“मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वैविधता आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यातही अनेक टप्पे म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान, कौटुंबिक, तमाशा किंवा नृत्याची पार्श्वभूमी लाभलेले चित्रपट झळकत राहिले. अॅक्शनपटांनी आपली ताकद दाखवली. हा ट्रेंड आपल्याकडे ख-या अर्थाने रुजला गेला ८०च्या दशकात. विशेष म्हणजे अशा अॅक्शनवर आधारीत सिनेमांमध्ये काही स्त्री कलाकारांनी मध्यवर्ती भुमिका साकारल्या. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव होतं सुषमा शिरोमणी यांचं. दमदार अभिनय, वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैली आणि सुमधुर आवाज या बळावर रुपेरी पडद्यावर स्वत:ची अनोखी ओळख निर्माण करत त्यांच्या रुपानं मराठी चित्रपटाला मिळाला एका डॅशिंग अभिनेत्रीचा चेहरा. “भिंगरी”,”मोसंबि नारंगी”,”फटाकडी”,”गुलछडी”,”भन्नाट भानु”,”बिजली”; तर “प्यार का कर्ज”,”कानून” यासाख्या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केलं. निर्मिती, दिग्दर्शन, कथा व पटकथा लेखन तसंच वितरणाची जबाबदारी पार पाडत सुषमाजींनी चित्रपटातलं आपलं स्थान तर बळकट केलंच, शिवाय निर्माती म्हणून आपण या इंडस्ट्रीतल्या कलावंतासाठी काय काय करु शकतो यासाठी “इम्पा”च्या माध्यमातून त्या सक्रीयरित्या कार्यरत होत्या व आहेत. तसंच अनेक चित्रपट संस्थांवर सल्लागार सदस्य म्हणून सुषमाजींनी काम पाहिलं. पण त्यांचा कारकिर्दीचा रुपेरी प्रवास कसा आणि केव्हा सुरु झाला, चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि तेव्हाच्या अनुभवांविषयी आम्ही जाणून घेतलं, “मराठीसृष्टी.कॉम”ला त्यांनी दिलेल्या “एक्सकलुझिव्ह” मुलाखतीतून…
प्रश्न: रुपेरी पडद्यावर नायिका म्हणून कधी, केव्हा पदार्पण केले ?
सुषमा शिरोमणी: अगदी शाळेत असल्यापासून मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. सुरुवातीला मी कथ्थक नृत्य करत असल्यामुळे त्या अनुषंगाने मला भूमिका मिळाल्या. पण चित्रपटात भूमिका मिळाली ती ‘दाम करी काम’ या चित्रपटापासून. त्यानंतर ‘काका मला वाचवा’ , ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ या चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या. खूप वेळा असंही झालं की मला नाकारण्यात आलं. त्यामुळे काम मिळायचं नाही. ‘दाम करी काम’ हा काही प्रमाणात नृत्यावर आधारीत असल्यामुळे, व त्यातील भूमिका माझ्या व्यक्तीमत्वाला शोभणारी असल्यामुळे नायिका म्हणून तो माझा पहिला चित्रपट म्हणता येईल. याशिवाय मी निर्माती झाले हा देखील एक योगायोग होता. एका गृहस्थांनी चित्रपट निर्मिती करण्याचं ठरवलं. पण ते स्वत: या प्रोजेक्टमधून बॅक आऊट झाले. आणि मी व माझे कुटुंबिय काहीसे अडचणीत सापडलो. आणि तो चित्रपट होता ‘तेवढं सोडून बोला’. ज्यामध्ये माझी देखील भूमिका होती. हा चित्रपट पूर्ण करण्याचं आव्हान मी स्वीकारलं. पण तो चित्रपट काही फारसा चालला नाही. म्हणून आम्हाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्याच वर्षात राज्यशासनाची चित्रपटांसाठी अनुदान योजना सुरु झाली. आणि मग मी ‘भिंगरी’ हा चित्रपट निर्मित करण्याचं ठरवलं. चित्रपटाचं कोणतंही ज्ञान नसताना किंवा तशी पार्श्वभूमी नसताना हा चित्रपट मी पूर्ण केला. व तो गाजला देखील. अशाप्रकारे नायिका म्हणून मला ख्याती मिळाली. त्यानंतर ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारंगी’, ‘गुलछडी’, ‘भन्नाट भानू’ यासारखे चित्रपट माझे प्रदर्शित झाले, ज्यामध्ये मी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या.
प्रश्न: तुम्ही जेव्हा या क्षेत्रात पदार्पण केलं, तेव्हा तुमच्या कुटुंबियांचा पाठिंबा कशाप्रकारे होता ? म्हणजे शिक्षणाकडे दुर्लक्ष वगैरे होईल यामुळे विरोध झालेला का ?
