कधी तिचा “चुकतो अंदाज”… आणि तांदूळ होतात जास्त
दुसऱ्या दिवशी सगळे करतात … फोडणीचा भात फस्त
कधी त्याचा “चुकतो अंदाज”… आणि गाडी रिव्हर्स घेतो जरा
पण कुठेतरी काहीतरी घासतंच.. अन काळजावर पडतो चरा
कधी दोघांचा “चुकतो अंदाज”… आणि रिपोर्ट देतात “गुड न्युज”
परिवार वाढवण्यासाठी त्यांना …आता कुठलंच नसतं एक्सक्युज
कधी तज्ज्ञांचा “चुकतो अंदाज”… आणि देतात पावसाचा इशारा
तो ही बरसतो मुसळधार…. मात्र १०-१२ दिवस उशिरा
कधी सगळ्यांचा “चुकतो अंदाज”… आणि सिनेमा कमावतो “किरकोळ” गल्ला
तर टुकार टुकार वाटणारा सुद्धा…. गाठतो १०० कोटींचा पल्ला
कधी मुद्दाम “चुकवतो अंदाज”… आणि घालवतो आपलाच वजीर
मुलांकडून “चेकमेट” होण्यासाठी .. बाबा नेहमीच आनंदाने हाजीर
कधी घरच्यांचा “चुकतो अंदाज”… आणि नाव काढतात नापास कार्टी
आवडीच्या क्षेत्रात यश मिळवत… देतात जंगी सक्सेस पार्टी
कधी स्वतःचाच “चुकतो अंदाज”… आणि आपल्या जवळचेच जातात दूर
कठीण प्रसंगी सोबत असणाऱ्यांशी… जुळतात नव्या नात्यांचे सूर
कधी सगळेच “चुकतात अंदाज”… आणि विस्कटते आयुष्याचीच घडी
पुन्हा उभं रहाण्यासाठी बळ देते.. नियतीनी सणसणीत मारलेली छडी .
प्रत्येक “चुकलेला अंदाज”… नेहमीच जातो काहीतरी शिकवून..
कधी वाढते अनुभवाची शिदोरी .. किंवा नवीन संधी येते धावून
असतात असे “चुकलेले अंदाज”… म्हणून आयुष्याचा ECG राहतो हलता ..
जर “चढ उतार”च नसतील त्यात .. तर प्रसंग ओढवेल ना भलता
“चुकूच नयेत अंदाज” यासाठी….आपण कायमच राहू दक्ष
सुरळीत असलं सगळं तरीही….. करू नकोया विचलित लक्ष
पण “चुकून” …
“चुकलाच जरी अंदाज” …तरी जाणार नाही खचून
“चुकलाच जरी अंदाज” …तरी जाणार नाही खचून
गमावलं असेल काही ….तर ते घेऊ पुन्हा वेचून
भंगलं असेल काही….. तर ते नक्कीच येईल सांधून
मार्ग सापडेल पुन्हा एकदा …नव्याने अंदाज बांधून
मार्ग सापडेल पुन्हा एकदा …नव्याने अंदाज बांधून
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply