इलाहाबाद चा अमिताभ गंगा किनाऱ्यावरील छोरा म्हणून स्वतःची टिमकी वाजवतो. काल त्याला भुसावळच्या नितीनने बरौनीच्या गंगाकिनारी जाऊन आव्हान दिले.
बिहारच्या आदरातिथ्याच्या शेवटच्या टप्प्यात कलकत्त्याच्या संदीप, भुसावळच्या नितीनला घेऊन गेला पुरातन सीमारीया घाटावरील मंदिरात ! रात्रीचे भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटप झाल्यावर तिथल्या महंतांनी विचारले- ” कौन गाँव देवता ? ”
मी माझा परिचय करून दिला आणि येण्याचे प्रयोजनही सांगितले ! त्यांनी उंबरठ्यावरील मला, गाभाऱ्यात बोलाविले. त्यांच्या ” सर्वमंगला अध्यात्म योग विद्यापीठ आणि स्वामी चिदात्मन वेद विज्ञान अनुसंधान संस्थान ” या संस्थेचे देववस्त्र आणि नूतन वर्षाची दिनदर्शिका तसेच ” दिव्य चक्षू ” या त्रै मासिकाचा अंक देऊन माझा सत्कार केला.
गंगेइतकाच हा प्राचीन आणि जगप्रसिद्ध घाट. लाखोंची गर्दी असते इथे सणासुदीला. नव्या “गंगा क्रूझ ” चा पाचवा पडाव या घाटावर असणार आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार या परिसराच्या पुनरुत्थानासाठी कंबर कसून सज्ज झालंय.
६४ योगिनींचे मंदिर बघितले. मध्यभागी रुद्ररूपातील काली माता आणि सभोवतालच्या भिंतींवर ६४ मूर्ती ! येथील मंदिरात ३६५ दिवस होम चालतो, ते प्रशस्त कुंडही महंतांनी दाखविले. रोज सकाळ-संध्याकाळ १००-२०० व्यक्तींना अन्नदान (“भोग”) केले जाते. ६४ योगिनी मंदिर तीन कलाकुसरींचे आहे- रचना शास्त्राच्या दृष्टीने पाया स्त्री-रूप (मला कळले नाही, स्थापत्य शास्त्र -कृपया मदत करावी), मध्यभाग पिरॅमिड सारखा आणि कळस -कमळाकृती ! यंदा कार्तिक मासात “अर्धकुंभ ” भरणार आहे, त्याचे गंगेच्या वतीने महंतांनी मला निमंत्रण दिले.
बाहेर येऊन खूप वेळ मी तिच्या पात्राकडे बघत उभा राहिलो.
ती म्हणाली – ” मागील आठवड्यात धुक्याच्या दुलईत मी गुरफटले होते म्हणून आपली दृष्टिभेटही झाली नाही आणि तू रुसलास. आता निवांत सान्निध्य जगू या. अरे, मी असतेच सदैव तुझ्याबरोबर! भुसावळला तू मला “तापी ” म्हणतोस, सांगलीत मी “कृष्णा “असते आणि इथे मला सगळे “गंगामैय्या ” म्हणून लडिवाळ हाक मारतात.(मंदिरातील महंतांनी तिला आदरपूर्वक “महारानी” संबोधिले.)
नद्या आम्हां भारतीयांची सतत संगत करीत असतात.
जवळच एक राम मंदीर आहे. महंत म्हणाले- तिथे दरवर्षी प्रभू रामांचा सीता मैय्यांशी विवाह सोहोळा संपन्न होतो आणि परिसर भरून वाहतो भक्तांनी!
श्रद्धांची खोलवर रुजलेली मुळं असं आपलं जीवन संपृक्त करीत असतात.
थोड्या वेळापूर्वी “कायदा आणि सुव्यवस्था ” बिघडलेला बेगुसराय भाग मी पाहिला होता. सहा लाख लोकवस्ती असलेला हा जिल्हा- ज्या गांवात आजही ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत, रस्त्यावर पार्कींगचे बोर्ड नाहीत, कोठेही वाहने अस्ताव्यस्त लावलेली, रॉंग साईडने आमचा वाहनचालकही सर्रास गाडी मारत होता. प्रकाश झाने “अपहरण ” या चित्रपटाची स्फूर्ती याच गावांवरून घेतली म्हणे. आजही तेथे आठवड्याला किमान एखादी खंडणीची केस असते.
त्याच्या विपरीत हा सीमारीया घाट- खऱ्या अर्थाने संस्कृती रक्षक !
गंगेवर एक ७० वर्षे पुराणा दुमजली पूल आहे- खालून रेल्वे आणि वरच्या टप्प्यातून हलकी वाहने ! सांगलीच्या आयर्विन पुलासारखेच आयुष्य संपत आलेल्या या पुलावर जड वाहनांना बंदी आहे. शेजारी अवाढव्य नवा पूल -शापूरजी आणि ऍफ्कॉन्स मिळून बांधताहेत. मग हा पुराणा पूल पाडला जाणार आहे.
जीवनचक्र पूलालाही चुकत नाही.
गंगेच्या ऋतुचक्राबद्दल मी संदीपला विचारले.
तो म्हणाला- ” बाढ आली की तिच्या रुपाकडे बघवत नाही. सगळे घाट पाण्याखाली असतात. म्हणूनच बहुधा ही मंदीरे काहीशा उंचीवर आहेत. आमच्या कंपनीत पुराचे पाणी शिरू नये म्हणून आम्ही जागोजागी भिंती बांधल्या आहेत.”
नदीला सृजनाचे आणि प्रलयाचे दोन्ही खेळ आवडतात. ती लक्ष्मी असते, माँ दुर्गा असते आणि कालीमाताही. आपण तिच्या प्रत्येक दर्शनावर वेडावून जातो कारण ती तिचे वस्त्र खांद्यावर टाकून माझ्यासारख्याचा सत्कारही करते.
आजकाल स्वतःला काही हवंय, स्वतःसाठी काही मागावं असं मला कां वाटत नाही, याचं उत्तर काल मिळालं – सगळंच तर असं आपसूक पदरात येऊन पडतंय !
डोळ्यांतील निर्मम गंगा लपवत मी बरौनीचा निरोप घेतोय.
(बिहार डायरी- अंतिम पृष्ठ : मु पो बरौनी /बेगुसराय )
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply