बॉम्बे टू गोवा चित्रपट ३ मार्च १९७२ला प्रदर्शित झाला. हा तमिळ चित्रपट मद्रास टू पोन्डेचरी ह्या १९६६मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून घेतला होता. चित्रपट मेहमूदचा भाऊ अन्वर अली व अमिताभ बच्चन यांना मोठा ब्रेक देण्यासाठी तयार केला. त्यावेळी अमिताभ बच्चन हिंदी चित्रपट सृष्टीत चाचपडत होता. अमिताभ ११ महिने मेहमुदच्या आउट हाउस मध्ये राहिला होता. अमिताभ त्यावेळी पडेल नट होता म्हणून कोणतीच नावाजलेली नटी त्याच्या बरोबर काम करायला तयार नव्हती, ज्या पुढे त्याच्या बरोबर काम करण्यासाठी जीव टाकू लागल्या. मेहमूदने हिरोईन म्हणून अरुणा इराणीला घेतले. तीने सुद्धा पहिल्यांदा आढेवेढे घेतले, पण मेहमूदने समजावल्यावर ती तयार झाली. तीच गोष्ट किशोरकुमारची, तो सुद्धा आधी गायला तयार नव्हता, पण मेहमूद आणि आर.डी.बर्मन यांनी समजावल्यावर तोही तयार झाला. नुसताच तयार झाला नाही तर चित्रपटात किशोरकुमार हि भूमिका करून एक गाणे सुद्धा गायले. ह्या चित्रपटात भरपूर विनोदी नट होते. मुळात मेहमूदने ठरवले होते कि शुटींग अंधेरीच्या आपल्या घरापासून बसने गोव्याच्या रस्त्यावर करायचे, पण जास्त व्होल्टच्या लायटिंग मुळे बसला आग लागली. म्हणून त्याने बसच्या आतील शुटींग मद्रास यथे स्टुडिओत केले व आउटडोर शुटींग बेळगावच्या जवळ रस्त्यावर केले. त्यावेळी राजेश खन्ना सुपर स्टार होता म्हणून आपल्या भावाचे नाव राजेश व आपले नाव खन्ना ठेवले. ”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल. त्याचबरोबर आर.डी.बर्मन याचं संगीत व किशोरकुमारने गाणे असे काही बेफाम गायले आहे कि १९७२ सालापासून आजपर्यंत अशी एकही पिकनिक नसेल कि बस प्रवासात हे गाणे गायले गेले नसेल.
या चित्रपटाचा अमिताभला असा काही फायदा झाला कि त्याचं नशीबच बदलून गेले.या चित्रपटातील अमिताभचे फाईट सीन सलीम जावेद मधल्या जावेदने पाहिले होते.ते प्रकाश मेहरा बरोबर जंजीर करत होते.इकडे प्रकाश मेहराला हिरो मिळत नव्हता. देव आनंदने जंजीर नाकारला कारण त्यात हिरोला गाणे नव्हते. राजकुमारने आपल्या स्टाईलमध्ये नाकारला कारण त्याच्या मते प्रकाश मेहराच्या डोक्याला सरसोच्या तेलाचा वास येत होता. तेव्हा जावेद, मेहराला म्हणाला “माझ्या बरोबर बॉम्बे टू गोवा बघयला चल.” त्यातील अमिताभच्या फाईट सीन दाखवून म्हणाला “ नवा हिरो आहे, अजून चाचपडतोय, दोन तीन चित्रपटात काम केले आहे तुला हव्या तश्या डेट्स देईल विचार कर “ आणि जन्जीरसाठी अमिताभची निवड झाली. बॉम्बे टू गोवा हा चित्रपट त्या वर्षाचा सर्वात सुपर हिट विनोदी चित्रपट ठरला त्याकाळी त्याने १ कोटीची कमाई केली.
— रवींद्र शरद वाळिंबे.
Leave a Reply