तिचं मराठमोळ्या लुकमध्येदेखील शूट करण्यासाठी मला विचारण्यात आलं. हे दोन्ही पेहराव विभिन्न होते आणि म्हणूनच दोन्हीची कॉस्च्युमची, मेकअप, हेअर आणि एकूणच लूकची गरज वेगळी होती. एकाच दिवशी हे दोन्ही शूट करायचे असल्याने तिला मेकओव्हर करावा लागणार होता. मराठमोळा शृंगार ते वेस्टर्न आऊटफिट अशा मेकओव्हरला सोनालीने होकार दिला आणि ठरल्याप्रमाणे आम्ही शूटच्या तयारीला लागलो.
शूटच्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही सोनालीच्या अंधेरीतल्या घरी भेटलो. घरी तिची मुलगी आणि नवरा-बिजय आनंद हे दोघेही घरातच होते. एकीकडे सोनालीची शूटसाठीची लगबग सुरू होती तर दुसरीकडे आम्ही लायटिंगच्या सेटअपच्या गडबडीत तर तिसरीकडे बिजय आनंद हे त्यांच्या कामात. बिजय आनंद हेदेखील मराठी आणि हिंदीतलं अभिनयातलं मोठं नाव. अजय देवगण आणि काजोल यांची स्टारकास्ट असलेल्या ‘प्यार तो होना ही था’ या हिंदी सिनेमात बिजय यांची मध्यवर्ती भूमिका होती. सोनालीच्या शूटदरम्यान बिजय हे सोनालीला मदत करत होते, तिला मार्गदर्शन करत होते. सोनालीचं पाहिलं फोटोशूट ठरलं ते मराठमोळ्या लूकमधलं.
सोनालीने मॉडर्न साडी परिधान केली होती. नाकात मोत्याची नथ, मोत्यांचे दागिने, हातात लाल रंगाच्या बांगडय़ांचा चुडा, त्याच्या जोडीला रंगीबेरंगी बांगडय़ा, कपाळावर चंद्रकोर टिकली, गळ्यात मोत्याचे-हिऱयांचे दागिने असा मराठमोळा शृंगार सोनालीने केला होता. हा मराठमोळा शृंगार करायला सोनालीला साधारणपणे दोन तास मेहनत घ्यावी लागली होती. या लूकमध्ये सोनालीचा मोहक चेहरा उठून दिसत होता. पाडव्याच्या निमित्तानं हे शूट होत म्हणून यासाठी गुढी उभारून सोनाली गुढीचं पूजन करतेय अशी थीम ठेवण्यात आली होती. या लूकमध्ये सोनालीचं पाहिलं फोटोशूट आम्ही केलं. या शूटसाठी आम्हाला साधारण अर्धा-पाऊण तास लागला. यानंतर मेकओव्हर करून वेस्टर्न लूकमधल्या शूटच्या तयारीला आम्ही लागलो.
वेस्टर्न लूकसाठी सोनालीने वनपीस निवडला होता. पांढऱया रंगाचा वनपीस त्यावर मॉडर्न ज्वेलरी, मोकळे सोडलेले केस, हातात बांगडय़ांऐवजी ब्रेसलेट, कानात हिऱयाचे दागिने अशा मॉडर्न पेहरावात सोनाली कमालीची सुंदर दिसत होती. या लूकमध्ये तिचे काही फूल लेन्थचे फोटो आम्ही आधी टिपले. नंतर सोफ्यावर बसलेल्या सोनालीच्या काही दिलखेचक अदा मी कॅमेराबद्ध केल्या. पारंपरिक वेशभूषा साकारायला सोनालीला दोन तास लागले होते. मात्र या वेस्टर्न लुकसाठीच्या तयारीला तिला फार वेळ लागला नाही. पुढे हे शूट पुन्हा तासभर चाललं आणि शूटअंती मला कॅमेराबद्ध करता आली ती पारंपरिक वेशभूषेतली मराठमोळी सोनाली आणि तिला विरोधाभास ठरेल अशी वेस्टर्न लूकमधली मॉडर्न सोनाली.
या शूटनंतरही सोनालीचं फोटोशूट करायची संधी मला अनेकदा आली. मात्र एकाच दिवशी केलेल्या मेकओव्हरमुळे सोनालीचे हे दोन्ही लूक मला जास्त आठवणीतले आहेत. या शूटदरम्यान सोनालीसोबत मनमुराद गप्पा झाल्या. या वेळी सोनालीचा गुहागर ते डोंबिवलीचा प्रवास तिने सांगितला. यानंतरचा मुंबईपर्यंतचा प्रवासदेखील तिने उलगडून सांगितला. मूळची डोंबवलीकर असलेल्या सोनालीने अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहेच.
परंतु अभिनयासोबत शास्त्रीय संगीत आणि कथ्थक या दोहोंवरही सोनालीची चांगलीच पकड आहे. या दोन्हीत उपांत्य विशारदपर्यंतचे तिचे शिक्षण झाले आहे. सोनाली मोजके सिनेमे करते. त्याबाबाबत ती चोखंदळ आहे आणि म्हणूनच वर्षाकाठी एक वा दोन-तीन वर्षांतून एक असंच तिचं काम पाहायला मिळतं. सिनेमा निवडताना त्याची पटकथा, त्यातली तिची भूमिका, सोबतचे कलाकार आदी सर्व बाबी ती निरखून घेते. तिच्या याच सिनेमा निवडण्याच्या स्वभावामुळे सोनालीकडे सिनेमांची रीघ लागत नाही हे जरी खरं असलं तरीही दुसरीकडे तिने निवडलेल्या मोजक्या सिनेमांतील तिची भूमिका चोख पार पाडण्यासाठी ती विशेष मेहनत घेते आणि त्यात तिला यश येत हे वेगळं सांगायची गरज नाही.
— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply