शाळेच्या व मित्रांबदद्लच्या आठवणी किती म्हणून सांगाव्या ..?अजूनही मागे शिल्लक राहतात.सारं आपलं बालपण हे शाळेभोवती गुंफलेलं असतं…शाळेत भेटलेले मित्र,त्यांच्याशी केलेली मैत्री सारं आठवतं…त्यामुळे आपल्यात आलेलं धाडस ,आल्या प्रसंगाला तोंड देणं यातून खूप काही शिकायला मिळतं.आपल्या चुकांमधून हळूहळू शिकत असतो आपण.
एक प्रसंग अजूनही लख्खं आठवतो. आमचं घर म्हणजे बुरूजाचा वाडा असला तरी खेळण्यासाठी मात्र खाली यावं लागायचं.सर्व मित्र खाली रहात होते,अर्थात माझा अधिक वेळ हा वाड्याच्या खालीच खेळण्यात जायचा.साधारण दुसरी -तिसरीत असतांना मला मित्रप्रेमापोटी शेतात ढाळ्या-वाळकाचं आमत्रंण आलं.. ढाळे म्हणजे टहाळ…क्षणात होकाराचा निर्णय देऊन टाकला.अशा कामाला कधी आमची दिरंगाई नसायची.दांडग्या निर्णयक्षमतेमुळेच की काय आम्हाला आमच्या आई-बाबा कडून संपूर्ण स्वातंत्र्य होतं.त्यांना आमच्या अभ्यासाचीही फारशी काळजी नव्हती….आत्ताच्या काळातल्या पालकांसारखी.
माझा राम नावाचा मित्र खूप जिगरी होता.खरं तर रामला नेहमीच शेताला काही कामानिमित्त जावं लागायचं आज शाळेला सुट्टीच म्हणून त्यानं आज मला मित्र म्हणून सोबत बोलावलं इतकंच.याला मित्रप्रेम म्हणावं की, एकट्याला जायला भिती वाटत होती म्हणून सोबत घेतलं म्हणावं का मला ढाळे-
वाळकं खायचे म्हणून असो….हे नक्की सांगता येत नाही…?नेहमी प्रमाणे मी घराबाहेर पडलो. राम तयारच होता.त्याला शेताचा रस्ता माहित होता.शेत आमच्या एका विठा मावशीचंच पण ते रामाच्या बाबानं वाट्यानं केलेलं होतं…मनात होते चार दोन ढाळे वाळकं घेतले की लवकरंच परत येऊ . मी घरी काहीच सांगितलेलं नव्हतं.तसं सांगायचा काही शिष्टाचार ही नव्हता.कारण भूक लागली तर आणि रात्री झोपायलाच फक्त आम्ही घरी बाकी इकडे तिकडे खेळ चालू असायचे.खेळत बागडत पायवाटेने आम्ही निघालो.रामच्या लिंबाच्या वावरात आम्ही बरेचवेळा जायचो, जवळ होतं ओढा ओलांडला की लगेच लिंबाचं वावर..पण आज हे जात असलेलं शेत खूप दूर आहे याची कल्पना चालतांना येत होती.किती तरी वेळ आम्ही भरभर चालत होतो,दम लागत होता.
सारा पायवाटेचा रस्ता.तोही उंच उंच हिरव्यागार ज्वारीच्या शेतातून..मनातून घरी कोणालाच न सांगता आल्याची भिती सारखी वाटत होती.मित्र बिनधास्त होता.त्याला भिती नव्हती कारण त्याचं सर्व कुटुंबच तिथं शेतात होतं…मध्येच ज्वारीच्या शेतातून चालतांना मित्र दिसेनासा झाला की मनात प्रचंड भिंती वाटायची…पळत निघायचं..बोलत रहायचं.. ..मग बरं वाटायचं.मध्येच करडीचे पाटे घातलेले असायचे,अंगात चड्डी असायची त्यामुळे पायावर करडीचे काटे ओरखडायचे.. हरब-याची आम पायाला लागायची…अन् चुणचुण व्हायची ..थांबून पायावर थोडं हात फिरवावा वाटायचा पण मित्र पुढे निघून जाईल याची भिती पण असे.मध्येच उडणा-या चिमण्या कणसांवर बसून दाणे टिपत असलेल्या दिसत होत्या.शेतात मळे घातलेले दिसत होते.मळा म्हणजे गोफणीने पाखरं उडवण्याकरिता केलेला उंच मांडव.त्यावर बसलं की सर्व शेत दृष्टीक्षेपात येतं मग पाखरं राखायला सोपं व्हायचं.पहाटेच आरोळ्या सुरु व्हायच्या अन् गोफणीतून गुंडे सुटायचे.हे दृष्य असायचं जागोजागी.
एवढ्या दूर मित्रांसोबत येण्याचा पहिलाच प्रसंग होता माझा.मग काय..? हा हा म्हणता शेत आलं…झाडाखाली सर्वजण बसलेले होते. आम्ही तिथे बसलो..एखादा पाहुणा घरी आल्यावर आपण जसे आपुलकीने विचारपूस करतो तशी तिथल्या सगळ्यांनी विचारपुस केली..पाणी पिलं…बाकी त्यांच्या घरची मंडळी लगेच कामाला लागली..आम्ही मित्र ढाळे वाळकं खात- खात गप्पा मारत मस्त खेळत होतो…समोरचं वावर देईदूचं होतं,देविदास असं म्हणण्याची पध्दत नव्हती.तिथून ढाळे आणून आपल्या शेतात बसून खात बसलो..याचं गुपित रामनं सांगितलं…आपल्या शेतातले ढाळे त्यामुळे पार होत नाहीत हे बालबुद्धीचं व्यवहारी लाॅजिक तेंव्हा उमगलं…बराच वेळ झाला.सगळं फिरुन झालं,खेळून झालं,अन् खाऊनही झालं…आता मी रामला म्हणत होतो,चल आपण आता घरी जाऊ…तो म्हणाला थोडं थांब..सगळ्यांचं काम झालं की जाऊ… बसायला बैलगाडी आहे…मनात खूप भिती वाटत होती…नरडं कोरडे पडलं होतं…तहान लागली होती,भिती पण वाटत होती. आणलेलं सर्व पाणी संपलं होतं.जवळपास कुठेच पाणी नव्हतं मग रामनं युक्ती दिली …वाळूक खाल्लं की तहान भागते..वाळूक कडू का गोड ओळखण्यासाठी वाळकांचा देठ चावायचा…महूर वाटलं तरंच तोडायचं…कडू नसलेलं वाळूक म्हणजे महूर..हा शब्द तेंव्हा समजला..भूकेला ढाळे अन् तहानेला वाळूक असं संध्याकाळ पर्यंत आमचं चाललं होतं…काम काही संपत नव्हतं..अन् कोणीही निघत नव्हतं…मला राहून राहून..घर ,आई, बाबा डोळ्यासमोर दिसत होते..राम काही निघायचे नाव घेत नव्हता.एकट्याने परत जाणे शक्य नव्हते.माझी अवस्था त्याला कळत होती..त्यात त्याचा नाईलाज होता.. वाट पाहता पाहता..दिवस मावळला..बैलगाडीत एक एक पसारा भरला जात होता..चला सुटलो..आता निघतील म्हणून बसलो खरे पण सगळी बैलगाडी वाळकाच्या वेलांनी भरायला संध्याकाळ झाली..आमचा पूर्ण दिवस शेतातच गेला,मी रडायचाच बाकी राहिलो होते..कधी एकदा घरी जाईल असे वाटत होते.इकडे आमच्या घरच्यांनी माझ्याबद्दल विचारपूस चालू केली..आई ,तीन बहिणीची वाड्यात विचारपुस सुरू होती. तर बाबा आणि आमचे दोन गडी,एक गुराखी सर्वजण बॅटरी घेऊन गावात वेगवेगळ्या दिशेला फिरत होते..काही केल्या कोणाबरोबर गेला..?कुठे गेला…?कळत नव्हते त्यामुळे सर्व चिंताग्रस्त…इकडे वाळकांच्या वेलाने भरलेल्या बैलगाडीवर बसून आम्ही निघालो होतो..पुर्ण अंधार पडला होता..मी मात्र हिरमुसला होऊन अंधारात पाहत होतो.काही अंधूक खुणा दिसत होत्या. उंच ओळखीची झाडं पाहत गाव कधी येईल याची वाट पहात होतो..गाडी हळूहळू निघाली होती..जसे जसे गाव येऊ लागले तसे तसे मन घराकडे झेप घेऊ लागले..एकदाची गाडी शिवाजी पुतळ्यापाशी येऊन थांबली..वेलावरुन उडी मारुन कुणाकडेही न बघता मी वाड्याकडे झपsझप निघालो..समोरुन दोन -तीन बॅटरीचा उजेड माझ्यावर आला..मग आमचा गडी, बापूराव जवळ आला…त्यानं मला हाताला धरलं..पाठीमागून बाबा,दुसरे दोन-चार जण आले..वाड्यात एकट्याला जायची भिती वाटणार होती पण आता एवढे सगळे असल्यावर तो प्रश्न नव्हता..आता भिती होती बाबाची..न सांगता गेल्या मुळे, त्यांना सर्वांना काळजीत टाकल्यामुळे.. मिळणा-या माराची… बाबांचा मार भयंकर असायचा.घरी आल्यावर सगळ्यांना आनंद झाला..गेल्या गेल्या जेवायला बसवलं गेलं..मनात भिती तीच…जेवण झाल्यावर होणा-या हजरीची.आमचे बाबा रागात होते ,आता आपलं काही खरं नाही…बाबांच्या माराची मला कल्पना होती..पण आमचा बापूराव गडी भारी प्रेमळ. माणूस,आमची आजी तशीच तेच मदतीला धावून आले.माझा त्या दिवशीचा मार वाचला..मला खूप अपराध्याप्रमाणे वाटत होतं.आपली चूक कळून आली होती.असेच प्रसंग शाळेतल्या धड्याप्रमाणे काही तरी शिकवून जातात.
— संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०
Leave a Reply