सुषमा शिरोमणी: शिक्षणाची तर प्रचंड आवड होती. पण घरची परिस्थिती थोडी बेताची होती. त्यामुळे काम करण्यासाठी तसा काही विरोध झालेला नव्हता. ‘तेवढं सोडून बोला’ चा कटू अनुभव गाठीशी असला तरी सुद्धा ती चूक आमच्याकडून मुद्दामून निर्माण झालेली नव्हती. याचं भान त्यांनादेखील होतं. त्याशिवाय घरात लहान भावंडं होती मग त्यांच्या शिक्षणासाठी व अर्थार्जनासाठी काम तर करावंच लागायचं. आणखी एक खासियत माझ्यामध्ये होती ती नृत्याची. त्यामुळे स्टेज शोज् आणि चित्रपटात नर्तिकेची कामं मला मिळत गेली. पण आजही माझ्या घरच्यांचा या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणताच विरोध नाही. उलट पाठिंबाच आहे.
प्रश्न: तुम्ही ज्या चित्रपटांमध्ये कामं केली त्यांची नावं स्त्रीलिंगी स्वरुपाची होती.
सुषमा शिरोमणी: हो, याचं कारण म्हणजे मला असं वाटलं की स्त्रिला प्राधान्य देऊनच आपल्याला तशा भूमिका साकारायच्या आहेत. त्यांचा आवाज बनूनच आपल्याला काम करायचं आहे. मग चित्रपटांची शीर्षक जोपर्यंत स्त्रिलिंगी नसतील तर कळणार नाही की विषय काय आहे. आणि त्याआधी जे चित्रपट आपल्याकडे बनले ते बहुधा पुरुषप्रधान होते. स्त्रियांच्या जीवनावर आधारीत असे खूप कमी सिनेमे आपल्याकडे बनलेले दिसतात. लावणीप्रधान चित्रपटांमध्ये स्त्री व्यक्तीरेखेचं स्थान मर्यादीत होतं. ऐतिहासिक चित्रपट असतील तर त्या विशिष्ठ कॅरेक्टरभोवती फिरायचे. नाहीतर स्त्रीप्रधान चित्रपट कुठेच नव्हते. तो ट्रेंड मी आणण्याचा प्रयत्न केला.
प्रश्न: कथालेखन, दिग्दर्शन त्याशिवाय तुमच्या चित्रपटांमध्ये दिसणारे अॅक्शन सिन्स् या सर्व भूमिकेतून तुम्ही वावरलात. तर याचं प्रशिक्षण तुम्ही कोणाकडे घेतलंत ?
सुषमा शिरोमणी: मी मुळात कथ्थक नृत्यांगना. आणि नृत्य म्हटल्यावर एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. मग त्यातून स्टॅमिना बिल्ट अप होत असतो. त्यामुळे मी विविध प्रकारच्या कसरती करु शकले. त्याशिवाय जिम्नॅशियम, ड्रायव्हींग, पोहणं असेल, या सर्वांची आवड कुठेतरी होती आणि सवयदेखील. याचा फायदा मला अॅक्शन सिनेमात काम करताना झाला. आजपर्यंत जी काही अॅक्शन तुम्ही पाहिलीत, ती मी स्वत: स्पॉटवर डायरेक्ट केलेली आहे. ती अनुभवातून मिळालेली आहे. त्यासाठी विशेष कोणतं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. कथालेखनाचं म्हणाल तर पहिल्या निर्मितीच्या वेळीच सर्वच जबाबदार्या माझ्यावरती होत्या. मग कथेची निर्मिती कशी करायची हा प्रश्न माझ्यासमोर होता. त्याकाळात रेडिओ हे एकमेव माध्यम होतं. त्यावरुन श्रुतिका प्रसारीत व्हायच्या. त्यातून मी प्रेरणा घेतली आणि कथा रचायला देखील सुरुवात केली.
प्रश्न: तुम्ही चित्रपटांमध्ये नेहमी डॅशिंग हिरॉईनची भूमिका साकारत आलेला आहात. तर कुठेतरी या सर्व भूमिका तुमच्या व्यक्तीमत्वाशी निगडीत आहेत असं वाटतं का ?
सुषमा शिरोमणी: हो, काही प्रमाणात तरी. कारण मला अन्याय सहन होत नाही. जर अन्याय झाला तर मी त्या विरोधात आवाज उठवते. आणि माझ्या व्यक्तीमत्वातला हाच पैलू माझ्या चित्रपटातील भूमिकांमधूनदेखील माझ्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला, असं मी म्हणीन.
प्रश्न) मधल्या काळात तुम्ही रुपेरी पडद्यापासुन ब-याच लांब होतात, यामागचं नेमकं कारण काय ?
सुषमा शिरोमणी- याचं कारण म्हणजे मी समाजकार्यात गुंतले होते. त्याशिवाय “इम्पा” या चित्रपट संस्थेशी माझा संबंध आला होता. अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्थाच्या समितीवर सदस्य त्याचप्रमाणे अध्यक्ष पदावर मी होते. मधल्या काळामध्ये काही सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण कसं आहे की एकाच वेळी अनेक कामं करणं शक्य नसतं, त्यामुळे माझा फोकस हा त्या कामावर होता.
प्रश्न) “इम्पा” च्या पदावर कार्यरत असताना तुम्ही कोणते ठोस निर्णय घेतले ?
सुषमा शिरोमणी- मला सुरुवातीला या क्षेत्राशी निगडीत अशा कोणत्याच बाबी माहित नसल्यामुळे, मी त्या काळात फक्त मराठी चित्रपटांवर फोकस करत होते. त्यावेळी मंडोई म्हणुन एक गृहस्थ होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे मी खरंतर या पदापर्यंत येऊ शकले. तेव्हा आणखीन एक बाब माझ्या समोर आली ती म्हणजे, आपल्या कलाकरांच्या प्रश्नांसाठी बोलणारं असं कोणीच नाही. शुटींगच्या वेळी जर काही अडचणी निर्माण झाल्या किंवा त्यासंबंधीचे विषय असतील. चित्रपटांची पायरसी हा एक प्रमुख मुद्दा आम्ही हाताळला. त्यासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची आम्ही भेट घेतली. आज जो आपल्याकडे पायरसी कायदा अमलात आला तो माझ्या कार्यकाळात मंजूर झाला आहे, त्यासाठी मी लढा दिला आहे.
प्रश्न) तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये देखील कामं केलीत, तर हिंदीसाठी किंवा उर्दू शिकण्याच्या दृष्टीने तुम्ही कशा पध्दतीने मेहनत घेतली होती ?
सुषमा शिरोमणी – मी खुपच लहान वयापासून चित्रपटांमध्ये कामं करायला सुरुवात केली. त्यावेळी अनेकदा काय व्हायचं की शुध्द व स्पष्ट बोलताना काहीशा अडचणी जाणवायच्या. त्यामुळे ब-याचदा मी चेष्टेचा विषय बनायचे. काही जणांनी मला भाषेतले बारकावे समजून सांगितले. पण कळायचं नाही. कारण त्या भाषेचं ज्ञानच नव्हतं. त्यासाठी मी उर्दूचं प्रशिक्षण घेतलं. अगदी आठवी इयत्तेपर्यंतची उर्दू पुस्तकं ,तसंच अनेक विषयांवरील उर्दू साहित्याचं मी वाचन केलं.
प्रश्न) कोणता असा रोल आहे की तुम्हाला साकारायला आवडेल ?
सुषमा शिरोमणी – असं काही सांगता येणार नाही कारण कोणत्यातरी भूमिकेचं नाव घेऊन किंवा उदाहरण देऊन त्यांचा दर्जा मी का कमी करायचा ? तरी सुध्दा एखादा अनोखा रोल माझ्या वाट्याला आला, नविन विषय असेल तर तो मी करेन आणि मला ती भूमिका साकारायला आवडेल
प्रश्न) तुम्ही नव्याने चित्रपट निमिर्तीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहात, तर तुमचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते ?
सुषमा शिरोमणी – हो, चित्रपटांची निमिर्ती करण्यासाठी मी पुन्हा एकदा सक्रीय होतेय. फक्त चित्रपट नाही तर मराठी, हिंदी मालिकांची निर्मिती करण्याचं मी ठरवलंय. लवकरच माझा एक मराठी चित्रपट आपल्या भेटीला येईल. आणखीन एक सांगते, जो विषय आजपर्यंत आपल्याकडे पहायला मिळाला नाही अशा चित्रपटाची निमिर्ती मी केली आहे.
प्रश्न) दिवाळीची एखादी आठवण जी तुम्ही “मराठीसृष्टी.कॉम”च्या वाचकांसोबत शेअर करु इच्छीता ?
सुषमा शिरोमणी – दिवाळी सणाला आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे असं मी मानते. कारण या सणात धनाची पुजा होते, बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक यामध्ये आहे, माया, भावना व नात्यांचे बंध दृढ करण्याची ताकद या सणात दडली आहे. इतकी सगळी वैशिष्ट्य असल्याने दिवाळी हा माझा देखील आवडता सण आहे.
— सागर मालाडकर
Leave a Reply